Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
हायलाइट्स:
- लग्नातील आहेर आणि सत्काराच्यावेळी पाहुणे मंडळीची नावं पुकारली जात असताना त्यांना सापडले मूळ गाव.
- एका लग्नात सेवानिवृत्त बँक अधिकाऱ्यानं आपल्या अडनाव बंधुचे नाव ऐकून चौकशी केली. तर ते त्यांच्याच गावचे निघाले.
- शंभर वर्षांपूर्वी त्यांच्या पूर्वजांणी गाव सोडलं होतं.
लग्नातील आहेर आणि सत्काराच्यावेळी पाहुणे मंडळीची नावं पुकारली जातात. त्यात आपलं नावं आलं का? आणखी कोणाचं आलं हे अनेक जण कान देऊन एकत असतात. अशाच एका लग्नात सेवानिवृत्त बँक अधिकाऱ्यानं आपल्या अडनाव बंधुचे नाव ऐकून चौकशी केली. तर ते त्यांच्याच गावचे निघाले. शंभर वर्षांपूर्वी त्यांच्या पूर्वजांणी गाव सोडलं होतं. मग काय, एवढी ओळख पुरेशी झाली. पुढे स्नेह वाढत गेला, गावाची ओढ त्या दूर गेलेल्या कुटुंबाना पुन्हा गावात घेऊन आली. गावकऱ्यांनी आगतस्वागत केलं. (here is how one gets his native village in a marriage ceremony in ahmednagar)
अकोले तालुक्यातील सुगाव खुर्द येथील ही घटना आहे. या गावातील तुकाराम बाबा वैद्य यांनी आपलं गाव सोडलं व ते दूर मराठवाड्यात वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथे स्थिरावले. त्यांचा अथवा त्यांच्या पुढच्या पिढ्यांचा नंतर गावाशी संपर्क राहिला नव्हता. नवीन पिढीला आपलं मूळ गावही माहिती नव्हतं. मात्र, तब्बल शंभर वर्षांनंतर हे कुटुंब पुन्हा गावाशी जोडलं गेलं. त्यांच्या चौथ्या पिढीतील सीताराम पाटील वैद्य व त्यांचे अन्य नातेवाईक यांनी नुकतीच सुगाव खुर्दला भेट दिली. आपलं मूळ गाव पाहून वैद्य परिवार भारावून गेलं. गावकऱ्यांनी केलेल्या आदरातिथ्यानं ते सुखावले.
क्लिक करा आणि वाचा- केंद्राच्या व्हॅक्सिन डिप्लोमसीचा राज्यांना फटका; डॉ.नीलम गोऱ्हे यांचा मोदी सरकारवर निशाणा
या भेटीला निमित्त ठरला तो काही वर्षांपूर्वी वैजापूर येथील एक विवाह समारंभ. सुगावचे सेवानिवृत्त बँक अधिकारी सूर्यभान वैद्य या लग्नासाठी गेले होते. तेथे सत्कारासाठी आणखी एक वैद्य नाव पुकारलं गेलं. आपल्याच अडनावाचे हे कोण आहेत, याची उत्सुकता म्हणून नंतर सूर्यभान वैद्य यांनी चौकशी केली. तेव्हा त्यांना कळालं की हे वैद्यही मूळचे सुगावचे आहेत. अधिक चौकशी केल्यावर या कुटुंबाच्या पूर्वजांच्या स्थलांतराची माहिती मिळाली. पूर्वजांनी काही कारणामुळं सुगाव सोडल्यानंतर वैजापूर तालुक्यात जमीन घेतली. तिथंच त्यांचा कुटुंबाचा विस्तार वाढत गेला. त्यांच्या चौथ्या पिढीचे सीताराम वैद्य हे असल्याचं समजलं. बँक अधिकारी वैद्य यांनी गावात आल्यावर याची माहिती गावकऱ्यांना दिली. सुगावचे सचिन वैद्य, सूर्यभान वैद्य, शांताराम रघुनाथ वैद्य, बी. डी. वैद्य, डॉ. धनंजय वैद्य यांनी पुढाकार घेऊन संबंधित वैद्य परिवाराशी फोन वरून संपर्क साधला. एकदा गावात भेटीला येण्याचं निमंत्रण दिलं. मात्र, मध्येच करोना आणि लॉकडाऊनचा अडथळा येत गेला.
क्लिक करा आणि वाचा- पन्हाळ्यात भीषण अपघात; कार थेट दरीत कोसळली, दोन युवक ठार
नुकताच हा योग जुळून आला. गाव सोडून गेलेले तुकाराम बाबा वैद्य व त्यांच्या चौथ्या पिढीतील सीताराम पाटील वैद्य, त्यांचे जावई जाधव, नातलग आढळ पाटील सुगावला येऊन गेले. आपला गाव कसा आहे, आपले नातलग कोण कोण आहेत, गावातील लोक कसे आहेत याची पाहणी व चौकशी केली. त्यांचे स्वागत व सत्कार माजी सरपंच विष्णुपंत वैद्य, उपसरपंच डॉ. धनंजय वैद्य,अमृतसागर दूध संघाचे माजी संचालक माधवराव वैद्य, अमोल वैद्य, दयानंद वैद्य, संजय वैद्य, सुनील वैद्य, दिलीप वैद्य, सूर्यभान वैद्य, शांताराम वैद्य यांनी केला.
क्लिक करा आणि वाचा- हॉटेलच्या वेळा वाढवणार?; मुख्यमंत्री म्हणाले, ‘आठवड्यात परिस्थिती पाहून निर्णय घेणार’
या पाहुण्यांनी गावातील मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. गावातील विकास कामांचा आढावा घेत समाधान व्यक्त केलं. मूळ गावाला भेटीची खूप दिवसांची इच्छा पूर्ण झाल्यामुळं या त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. गावकऱ्यांसोबत मनसोक्त गप्पा झाल्या. भोजनाचा आस्वाद घेऊन आपल्या गावी निघून गेले. जाताना इकडील गावकऱ्यांना आपल्या नव्या गावाच्या भेटीचे निमंत्रण देऊन गेले.