Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
बलात्काराच्या गुन्ह्यासाठी आजन्म कारावास भोगत असलेल्या आसाराम बापूचे ‘संस्कार सरिता’ नावाचे पुस्तक उरण येथील ‘जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट’च्या पूर्व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना वाटून त्यावर आधारित परीक्षा घेणार असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे ह्या शाळेतील काही विद्यार्थ्यांना आसाराम बापूचे ‘संस्कार सरिता’ हे पुस्तक देण्यात आले होते आणि त्यावर आधारित इयत्ता तिसरी ते इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येणार होती.
यासाठी तीन वयोगट ठरविण्यात आले होते. जो विद्यार्थी ६० टक्के प्राप्त करेल त्याची जिल्हास्तरीय निवड होणार असल्याचे सांगण्यात आले होते आणि जिल्हास्तरीय टॉपमध्ये ६ विद्यार्थ्यांची निवड करून, प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांला २१ हजार, द्वितीय येणाऱ्यास १५ हजार, तृतीय क्रमांकास ११ हजार, चतुर्थ क्रमांकास सात हजार, पाचव्या क्रमांकास ५ हजार, सहाव्या क्रमांकास ३ हजार अशी पुरस्कारांसाठीची रक्कम ठरवलेली होती.
आम्हाला वरून आदेश आहेत!
मात्र जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट ह्या शाळेत सेमी इंग्लिशने शिकणाऱ्या इयता तिसरीच्या विद्यार्थीनीच्या पालकांच्या निदर्शनास ही बाब येताच त्यांनी लगोलग शाळेशी संपर्क साधला. प्रिन्सिपलसोबत (मुख्याध्यापक) भेटून चर्चा केली. त्यावर वरून आदेश आहेत, मी काहीही करू शकत नाही, असे उत्तर प्रिन्सिपल यांच्याकडून देण्यात आल्याचं पालकांनी सांगितलं.
पालकांच्या प्रश्नांनंतर पुस्तके जमा केली
मुख्याध्यापकांच्या या उत्तरानंतर पालकांनी निराश न होता पुन्हा शाळेच्या दादर येथील संस्थेशी संपर्क केला असता दुसऱ्या दिवशी विद्यार्थांना दिलेली पुस्तक शाळेने पुन्हा जमा करायला सांगितली. विशेष म्हणजे उरण मधील ही शाळा नामांकित शाळा असून ग्रॅज्युएशनपर्यंत मुलांना शिक्षण देते. त्याच शाळेत आसाराम बापूच्या पुस्तकांवर परीक्षा घेण्याचा हा प्रकार उघडकीस आला आहे. मात्र सद्या मुलांना देण्यात आलेली पुस्तक पुन्हा घेऊन या आणि जमा करा असे आदेश शाळेने दिले आहेत.
बलात्काऱ्याविषयी मुलांना धडे देऊन शाळेला नेमके कोणत्या प्रकारचे संस्कार मुलांना द्यायचे आहेत?
विशेष म्हणजे शाळेच्या मुख्याध्यापिका स्वतः एक महिला असून बलात्कार प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झालेल्या व्यक्तीचे धडे मुलांना कसे काय द्यायला तयार झाल्या? असाही प्रश्न पालक विचारत आहेत. महाराष्ट्राला संत महात्म्यांचा एवढा वारसा लाभलेला असताना आसाराम बापूसारख्या बलात्काऱ्याविषयी मुलांना धडे देऊन शाळेला नेमके कोणत्या प्रकारचे संस्कार मुलांना द्यायचे होते, असे सवाल आता पालक विचारू लागलेले आहेत. ‘वरून’ जरी आदेश आलेला असला तरी मुख्याध्यापिकांनी याला विरोध का केला नाही? असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांच्या पालकांना पडले आहेत.
आमचा नाईलाज झालाय, शिक्षिकांची हतबलता
दुसरीकडे अनेक पालकांनी शाळेतील काही शिक्षिकांकडे याविषयी विचारणा केली असती, आम्हालाही हा प्रकार योग्य वाटत नाही. आम्हीही याचा विरोधच करतोय. पण शेवटी आम्हीही थेटपण विरोध करू शकत नाही. आम्हालाही शाळेत नोकरी करायची आहे, अशी हतबलता शिक्षिकांनी बोलून दाखवली.
शाळेचा युटर्न!
याबत जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या मुख्याध्यापिकांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्याशी संपर्क झाला नाही. तसेच शाळेतील कमिटी मेंबर म्हणून तनसुख जैन यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी हा दावा फेटाळून लावला. शाळेत मुलांना आसाराम बापूची पुस्तके देण्याचा प्रकार झाला नाही. शालेय पाठ्यपुस्तकांशिवाय इतर कोणत्याही पुस्तकांचा मुलांना अभ्यास करून त्यावर परीक्षा घेण्यात आलेली नाही किंवा शाळेचं तसं नियोजनही नाही, असं त्यांनी सांगितलं.