Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
मौनी अमावस्या व्रत आणि महत्त्व
मौनी अमावस्या हे नावानुसार मौन आणि साधनेचे व्रत आहे. आपण दररोज खूप बोलत असतो तर कधी कधी जाणते अजाणतेपणी आपल्या बोलण्याने आपण समोरच्या व्यक्तीचे मन दुखावतो. बोलून झाल्यानंतर आपल्याला त्याचा पश्चाताप होतो. म्हणून साधनेसाठी मौन अत्यंत आवश्यक मानले जाते. गृहस्थाश्रमातील लोकं नेहमी मौन व्रत ठेवू शकत नाहीत म्हणून एक दिवस निश्चित केला जातो, की जी मंडळी घरसंसारात आहेत त्यांनी आत्मशुद्धीसाठी मौन व्रताचा संकल्प घ्यावा. मौनी अमावस्याला शक्य असल्यास दिवसभर मौन धारण करा आणि मानसिकरित्या भगवान शिव आणि विष्णूचे ध्यान करा किंवा स्नान करण्यापूर्वी मौन धारण करा, स्नान झाल्यावरच काही बोला आणि दिवसभर अशी कोणतीही गोष्ट बोलू नका ज्यामुळे कोणाचे तरी मन दुखावेल.
मौनी अमावस्या महत्त्व आणि माहात्म्य
मौनी अमावस्याची सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ती माघ कृष्ण चतुर्दशीजी दुसऱ्या दिवशी येते. माघ कृष्ण चतुर्दशीला शंभोशंकराचा विवाह माता पार्वतीशी ठरला होता आणि दुसऱ्या दिवशी मुनी आणि देवी देवतांनी शंभोशंकाराची साधना करून त्यांची उपासना केली होती. भगवान विष्णूने देवी पार्वतीचे भाऊ बनून त्यांच्या लग्नाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. या सर्वांमध्ये मौनी अमावस्याची एक कथा वेगळी आहे त्यानुसार, समुद्रमंथनाच्या वेळी जेव्हा असुर अमृत कलश घेऊन पळत होते, तेव्हा याच दिवशी अमृत कलशातील काही थेंब प्रयागसह अनेक ठिकाणी पडले. म्हणूनच मौनी अमावस्याला प्रयागसह इतर तीर्थक्षेत्रांमध्ये स्नान करून दानपुण्य केल्याने अनेक पटींनी लाभ होतो असे म्हणतात.
माघ महिना आणि मौनी अमावस्या दान
माघ महिन्यात तीळ, लोकरीचे कपडे आणि तूप दान करणे खूप पुण्यदायी मानले जाते. म्हणूनच मौनी अमावस्याला या वस्तूंचे दान जरूर करावे. तुम्ही खूप मोठं दान करायला हवं असं नाही, पण तुमच्या श्रद्धा आणि क्षमतेनुसार थोडं दानही तुम्ही करू शकता. यामुळे भगवान शिव प्रसन्न होतात आणि व्यक्तीला मृत्यूनंतर मोक्ष प्राप्ती होते तसेच त्या व्यक्तीला मुनिपद प्राप्त होते, अशीही मान्यता आहे.असे ही म्हणतात की, मौनी अमावस्येच्या दिवशी मानवांना पृथ्वीवर आणणारे पहिले मनुष्य मनु ऋषींचा जन्म झाला होता. मनु ऋषींच्या नावावरूनच या व्रताला मौनी अमावस्या हे नाव पडलं.
मौनी अमावस्या व्रत कथा
मौनी अमावस्या व्रताशी संबंधित प्रचलित कथेनुसार, प्राचीन काळी कांचीपुरी नावाच्या नगरात एक ब्राह्मण परिवार राहत होता. पती-पत्नी दोघेही धर्मात्मा होते आणि शास्त्र धर्माने आपली गृहस्थी चालवत होते. पतीचे नाव देवस्वामी आणि पत्नीचे नाव धनवती होते. त्यांना सात मुलगे आणि एकच मुलगी होती, तिचे नाव गुणवती होते. गुणवती आता मोठी झाली होती. ती विवाहयोग्य झाली होती. धनवतीने देवस्वामीला सांगितले, आता मुलीच्या लग्नासाठी वर शोधायला हवा. ब्राह्मणाने आपल्या धाकट्या मुलाला बोलावले आणि गुणवतीची कुंडली त्याला दिली आणि सांगितले, ‘ज्योतिषाकडून गुणवतीची कुंडली दाखवून घे, ज्यामुळे गुणवतीच्या लग्नाची बोलणी पुढे जाऊ शकतील.’ ज्योतिषाला मुलीची कुंडली दाखवली तेव्हा त्याने सांगितले की लग्न होताच मुलगी विधवा होईल. ज्योतिषीची ही बातमी जेव्हा ब्राह्मण कुटुंबाला कळली तेव्हा ते खूप दुःखी झाले आणि त्याचा उपाय विचारला.
