Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
हायलाइट्स:
- पुण्यातील सातारा रस्त्यावर धक्कादायक प्रकार
- घसरून पडलेल्या बस वाहकाला पुन्हा ढकलून मोबाइल चोरला
- मोबाइलचोर ईश्वर भडकवाड याला अटक
पीएमपी बसवर वाहक म्हणून काम करणारे सागर नवघने हे ड्युटी संपवून घरी जात असताना रिमझिम पावसात सातारा रस्त्यावरील स्वामी विवेकानंद पुतळ्याजवळ घसरून पडले. त्यावेळी एका व्यक्तीने त्यांना मदत करण्याऐवजी त्यांना ढकलून देत त्यांच्या खिशातील मोबाइल हिसकावून नेला. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्या आरोपीला अटक केली आहे.
ईश्वर दगडू भडकवाड (रा. जय मल्हार अपार्टमेंट, दांडेकर पुल) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. या प्रकरणी सागर नवघने (वय ३१, रा. श्रीनगर सोसायटी, धनकवडी) यांनी सहकारनगर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. आरोपी ईश्वर हा पूर्वी रिक्षा चालविण्याचे काम करत होता. पण, सध्या काहीही काम करत नसून व्यसनाधीन असतो, अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी दिली.
वाचा: मोदींच्या वाढदिवशी लसीकरणाचा विक्रम; राष्ट्रवादी काँग्रेस म्हणते…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवघने हे पीएमपीमध्ये वाहक म्हणून काम करतात. १० सप्टेंबर रोजी ड्युटी संपल्यानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास ते मोटारसायकलवरून घरी जात होते. त्यावेळी रिमझिम पाऊस सुरू होता. सातारा रस्त्यावरील स्वामी विवेकानंद पुतळ्याजवळ त्यांची दुचाकी घसरून ते खाली पडले. त्यावेळी एक व्यक्ती त्यांच्याकडे धावत आली. त्यांना मदतीसाठी ती व्यक्ती धावत येत असेल असे वाटले होते. तक्रारदार नवघने हे उठण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी धावत आलेल्या व्यक्तीने त्यांना पुन्हा ढकलून दिले. त्यांच्या खिशातील १५ हजार रुपये किंमतीचा मोबाइल हिसकावला. त्यानंतर ती व्यक्ती पळून गेली. त्यानंतर नवघने हे उठले. घरी जाऊन नातेवाईकांच्या मदतीने रुग्णालयात गेले. उपचार घेतल्यानंतर त्यांनी सुरुवातीला ऑनलाइन तक्रार दिली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट दोनकडून आरोपीचा माग काढला जात होता. या मोबाइलचे ट्रेसिंग करण्यात येत होते. ईश्वर भडकवाड याने चोरलेला मोबाइल शुक्रवारी सुरू केला. त्याबरोबर पथकाला त्याची माहिती मिळाली. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, सहायक निरीक्षक वैशाली भोसले, सहायक उपनिरीक्षक यशवंत आब्रे, हवालदार नामदेव रेणुसे यांच्या पथकाने आरोपी ईश्वर याला अटक केली. त्यानंतर या प्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सहकारनगर पोलीस अधिक तपास करत आहेत.
वाचा: तेव्हा कोणी कोथळा काढायची भाषा केली नव्हती: शरद पवार