Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
तिडके कॉलनीतून २२ जानेवारी रोजी संशयित हुसैफ अब्दुल अजीज शेख (वय ३०, रा. एमराल्ड रेसिडेन्सी) याला नाशिक दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) अटक केली. त्याला मंगळवारी (दि. २३) जिल्हा न्यायालयाने ३१ जानेवारीपर्यंत एटीएस कोठडी सुनावली होती. त्यानुसार आठ दिवसांचा तपास पूर्ण केल्यावर एटीएसने बुधवारी (दि. ३१) संशयिताला न्यायालयात हजर केले. त्यावेळी संशयिताची सीरियातील महिलेशी झालेली चॅटिंग, आर्थिक व्यवहार यासंदर्भातील पुरावे सादर करण्यात आले. हवालामार्फतही मोठी रक्कम ‘इसिस’पर्यंत पोहोचल्याचा दावा एटीएसने केला. त्यानुसार न्यायाधीश मृदृला भाटिया यांनी संशयिताला पाच फेब्रुवारीपर्यंत एटीएस कोठडी सुनावली. सुनावणीदरम्यान, सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अजय मिसर आणि विरोधी पक्षातून ए. आय. देशमुख यांनी युक्तिवाद केला.
काय आहे प्रकरण?
संशयित हुसैफ शेख हा इंजिनीअर असून, त्याचे कुटुंब उच्चशिक्षित आहे. नाशिकसह इतरत्र एक्सपोर्टसह कृषी मालासंदर्भात कंपन्या आहेत. त्याने सीरिया येथील राबिया उर्फ उम्म ओसामा नामक महिलेच्या बँक खात्यावर वेळोवेळी पैसे पाठविले आहेत. नाशिकच नव्हे, तर महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि बिहार राज्यातूनही त्या महिलेला फंडिंग झाले. दरम्यान, इसिसमार्फत सन २०१९ मध्ये झालेल्या कारवायांमध्ये ‘बॅटल ऑफ बाबूज’ असे युद्ध झाल्याची माहिती ‘एटीएस’ तपासात समोर आली.
एटीएस तपासातून…
– १२ मुद्द्यांवर न्यायालयात युक्तिवाद
– संशयिताला ६ वर्षांची मुलगी; ७ महिन्यांचा मुलगा
– संशयिताची पहिली पत्नी मृत; दुसरी पत्नी उच्चशिक्षित
– साडेसात ते ६५ हजारांपर्यंत निधी पाठवला
– १५ हजार पानांचा पंचनामा कोर्टात सादर
– संशयिताचे ९ सोशल मीडिया खाते; ४०० एमबी डेटा संशयास्पद
– व्हॉट्सॲप, सिग्नल, फेसबुक, टेलिग्राम, इन्स्टाग्रामचा समावेश
– सोशल मीडियावर ८,५७० संशयास्पद चॅट्स; टोपण नावांचा वापर
– संशयितासह भागीदार व नातलगांची २६ बँक खाती; १३ बँक खात्यांची तपासणी पूर्ण
– यूके, दुबई, मलेशिया, कतारमध्ये सातत्याने कॉलिंग
– दुबईच्या हवालासंदर्भात केंद्रीय यंत्रणांकडे चौकशी
व्हिडीओ, ऑडिओचा पुरावा
एटीएसने एक महत्त्वाचा व्हिडीओ कोर्टात न्यायाधीशांना दाखवला. यासह संशयित व त्याच्या सहा वर्षांच्या मुलीमध्ये झालेल्या संवादाचे ‘व्हाइस रेकॉर्डिंग’चा पुरावाही जोडण्यात आला. दोघांमध्ये धार्मिक मुद्द्यांसह लग्नासंदर्भात चर्चा झाल्याचा दावा एटीएसने केला. तसेच हैदराबाद येथील अब्दुल रउफ नावाच्या व्यक्तीला संशयिताने प्रेरित करून त्याच्यामार्फत सीरियातील महिलेला पैसे पाठविल्याचेही एटीएसने कोर्टात सांगितले. यासह सीरियातील महिला व संशयितामध्ये पडघामध्ये झालेल्या ‘एनआयए’च्या कारवाईसंदर्भात आक्षेपार्ह चॅटिंग झाले आहे.
‘दिहरम’मध्ये हवाला
संशयितासह इतरांनी दुबईच्या ‘दिहरम’ करन्सीत हवालामार्फत पैसे पाठविल्याचा दावा एटीएसने केला. त्यानुसार भारतातील ६५ हजार म्हणजे, दुबईतील २८७४.६८ दिरहम आतापर्यंत बँक खात्यातून पाठविण्यात आले आहेत. मात्र, मोठी रक्कम हवालामार्फत सीरियातील महिलेपर्यंत पोहोचल्याने त्याच्या तपासाकरिता एटीएसने संशयिताची कोठडी वाढवून घेतली.