Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

नेस्लेचा दुटप्पीपणा! भारतातील बालकांसाठीच्या पूरक आहारामध्ये अतिरिक्त साखर

10

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

गरीब राष्ट्रांतील बालकांसाठीच्या पूरक आहाराच्या उत्पादनांबाबत बहुराष्ट्रीय कंपन्या अन्य विकसित राष्ट्रांच्या तुलनेत कसा भेदभाव करतात, हे उघड झाले आहे. नेस्ले या कंपनीने भारतासह गरीब राष्ट्रांतील बालकांसाठीच्या पूरक आहाराच्या उत्पादनांमध्ये अतिरिक्त साखरेचा समावेश केला आहे. मात्र ब्रिटनसह युरोपातील बाजारपेठांमधील उत्पादनांमध्ये मात्र अतिरिक्त साखरेचा समावेश नसल्याचे समोर आले आहे.

नेस्लेने भारतात २०२२मध्ये पूरक आहाराच्या उत्पादनांच्या विक्रीचा २५ कोटी अमेरिकी डॉलरचा टप्पा पार केला होता. मात्र एवढा मोठा खप असलेल्या या कंपनीच्या भारतातील ‘सेरेलॅक’मध्ये घासागणिक सुमारे तीन ग्रॅम साखर आढळली आहे. ‘पब्लिक आय’ ही स्वित्झर्लंडमधील तपास संस्था आणि आयबीएफएएन (आंतरराष्ट्रीय बालकांचे अन्नपदार्थ कृती गट) यांनी नेस्लेच्या आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेत विकल्या जाणाऱ्या बालकांसाठीच्या पूरक आहार उत्पादनांचे नमुने बेल्जियन प्रयोगशाळेत पाठवल्यानंतर ही बाब उघडकीस आली. यासंदर्भातील अहवाल बुधवारी जाहीर करण्यात आला. जर्मनी, फ्रान्स आणि ब्रिटनमध्ये सहा महिन्यांच्या बालकांसाठी विकल्या जाणाऱ्या गहूयुक्त पूरक आहारात अतिरिक्त साखरेचा समावेश करण्यात आला नव्हता. मात्र इथिओपिया आणि थायलंडमध्ये विकल्या जाणाऱ्या याच आहारात प्रत्येक घासागणिक पाच ग्रॅमपेक्षाही अधिक अतिरिक्त साखरेचा समावेश होता, असे अहवालात उघड झाले आहे.

जागतिक आरोग्य संघटना म्हणते…

आयुष्याच्या सुरुवातीच्या टप्प्यातच साखरेच्या चवीशी संपर्क आल्यास आयुष्यभरासाठी साखरयुक्त पदार्थांना प्राधान्य देण्याची सवय लागू शकते. त्यामुळे लठ्ठपणा, अन्य आजार होण्याचा धोका असतो, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. ‘अहवाल सादर केल्यानंतर ‘अशा दुटप्पीपणाचे समर्थन केले जाऊ शकत नाही,’ अशी प्रतिक्रिया जागतिक आरोग्य संघटनेचे शास्त्रज्ञ निगेल रोलिन्स यांनी दिली. जागतिक आरोग्य संघटनेने सन २०२२मध्ये बालकांसाठीच्या पूरक आहारात अतिरिक्त साखर किंवा शर्करा यांवर बंदी घालण्याचे तसेच, उद्योगांनी यासंदर्भात त्यांच्या उत्पादनांत सुधारणा करण्याचे आवाहन केले होते.

साखर टाळण्याचा वेबसाइटवर सल्ला

विशेष म्हणजे, नेस्लेच्या वेबसाइटवरही बालकांच्या पूरक आहाराविषयी सल्ला देताना, अतिरिक्त साखरेचा समावेश न करण्याची शिफारस केली आहे. ‘आपल्या बाळासाठी अन्न तयार करताना त्यात अतिरिक्त साखर समाविष्ट करू नका किंवा त्याला साखरयुक्त पेय देऊ नका. तसेच, आघाडीचे पोषणतज्ज्ञ आणि आरोग्य तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, लहान मुलांना पहिल्या वर्षी फळांचे रस देऊ नयेत, कारण त्यांच्यात नैसर्गिक साखरेचे प्रमाण तुलनेने अधिक असते. गोड पदार्थांचा समावेश असलेले ज्यूस व इतर पेये टाळा, पदार्थांवरील लेबल तपासा,’ असेही या वेबसाइटवर नमूद करण्यात आले आहे. मात्र गरीब देशांमध्ये विकल्या जाणाऱ्या उत्पादनांना हा नियम कंपनी लागू करत नाही, हे समोर आले आहे.

बालकांच्या अन्नपदार्थांतून ३० टक्के साखर कमी केली

गेल्या पाच वर्षांत भारतात बालकांसाठीच्या पूरक आहारातून साखरेचे प्रमाण ३० टक्क्यांहून कमी केल्याचा दावा नेस्ले इंडियाने केला आहे. ‘साखरेचे प्रमाण कमी करणे ही कंपनीची प्राथमिकता आहे. आम्ही नियमितपणे आमच्या उत्पादनांचा आढावा घेऊन आणि पोषण, गुणवत्ता, सुरक्षा तसेच चवीच्या बाबतीत तडजोड न करता अतिरिक्त साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठी त्यात सुधारणा घडवत असतो,’ असे नेस्ले इंडियाच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.