Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
प्रभासच्या ‘सालार’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बंपर सुरुवात केली होती. या चित्रपटाने पहिल्या दिवशी देशात ९०.७० कोटी रुपयांचे निव्वळ कलेक्शन करुन धमाका केला. प्रशांत नील यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपट नवे विक्रम करेल असा अंदाज या सिनेमाची ओपनिंग पाहून सर्वांनी बांधला, पण दोन आठवड्यांनंतर चित्रपटाच्या कमाईत अचानक घसरण झाली. सिनेसृष्टीत नवा रेकॉर्ड करणे दूर भारतीय बॉक्स ऑफिसवर ‘बाहुबली’च्या ४२० कोटींच्या व्यवसायाशी तो बरोबरी करू शकणार की नाही असे प्रश्नचिन्ह उभे आहे. मात्र, जगभरातील कमाईत ‘बाहुबली’ला सिनेमाने मागे टाकले आहे, पण परदेशी कमाईचा वेगही मंदावला आहे.
‘सालार’ने भारतीय बॉक्स ऑफिसवर पहिल्या आठवड्यात ३०८ कोटी रुपयांची कमाई केली होती. तर दुसऱ्या आठवड्यात ७०.१० कोटी रुपयांची कमाई केली. sacnilk च्या रिपोर्टनुसार, चित्रपटाने तिसऱ्या आठवड्याच्या शुक्रवारी ३.५० कोटींचा व्यवसाय केला. अशा प्रकारे, १५ दिवसांत चित्रपटाने देशात एकूण ३८१.६० कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. ‘सालार’चे बजेट ४०० कोटी रुपये होते. त्यामुळे हा चित्रपट देशात हिट होण्यासाठी किमान ४१० कोटी रुपयांचे निव्वळ कलेक्शन करावे लागेल.
‘सालार’चा जगभरातील कलेक्शन
जगभरातील कलेक्शनच्या बाबतीतही ‘सालार’चा वेग आता मंदावला आहे. या चित्रपटाने गुरुवारी जगभरातील बॉक्स ऑफिसवर एकूण ९.२८ कोटी रुपयांचे कमाई केली होती. तर शुक्रवारी १५ व्या दिवशी जगभरात सुमारे ७ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे, त्यामुळे १५ दिवसांत चित्रपटाचे एकूण जगभरातील कलेक्शन आता ६६७ कोटी रुपयांच्या जवळपास आहे.
‘सालार’ला करावा लागणार अडचणींचा सामना
प्रशांत नील दिग्दर्शित ‘सालार’ गेल्या वर्षी २२ डिसेंबरला रिलीज झाला होता. बॉक्स ऑफिसवर शाहरुख खानच्या ‘डंकी’शी त्याची स्पर्धा होती. ‘सालार’ने कमाईत ‘डंकी’ला पराभूत केले, पण कमी बजेटमुळे, शाहरुखच्या चित्रपटाने सुपरहिटचा टॅग घेतला. विशेषत: गेल्या मंगळवारपासून चित्रपटाची कमाई अचानक १० कोटींच्या खाली जात आहे. शनिवार-रविवारी या आठवड्याच्या शेवटी कमाईत वाढ न झाल्यास ‘सालार’ला आणखी अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
‘मेरी ख्रिसमस’ रिलीज होण्यापूर्वी कमाईची पूर्ण संधी
या शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर एकही मोठा चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. त्यानंतर विजय सेतुपती आणि कतरिना कैफचा ‘मेरी ख्रिसमस’ हा चित्रपट १२ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे ‘सालार’कडे पैसे कमवण्यासाठी अजूनही सहा दिवसांचा अवधी आहे. गेल्या मंगळवारपासून, ‘सालार’चा प्रेक्षकवर्ग सरासरी १५-१७% पर्यंत कमी झाला आहे.