Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

तांबड्या समुद्रात हुती बंडखोरांचा हल्ला, सामुद्रधुनीचा मोक्याचा मार्ग बंडखोरांनी रोखला

11

जागतिक सागरी वाहतुकीतील एक महत्त्वाचा व्यापारमार्ग असलेल्या तांबड्या समुद्रामध्ये सध्या हूती बंडखोरांच्या हल्ल्यांमुळे मोठा भडका उडाला आहे. चार दिवसांपूर्वी एमव्ही रुनेम या माल्टाच्या जहाजाला तेथील हूती बंडखोरांनी लक्ष्य केल्यावर भारतीय नौदलाने आपली युद्धनौका व गस्तीविमान या नौकेच्या रक्षणार्थ धाडली. सध्याचे समुद्री हल्ल्यांचे प्रकरण हे यापूर्वीच्या चाचेगिरीसारखे नसून त्यास इस्रायल-हमास युद्धाचा संदर्भ आहे. सध्याच्या हल्ल्यांमुळे तेलांच्या किमतीत वाढ होण्याचे संकट उद्भवणार आहे.

सध्याचे हल्ले वेगळे कसे?

सोमाली चाच्यांनी अरबी समुद्र तसेच एडनच्या आखातावळच्या मार्गावर सन २००८ ते २०१२ या काळात उच्छाद मांडला होता. हे चाचे थेट लक्षद्वीपर्यंतही मजल गाठू लागले होते. एखाद्या छोट्या डिंगी बोटीतून येऊन मोठ्या जहाजांवर ते हल्ला करीत व जहाजांच्या सुटकेसाठी परदेशात बसलेल्या खंडणीखोरांना मोठी रक्कम देणे भाग पडत असे. गेल्या काही दिवसांतले हल्ले हे सोमाली चाचेगिरीसारखे नाहीत. ते येमेनमधील हूती बंडखोरांकडून सुरू झाले असून त्यात रॉकेट, क्षेपणास्त्रे आणि ड्रोन्स यासारखी अद्ययावात शस्त्रास्त्रे वापरण्यात येत आहेत. १८ डिसेंबरला गॅलेक्सी लीडर या मोटार वाहतूक करणाऱ्या जहाजावर तर एमआय १७ या लष्करी हेलिकॉप्टरद्वारे शस्त्रधारी बंडखोर उतरले. मर्स्क जिब्राल्टर या जहाजावर क्षेपणास्त्राचा हल्ला झाला.

हल्लेखोर कोण व उद्दिष्ट कोणते?

हूती ही येमेनी बंडखोरांची संघटना असून त्यांना इराणकडून शस्त्रपुरवठा होतो. येमेनमधील सना या राजधानीसह उत्तरेकडील बहुतांश भाग २०१४ पासून त्यांच्या अधिपत्याखाली आहे. सौदी अरेबियामधील सुन्नी सत्ताधीशांच्या विरोधात ते गनिमी युद्ध खेळले होते. २०१४ मध्ये येमेनमध्ये झालेल्या यादवीच्या काळात त्यांचे महत्त्व वाढले. हूती बंडखोर हे अमेरिका आणि इस्रायलचा तिरस्कार करतात. नेमक्या याच कारणामुळे सध्या इस्रायलकडे जाणाऱ्या जहाजांचा किंवा अमेरिकी व इस्रायली जहाजांचा मार्ग रोखण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. गाझा पट्टीत औषधे व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीतपणे मिळाला नाही, तर आम्ही तांबड्या समुद्रातील सर्व जहाजांवर हल्ले करू, असा इशारा त्यांनी दिला आहे.

मोक्याच्या जागेवर नाकेबंदी

हूती बंडखोरांनी बाब एल मांडेब सामुद्रधुनीचा चिंचोळा मार्ग व्यापारी जहाजांची नाकेबंदी करण्यासाठी निवडला आहे. जगभरात मलाक्का, होर्मुझ व बाब-एल-मांडेब या सामुद्रधुनी म्हणजे चेक पॉइन्ट्स समजल्या जातात. जगभरातील ४० टक्के तेल या सामुद्रधुनींमधून प्रवास करते. त्यामुळेच दहशतवादी, खंडणीखोर व चाचेगिरीतील गटांचे त्यावर लक्ष असते. आशिया आणि युरोपाला जोडण्यामध्ये सुएझ कालवा हा सर्वांत जवळचा मार्ग आहे. सुएझ कालव्यापासून एडनच्या आखाताच्या मुखापर्यंत तांबडा समुद्र आहे. या तांबड्या समुद्रात प्रवेश करतानाच एडन आणि जिबुटी यांच्या मधोमध बाब एल मांडेब ही अवघी २६ किलोमीटर रुंदीची सामुद्रधुनी आहे. हिंदी महासागरातून सुएझ कालव्याकडे जाणाऱ्या प्रत्येक जहाजाला या सामुद्रधुनीतून जावेच लागते. तांबड्या समुद्रासभोवतीच्या प्रदेशांमध्ये कायम राजकीय अस्थैर्य राहिले असून तेथील जमातींना चाचेगिरीसाठी हाताशी धरले जाते. या मोक्याच्या जागेवर हूती बंडखोरांनी कारवाया सुरू केल्यामुळे गेल्या चार दिवसांत काही व्यापारी जहाजे तर मार्ग बदलून परतही फिरली. या सामुद्रधुनीतून वर्षाला १७ हजार जहाजे प्रवास करतात. सुएझ कालव्यातून दिवसाला ५० जहाजे जातात. भूमध्य समुद्राला जोडणारा हा एकमेव मार्ग आहे. आखातातून येणारे सर्व तेल याच मार्गाने जाते.

नाकेबंदीचे परिणाम काय?

नाकेबंदीमुळे युरोपातील जहाजांनी सुएझ कालवा टाळायचे ठरविल्यास त्यांचा प्रवास साडेतीन हजार मैलांनी वाढेल. या जहाजांना दक्षिण आफ्रिकेच्या केप ऑफ गुड होपला वळसा घालून युरोपात पोहोचावे लागेल. त्यामुळे इंधनखर्च कित्येक पट वाढेल. ब्रिटिश पेट्रोलिअम, मेडिटेरिनिअन शिपिंग कंपनी, मर्स्क, हॅपॅग लॉइड अशा बड्या व्यापारी जहाज कंपन्यांनी तांबड्या समुद्राचा मार्ग टाळण्याचा निर्णय घोषित केला आहे. त्यामुळे हा सर्व माल पोहोचण्यास अनेक आठवडे विलंब होईल. याचा अर्थ ही जहाजे प्रवासात अडकल्यामुळे अधिक जहाजांची गरज लागेल. एकप्रकारे काही जहाज कंपन्यांना हे अचानक घबाडच मिळेल. सागरी व्यापार विम्याच्या हप्त्यांमध्ये मोठी वाढ होईल. इजिप्तला सुएझ कालव्यातील वाहतुकीद्वारे दिवसाला अडीच ते तीन कोटी डॉलरचे उत्पन्न मिळते. इजिप्तच्याही उत्पन्नाला त्यामुळे फटका बसेल. या संघर्षामुळे जहाजांना नौदलांकडून संरक्षण देण्याची मागणी वाढत चालली आहे. अमेरिकेनेही तशी पावले उचलली आहेत. जिबुटीला चीनचाही लष्करी तळ आहे. मात्र, या सर्व संघर्षात चीन अर्थातच शांत आहे.

फक्त जाहिरातीवर खर्च, आम्हाला काहीच नाही; मोदी सरकारच्या डिजिटल वाहनाला ग्रामस्थांनी पळवलं

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.