Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
कुठल्याही लोकप्रिय कलाकृतीचा सिक्वेल हा प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचा विषय असतो. सिक्वेल चित्रपटांना मिळणारं यश लक्षात घेऊन आगामी काळात सुमारे डझनाहून अधिक असे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. आजवर गाजलेल्या अनेक चित्रपटांच्या सिक्वेलचा यात समावेश आहे. काही सिक्वेल लवकरच, तर काही पुढील वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यामुळे आता बॉक्सऑफिसवर दमदार सिक्वेल चित्रपटांची रांग लागण्याची शक्यता आहे.
एखादा चित्रपट हिट झाला की प्रेक्षकांना तो पुन:पुन्हा पाहायचा असतो. याचा फायदा घेत सिनेनिर्माते लगेचच त्याचे सिक्वेल तयार करण्याच्या तयारीला लागतात. तर काही वेळेला चित्रपटाची मूळ गोष्ट अर्धवट सोडून; प्रेक्षकांची उत्सुकता ताणून सिनेनिर्माते आपल्या पुढील सिक्वेल सिनेमाचा डोलारा उभा करतात. अनेक वेळा सिक्वेल हिट झाला तरी त्याच चित्रपटाचा तिसरा भागही बनवायला निर्माते चुकत नाहीत. तसं सिक्वेलच्या बाबतीत हॉलिवूडचे चित्रपट पुढे आहेत. एका सिनेमाचे चार-पाच नव्हे तर तब्बल दहा भागदेखील हॉलिवूडच्या पडद्याने पाहिले आहेत. बॉलिवूडलाही सिक्वेलची हीच चटक लागली आहे. बॉलिवूडचा पडदादेखील सिक्वेलपटांनी भरणार आहे. अलीकडेच ‘डॉन ३’च्या घोषणेनं प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. या सिनेमात अभिनेता शाहरुख खानऐवजी रणवीर सिंग ‘डॉन’च्या व्यक्तिरेखेत दिसणार आहे.
प्रत्येक सिक्वेलमागे हजारो कोटी रुपये खर्च केले जातात. यामागचं खास कारण काय? याविषयी दिग्दर्शक रोहित शेट्टीनं माध्यमांशी बातचीत करताना सांगितलं होते की, ‘जेव्हा एखाद्या सिनेमाचा सिक्वेल बनवला जातो, तेव्हा तो आधीपासूनच हिट असतो. कारण तो एका हिट चित्रपटाचा सिक्वेल असतो. त्यामुळेच तो सिक्वेल बघण्यासाठी प्रेक्षक नक्कीच येतील याची पन्नास टक्के खात्री असते. जसं की माझ्या ‘सिंघम’, ‘सिम्बा’ आणि त्यानंतर ‘सूर्यवंशी’ या चित्रपटांसाठी प्रेक्षकांनी सिनेमागृहात गर्दी केली. तिथेच मी ‘सर्कस’ नावाचा एक नवा सिनेमा बनवला. तो बॉक्स ऑफिसवर तितकासा यशस्वी ठरला नाही.’ आगामी काळात रोहित शेट्टी पुन्हा एकदा एक सिक्वेल चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अभिनेता अजय देवगणसोबत तो ‘सिंघम ३’चा घाट घालणार आहे. सोबतच रोहित ‘फिर गोलमाल’ या सिनेमाचीदेखील निर्मिती करेल अशी चर्चा आहे. दुसरीकडे स्वतः अजय देवगण ‘भोला’च्या यशानंतर ‘भोला २’ बनवणार आहे. याचं दुसरं कारण असंही आहे की, ‘भोला’ हा सिनेमा ज्या दाक्षिणात्य सिनेमाचा रिमेक आहे; त्या ‘कैथी’ या सिनेमांच्या रिमेकवर, अर्थात ‘कैथी २’वर देखील सध्या काम सुरू आहे. वरुण धवन त्याच्या ‘भेडीया’ चित्रपटाच्या यशानंतर ‘भेडीया २’देखील करणार आहे. तसंच या सिनेमांच्या शृंखलेतील राजकुमार राव, श्रद्धा कपूर अभिनित ‘स्त्री २’वर देखील काम सुरू आहे.
सिक्वेलचे चेहरे
सिक्वेलच्या या शर्यतीत बड्या स्टार कलाकारांचाही समावेश आहे. यात प्रामुख्यानं सलमान खान, रणबीर कपूर, रणवीर सिंग, अजय देवगण, अक्षय कुमार, कमल हसन, हृतिक रोशन आणि अल्लू अर्जुन यासारखे कलाकार आहेत. तसंच आयुषमान खुराना, पुलकित सम्राट, कार्तिक आर्यन, राजकुमार राव, वरुण धवन यासारख्या नव्या फळीतील कलाकारांचेदेखील सिक्वेल चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
आगामी सिक्वेल चित्रपट
ड्रीम गर्ल २ – आयुषमान खुराना
टायगर ३ – सलमान खान
हेराफेरी ३ – अक्षय, सुनील, परेश
फिर गोलमाल – अजय देवगण आणि टीम
फुकरे ३ – पुलकीत सम्राट
सिंघम ३ – अजय देवगण
इंडियन २ – कमल हसन
पुष्पा २ – अल्लू अर्जुन
क्रिश ४ – हृतिक रोशन
आशिकी ३ – कार्तिक आर्यन
विक्रम २ – कमल हसन
कैथी २ – कार्तिक शिवकुमार
स्त्री २ – राजकुमार राव, श्रद्धा कपूर
भेडीया २ – वरुण धवन
वॉर २ – ह्रितिक रोशन
डॉन ३ – रणवीर सिंग
वेलकम टू जंगल – अक्षयकुमार
हाऊसफुल्ल ५ – अक्षयकुमार
दृश्यम ३ – अजय देवगण
युनिव्हर्सचा पट
‘पठाण’ चित्रपटाच्या यशानंतर यशराज फिल्म्स ‘स्पाय युनिव्हर्स’ बनवत आहेत. यात ‘वॉर’, ‘पठाण’च्या पाठोपाठ ‘टायगर ३’ आणि ‘वॉर २’ हे सिनेमे प्रेक्षकांना पाहता येणार आहेत. तर दुसरीकडे २०१८ मध्ये ‘स्त्री’ सिनेमाच्या यशानंतर निर्माता दिनेश विजन यानं हॉरर-कॉमेडी सिनेमॅटिक युनिव्हर्स तयार करण्याचा निर्णय घेतला. नजीकच्या वर्षात प्रदर्शित झालेला ‘भेडिया’देखील या युनिव्हर्सचा भाग होता. आता पुढे ‘भेडिया २’ची आणि ‘स्त्री २’देखील निर्मिला जाणार आहे. अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र’बाबतही हेच चित्र आहे. या सिनेमाचे आणखी दोन सिनेमे निर्मिले जाणार आहेत. या सिनेमांना एकत्रित अस्त्राव्हर्स म्हटलं जातंय.