Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
ते अडाणी आहेत, अशुद्ध , गावंढळ बोलतात…नागराजच्या मराठी भाषेच्या वक्तव्यावर मिलिंद गवळींची जळजळीत पोस्ट
काय आहे मिलिंद गवळी यांची ही पोस्ट?
‘शब्दाविना संवाद’ असं म्हणत मिलिंद गवळींनी ही पोस्ट शेअर केली आहे.
माझी भाषा ही माझी आहे. त्यामुळं शुद्ध, अशुद्ध असं काही नसतं. मुळात जगभरात कुठंही अशुद्ध भाषा हा प्रकारच नसतोय. अमेरिकी भाषातज्ज्ञ नोम चॉम्स्की यांच्या शब्दांत सांगायचं तर भाषेचा हेतू हा शुद्ध ठरवणं, असा नसतो, तर संवाद साधणं असतो’,” असं परखड मत दिग्दर्शक व अभिनेते नागराज मंजुळे यांनी सोमवारी ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या ‘मुंबई टाइम्स कार्निव्हल २०२३’च्या समारोपामध्ये व्यक्त केलं. वर्षोनुवर्षे मला असं वाटत होतं की मराठी जी माझी मातृभाषा आहे , ती फक्त काहींनाच स्पष्ट, शुद्ध बोलता येते, काहींना ती येतच नाही आणि ते अडाणी आहेत, अशुद्ध बोलतात, गावंढळ बोलतात, त्यातला एक मी पण आहे असं मला वाटत होतं, ज्याला मराठी भाषा नीट बोलता येत नाही, मी अशुद्ध बोलतो. पण नागराज मंजुळे यांनी खरंच या वर पुन्हा एकदा मला ह्या गोष्टीवर विचार करायला लावला आहे.
माझी एक कोपरगाव ची मोठी मामी, अशुद्ध मराठी बोलायची किंवा गावंढळ मराठी बोलायची किंवा गावाकडची मराठी बोलायची असं म्हणूया. पण पण तिचे शब्द इतके प्रेमळ, मधुर ,मन शांत करणारे असायचे,कानांना गोड वाटणारे असायचे, आणि या उलट,मधल्या काळामध्ये , अतिशय मराठीवर प्रभुत्व असणारी एक व्यक्ती, मराठीचा प्रत्येक शब्द कसा उच्चारावा याचं ज्ञान असणारी व्यक्ती, पण त्या व्यक्तीनं तोंडातून शब्द काढला रे काढला ले काढला की,माझ्या कानांत कर्कश्य आवाज यायचा , पूर्वी नाही का सॉफ्ट ड्रिंक च्या बाटलीच पत्र्याचं बुच, लहान मुलं फरशीवर घासायचे , आणि एक आवाज यायचा,कानाला त्रास देणारा, तसंच काहीसा, कर्कश्य. त्यामुळे चांगलं काय, वाईट काय,शुद्ध काय, अशुद्ध कायकाहीच कळत नव्हतं. नागराज मंजुळेंच्या बोलण्यानं खरंच वेगळा विचार करायला लावला.
काय म्हणाले होते नागराज मंजुळे?
या प्रश्नाचं उत्तर देताना नागराज म्हणाले होते की, ‘आपल्याकडं जातीनिहाय भूगोल, शहर, खेडं, निसर्ग, कोंडमारा हे सगळं तुमच्या भाषेला, रंगाला, खाण्यापिण्याला निर्धारित करतं. कोकणात खाद्यपदार्थांमध्ये नारळाचा जास्त तर आमच्याकडे शेंगदाण्यांचा जास्त वापर होतो. माझी भाषा ही माझी भाषा आहे. संत ज्ञानेश्वर, तुकारामांची भाषाही खेड्याचीच आहे. पण शहर हे ना एकप्रकारे मॉनिटरसारखं आहे. मी जेव्हा पुण्यात आलो तेव्हा मला पहिल्यांदा भाषेविषयी न्यूनगंड आला. भाषा भाषा असते आणि भाषेचा हेतू हा शुद्ध ठरवणं असा नसतो, तर संवाद साधणं असतो. पण आपल्याकडं काय बोलतोय त्यापेक्षा व्याकरणदृष्ट्या बरोबर बोलला की नाही, हे पाहिलं जातं.’ ‘भाषा निर्मितीचा कारखानाही असतो आणि आपण लोकच ती निर्माण करतो. भाषा ही शतकानुशतकांची प्रदीर्घ प्रक्रिया असते. शिवाय काम करणारे, कष्टकरी, शेतकरी, कारखान्यातील कामगार अशांकडूनच भाषा निर्माण होते, असेही मला अभ्यासादरम्यान जाणवले. आपल्या मराठीत फारशी, कन्नड, तमीळ, संस्कृत भाषांतीलही शब्द आहेत. शुद्ध असं काही नसतंय. शुद्ध ही संकल्पनाच अत्यंत फालतू आहे.’