Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
हायलाइट्स:
- एका पावसात मुंबईची तुंबई होते
- महापालिकेचा आता सहा मीटर रुंदीपर्यंतच्या सर्वच रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय
- मुंबईत पावसाचे पाणी काँक्रिटच्या रस्त्यांवर जिरवणार कसे?
मुंबई : कोट्यवधी रुपये खर्च करूनही रस्त्यांची दुदर्शा, तसेच खड्ड्यांचे प्रमाण कमी होत नसल्याने महापालिकेने आता सहा मीटर रुंदीपर्यंतच्या सर्वच रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पुढील पाच वर्षांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. दरम्यान, मुंबईत दरवर्षी १०० किमीहून अधिक रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे लक्ष्य पालिकेने ठेवले आहे. डिसेंबर २०२० पर्यंत मुंबईत ७५० किमी रस्त्यांचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. काँक्रिटीकरणाच्या या वेगात पावसाचे पाणी जमिनीत मुरणार कसे, असा प्रश्न उभा राहिला आहे.
दरवर्षी पावसात मुंबईतील रस्त्यांची चाळण होत असल्याने नागरिकांना खड्डेमय रस्त्यांवरून प्रवास करावा लागतो आहे. त्यामुळे पालिकेला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. राजकीय पक्ष, स्वयंसेवी संस्थांनी याकडे पालिकेचे वारंवार लक्ष वेधल्यानंतर पालिकेने रस्त्यांची गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. मुंबई महापालिका क्षेत्रात सुमारे २ हजार किमी लांबीचे रस्ते आहे. यात साधारण पाच हजार अंतर्गत रस्ते आहेत. त्यातील ३०० रस्त्यांची दुरुस्ती येत्या काळात होणार असून, एक हजाराच्या आसपास रस्त्यांची दुरुस्ती झाली आहे. हे रस्ते हमीकालावधीतील आहेत.
मुंबईत प्रामुख्याने डांबरी रस्त्यांवर खड्डे पडत असल्याने पालिकेने सिमेंटचे रस्ते तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत ज्या मार्गावर बेस्ट बस धावत होत्या त्या रस्त्यांचे प्रामुख्याने काँक्रिटीकरण करण्यात येत होते. मात्र, आता या नियमात बदल करण्यात आला आहे. सहा मीटरवरील प्रत्येक रस्त्यांचे कॉक्रिटीकरण केले जाणार आहे, असे पालिकेच्या रस्ते विभागाचे प्रमुख अभियंता राजेंद्र तळकर यांनी सांगितले. काँक्रिटीकरणामुळे रस्त्यांवरील खड्ड्यांचे प्रमाण कमी करता येईल, असा दावा पालिकेने केला आहे.
पालिकेतर्फे दरवर्षी शंभर किमीहून अधिक रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले जाते आहे. मुंबईचा विकास आराखडा २०३४ मध्ये मुंबई शहरामध्ये पडणारा मुसळधार पाऊस आणि सतत वाढणारी वाहतूक याचा विचार करून रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणावर अधिक भर देण्यात आला आहे. त्यानुसार पालिकेने रस्ते बांधणीचे नियोजन केले आहे. पालिकेच्या सन २०२१-२२च्या अर्थसंकल्पात रस्तेकामांसाठी तब्बल १८०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
१५७ रस्तेकामे प्रस्तावित
यंदाच्या मार्चपासून ऑगस्टपर्यंत सुमारे १२०० कोटींच्या निविदा रस्तेबांधणीसाठी काढण्यात आल्या आहेत. जून आणि जुलैमधील शंभर कोटीच्या निविदांचा यामध्ये समावेश आहे. यंदाच्या वर्षी १५७ किमी रस्तेकामे प्रस्तावित असून त्यात १४५ किमी सिमेंट काँक्रीट आणि १२ किमी डांबरी रस्त्यांची कामे केली जाणार आहेत.
मुंबईत एकूण रस्ते : अडीच हजार किमी
पालिकेच्या अखत्यारीत : २०५५ किमी
डिसेंबर २०२० पर्यंत : सिमेंट काँक्रिटीकरण ७५० किमी