ज्योतिषी म्हणाला, हे ब्राह्मणा, सिंहलद्वीपात सोमा धोबिण नावाची एक पतीव्रता स्त्री राहते. जर लग्नापूर्वी सोमा तुमच्या घरी येऊन पूजन करेल आणि तुम्हाला आशिर्वाद देईल तर हा दोष दूर होईल. ब्राह्मणाने आपली मुलगी गुणवती आपल्या धाकट्या मुलासोबत सिंहलद्वीपला पाठविली. दोन्ही भाऊ-बहीण समुद्रकिनारी पोहोचून त्याला पार करण्याचा विचार करू लागले. जेव्हा समुद्र पार करण्याचा कोणताही मार्ग सापडला नाही तेव्हा दोघेही भूक आणि तहानलेले एका पिंपळाच्या झाडाखाली विश्रांती घेण्यासाठी गेले. त्या झाडावर गिधाडाचं कुटुंब राहत होतं. त्यावेळी घरट्यात फक्त गिधाडाची पिल्ले होते. ती सकाळपासून भाऊ-बहिणीच्या बोलण्याकडे आणि कृतींकडे पाहत होती.
संध्याकाळी जेव्हा गिधाडाची आई पिल्लांसाठी अन्न घेऊन घरट्यात आली तेव्हा पिल्लांनी झाडाखाली झोपलेल्या भाऊ-बहिणीची कहाणी आईला सांगितली. त्यांचे बोलणे ऐकून गिधाडाच्या आईला दोन्ही भाऊ-बहिणींवर दया आली आणि पिल्लांच्या आग्रहावर ती म्हणाली, “तुम्ही काळजी करू नका, मी त्या दोघांना समुद्र पार करण्यासाठी मदत करेन.” मुलांना आईचे बोलणे ऐकून आनंद झाला. तिने मुलांना जेवू घातले आणि ती दोन्ही भाऊ-बहिणींकडे आली आणि म्हणाली, “मी तुमच्या समस्या समजून घेतल्या आहेत. तुम्ही काळजी करू नका, मी तुमच्या समस्येचे निदान करून तुम्हाला सोमा धोबिनकडे पोहोचवून देईन.” गिधाडाचे बोलणे ऐकून दोन्ही भाऊ-बहिणींचे मन आनंदित झाले आणि त्यांनी जंगलात उपलब्ध असलेली कंदमुळं खाऊन रात्र काढली. सकाळ होताच गिधाडाने दोन्ही भाऊ-बहिणींना समुद्र पार करवून सिंहलद्वीपात सोमा धोबिणीच्या घराजवळ पोहोचवले.
गुणवती सोमा धोबिणीच्या घराजवळ लपून वास्तव्य करु लागली. दररोज सकाळी उठण्यापूर्वी गुणवती सोमाचे घर आणि अंगण सारवून ठेवत असे. एके दिवशी सोमाने आपल्या सुनांना विचारले, “दररोज सकाळी आपले घर कोण सारवून ठेवते आहे?” सुनांना वाटले आता आपले कौतुक होणार आहे म्हणून त्यांनी सांगितले,”आमच्याशिवाय हे काम कोण करणार?” पण सोमाने सुनांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही आणि हे जाणून घेण्यासाठी ती संपूर्ण रात्र पहारा देत बसली. कोण आहे जो दररोज सूर्योदयापूर्वी आपलं घर छान सारवून ठेवतो आहे हा विचार तिच्या मनातून जात नव्हता. तेव्हढ्यात सोमाने पाहिले की, एक मुलगी तिच्या अंगणात आली आणि अंगण सारवायला लागली. सोमा गुणवतीकडे गेली आणि तिला विचारू लागली, “तू कोण आहेस आणि का दररोज सकाळी माझ्या घराचे अंगण सारवून ठेवते आहेस.” गुणवतीने आपली सगळ कहाणी तिला सांगितली. गुणवतीचे बोलणे ऐकून सोमा म्हणाली, “तुझ्या सौभाग्यासाठी मी तुझ्यासोबत नक्कीच येईन.”
सोमाने ब्राह्मणाच्या घरी येऊन पूजा केली, पण विधीचे विधान कोण टाळू शकते. गुणवतीचा विवाह होताच तिच्या पतीचा मृत्यू झाला. तेव्हा सोमाने आपले सर्व पुण्य गुणवतीला दान केले. सोमाच्या पुण्याने गुणवतीचा पती जिवंत झाला. पण पुण्यांच्या कमतरतेमुळे सोमाच्या पती आणि मुलांचा मृत्यू झाला. पण सोमाने आपले घर सोडण्यापूर्वी सुनांना सांगितले होते की माझ्या परतण्यापूर्वी जर माझ्या पती आणि मुलांना काही झाले तर त्यांचे शरीर सांभाळून ठेवा. सुनांनी सासूबाईंची आज्ञा मानून सर्वांचे शरीरांना सांभाळून ठेवले होते. सोमा सिंहलद्वीपला परतताना रस्त्यातच तिने पीपळाच्या झाडाच्या सावलीत विष्णुजींची पूजा करून १०८ वेळा पिंपळाच्या प्रदक्षिणा केली. त्या पुण्याच्या प्रभावामुळे सोमा घरी परतताच तिचे पती आणि मुले पुन्हा जिवंत झाली.
म्हणूनच मौनी अमावस्या व्रत करणार्यांनी ही कथा ऐकून १०८ वेळा पिंपळाच्या झाडाची प्रदक्षिणा करावी आणि भगवान विष्णू यांच्यासह शिवजींची पूजाही करावी.