Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
हायलाइट्स:
- मांडूळ सापाच्या तस्करीचा प्रकार उघड
- पोलिसांनी सापळा रचून आरोपीला केली अटक
- तब्बल ७ लाख रुपयांना ठरला होता सौदा
श्रीगोंदा येथील वनसंरक्षक रमेश देवखिळे यांना सर्पमित्रांकडून या तस्करीसंबंधी माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सापळा रचून विशाल सुर्यभान धनवटे (वय २५, रा. नवसरवाडी ता. कर्जत) याला पकडले. त्याचे तीन साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले. १६ ऑगस्ट रोजी ही कारवाई करण्यात आली असून सापाला सुरक्षित ठिकाणी सोडण्यात येत असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
कर्जत तालुक्यातील नवसरवाडी येथे मांडूळाची तस्करी होत असल्याची माहिती देवकुळे यांना मिळाली होती. त्यांनंतर वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश छबिलवाड, वनरक्षक सुरेश भोसले, आजिनाथ भोसले, दीपक गवारी, वनमजूर किसन नजन यांनी खासगी गाडीने साध्या वेशात नवसरवाडी येथे जाऊन सापळा लावला. बनावट ग्राहक संशयित व्यक्तीकडे पाठवण्यात आले. तेथे चौघे एक मांडूळ विकणार असल्याची माहिती मिळाली. बनावट ग्राहकाने त्यांच्याशी खरेदीसंबंधी चर्चा केली. त्यांनी हा साप सात लाख रुपयांना विकणार असल्याचे सांगितले.
बनावट ग्राहकाने ठरल्याप्रमाणे होकार दिला. मग त्या चौघांपैकी दोघे घरी साप आणण्यासाठी गेले आणि तो घेऊन आले. तोपर्यंत वन अधिकारीही तेथे आले. आपण अडकत असल्याचे पाहून तिघे पळून गेले. विशाल धनवटे मात्र हाती लागला. त्याच्याकडून साप जप्त करण्यात आला. या सापाचे वजन १.१५ किलो भरले. तो जप्त करण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. उपवनसंरक्षक सुवर्णा माने व सहाय्यक वनसंरक्षक रमेश देवखिळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश छबिलवाड, वनरक्षक सुरेश भोसले पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, मांडूळ सापाला १९७२ च्या वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार संरक्षण देण्यात आलं आहे. त्यामुळे या सापाला पकडणे, विक्री करणे हा गुन्हा आहे. हा एक बिनविषारी साप असून दुतोंड्या साप या नावानेही ओळखला जातो. शेतातील पिकांचे नुकसान करणारे उंदीर, घुशी इत्यादी तो खात असल्याने शेतकऱ्यांचा मित्र मानला जातो. मात्र, त्याच्यातील औषधी गुणधर्मामुळे त्याला लाखो रुपयांची किंमत येते. त्यामुळे त्याची तस्करी केली जाते. हा साप दुर्मिळ असल्याने त्याची किंमत वाढत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही याला मोठी मागणी असते.