Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्थे

8

पुणे, दि. १५: केंद्र शासनामार्फत आखण्यात आलेल्या नवीन सहकारी धोरणामध्ये सहकार चळवळ सशक्त बनवून तळागाळातील लोकांपर्यंत पोहचविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे; हे धोरण ठरविताना वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्थेने उत्तम भूमिका पार पाडली आहे, अशा शब्दात राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी संस्थेचा गौरव केला.

Thank you for reading this post, don’t forget to subscribe!

वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्थेच्या (वैमनीकॉम) ५७ व्या स्थापना दिवस समारंभात ते बोलत होते. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी, राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ (एनडीडीबी), आनंदचे अध्यक्ष डॉ. मीनेश शाह, वैमनीकॉमच्या संचालक डॉ. हेमा यादव, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे, वैमनीकॉमचे निबंधक आर. के. मेनन, सह प्राध्यापक वाय. एस. पाटील उपस्थित होते.

सहकारी संस्थांसाठी शिक्षण व प्रशिक्षणासाठी वैमनीकॉम या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेने उल्लेखनीय काम केले आहे, असे सांगून मंत्री वळसे पाटील म्हणाले, कृषी बँकींग क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पातळीचे प्रशिक्षण केंद्र असलेली ‘वैमनीकॉम’सारखी संस्था सहकार क्षेत्रासाठी दीपस्तंभासारखी काम करेल.

ते पुढे म्हणाले, सहकारी चळवळीने देशाच्या ग्रामीण भागात लोकांचे जीवनमान उंचविले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये या चळवळीचा देश पातळीवर सखोल आढावा घेण्यात आला. त्यानुसार नवीन सहकार धोरण निश्चितीसाठी केंद्र सरकारच्या पातळीवर गठित समितीने सुचविल्याप्रमाणे नवीन सहकार धोरण २०२३ ची अंमलबजावणी करायची आहे.

नवीन सहकारी धोरणामध्ये सहकाराचा पाया असलेला आर्थिक विकास साध्य करणारी विविध मॉडेल विकसित करण्यासह अधिकाधिक भागभांडवल व संसाधने उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. यशस्वी सहकारी संस्था व समित्यांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. सहकारी संस्थेसाठी चांगले प्रशासन, प्रशिक्षण व व्यवस्थापन उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.

‘सहकार से समृद्धी’ अंतर्गत देशपातळीवर विविध संस्थांसाठी वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येत आहेत त्यात प्रामुख्याने प्राथमिक सहकारी संस्थांचे उद्योग विस्तारीकरण, त्यांचे संगणकीकरण, बहुद्देशिय प्राथमिक सहकारी कृषी पतसंस्था, दुग्ध संस्था, मत्स्य संस्थांची प्रत्येक पंचायत पातळीवर नोंदणी करण्यात येणार आहे.

बहुद्देशीय प्राथमिक सहकारी संस्थांमार्फत धान्य साठवणूक क्षमता वाढविण्यात येणार आहे. कृषी पतसंस्थांना सी.एस.सी केंद्र, पेट्रोल पंप, गॅस वितरण सेवा, जन औषधी केंद्र आदी वेगवेगळे १५२ प्रकारचे उद्योग सुरु करण्याची संधी मिळाली असून महाराष्ट्र यात देशपातळीवर अग्रेसर राहिलेला आहे, असे श्री.वळसे-पाटील म्हणाले.

सहकारी बँका भविष्यात सुदृढ व्हाव्यात यासाठी सहकारी बँकींग क्षेत्रात आवश्यक त्या सुधारणा होवू घातलेल्या आहेत. याशिवाय देशातील सहकारी साखर कारखान्यांचे पुनुरुज्जीवन करण्यासाठी त्यांना आयकरात सवलत, आवश्यक तो पतपुरवठा, वीज निर्मिती प्रकल्पांसाठी मदत आदी उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.

सहकाराची व्याप्ती विचारात घेवून या क्षेत्रातील सर्वसमावेशक शिक्षण प्रशिक्षण धोरण आखण्यात आले असून देशातील सर्वात मोठ्या सहकार विद्यापीठाची निर्मिती होणार आहे. केंद्रीय धोरणांच्या अनुषंगाने महाराष्ट्रात सहकारी कायद्यात करावयाच्या बदलांबाबत एक समिती गठीत करण्यात आलेली असून नवीन सहकारी धोरणाचा अभ्यास करून सहकार कायद्यात आवश्यक असलेला बदल ही समिती सुचविणार आहे. त्यामुळे भविष्यात ग्रामीण तसेच शहरी भागातील गरजा विचारात घेवून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही चळवळ पोहचविण्यासाठी बदल करावे लागणार आहेत, असेही मंत्री श्री. वळसे पाटील म्हणाले.

कुलगुरू डॉ. गोसावी म्हणाले, गेल्या पाच दशकापासून विद्यापीठ वैमनीकॉम बरोबर काम करत आहे. तसेच संस्थेसोबत काम करत नवनवीन अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहे. ऊर्जा क्षेत्राबाबतही विद्यापीठामार्फत काम केले जात असून जगात वेगाने तंत्रज्ञान बदलत असताना आपण नव तंत्रज्ञानाशी सुसंगत राहिले पाहिजे. हायड्रोजन ऊर्जेचा वापर हरित ऊर्जा म्हणून यापुढे जास्त झाला पाहिजे. सहकारी संस्थांकडून अशा क्षेत्राच्या विकासासाठी प्रयत्न केला पाहिजे. विद्यापीठात स्थापन ‘सी4यू’ च्या माध्यमातून १५ स्टार्टअप स्थापन केले आहेत.

डॉ. मीनेश शाह म्हणाले, सहकार क्षेत्रात शिक्षण, प्रशिक्षणात विशेष कार्य असलेली देशपातळीवरील ही संस्था आहे. संस्थेने केवळ देशातच नाही तर परदेशातील सहकार विकास तसेच क्षमता बांधणीसाठी आपले सहकार्य आणि योगदान दिले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी सामंजस्य कराराद्वारे सुरू करण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमांचा फायदा सार्क समूहातील देशातील सहकार विकासाला होणार आहे.

संचालक डॉ. हेमा यादव स्वागतपर भाषणात म्हणाल्या, संस्थेमार्फत प्रशिक्षित विद्यार्थ्यांनी अनेक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली असून ‘अपना बजार’, ‘अर्बन फार्म प्रेश’, ‘कॉर्न फॉर्मिका’सारखे अनेक स्टार्टअप स्थापन केले आहेत. संस्थेने गेल्या एका वर्षात ११६ प्रशिक्षण वर्ग चालविले असून सहकारी संस्था, संचालक मंडळातील १० हजार लोकांना प्रशिक्षण दिले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासोबत काम करत सहकार व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी डॉ. वाय. एस. पाटील यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला.

विविध अभ्यासक्रमात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले. यावेळी संस्थेच्या ‘सहकार संदर्भ (को-ऑपरेटिव्ह पर्सपेक्टिव)’ जर्नलचे प्रकाशनही उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमास सहकार आयुक्त अनिल कवडे, साखर आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक पी. एम. दिघे, विविध जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकांचे प्रतिनिधी आदींसह वैमनीकॉममार्फत आयोजित पाच दिवसीय प्रशिक्षणासाठी श्रीलंका, नेपाळ आणि बांगलादेश तसेच भारतातील विविध राज्यातील मास्टर ट्रेनर्स प्रशिक्षणासाठी आलेले प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.