Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

शाहबाज शरीफ दुसऱ्यांदा बनले पाकिस्तानचे पंतप्रधान, देशाला कर्जातून बाहेर काढण्याचे आश्वासन

5

वृत्तसंस्था, इस्लामाबाद : पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ (पीएमएल-एन) पक्षाचे ज्येष्ठ नेते शाहबाज शरीफ यांची पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी रविवारी निवड झाली. ३३६ सदस्यसंख्या असणाऱ्या पाकिस्तानच्या संसदेत पंतप्रधानपदी निवड होण्यासाठी किमान १६९ मतांची आवश्यकता होती. पाकिस्तान पीपल्स पार्टी व अन्य पक्षांसोबत आघाडी केलेल्या शाहबाज यांच्या बाजूने २०१ मते पडली. शाहबाज सलग दुसऱ्यांदा पाकिस्तानचे पंतप्रधान झाले आहेत.

‘आपला देश सध्या कर्जबाजारी असला तरी त्याला कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करीन,’ अशी ग्वाही पाकिस्तानचे नवनिर्वाचित पंतप्रधान शाहबाज शरीफ (७२) यांनी रविवारी देशवासीयांना दिली.

‘पीटीआय’चा गदारोळ

पाकिस्तानच्या संसदेत पंतप्रधानपदासाठी रविवारी मतदान झाले. मात्र त्यापूर्वी ‘पाकिस्तान तेहरिके इन्साफ’च्या (पीटीआय) खासदारांनी प्रचंड गदारोळ घातला व घोषणाबाजी केली. ‘आझादी’ व (तुरुंगात असणारे इम्रान खान यांच्या संदर्भात) ‘कैदी ८०४’ या घोषणा त्यांनी दिल्या. त्यांना प्रत्युत्तर म्हणून पीएमएल-एन पक्षाच्या खासदारांनी ‘नवाझ शरीफ जिंदाबाद’ या घोषणा दिल्या. अखेर या मतदानात शाहबाज यांना २०१ मते; तर इम्रान खान यांच्या पक्षाचे उमेदवार ओमर अयूब खान यांना ९२ मते मिळाली. यानंतर सभागृहाचे अध्यक्ष सरदार अयाझ सादिक यांनी पंतप्रधान म्हणून शाहबाज यांच्या नावाची घोषणा केली. शाहबाज हे आज, सोमवारी अध्यक्ष भवनात पंतप्रधानपदाची शपथ घेतील.

काय आहे पार्श्वभूमी?

शाहबाज यांनी यापूर्वी एप्रिल २०२२ ते ऑगस्ट २०२३ या कार्यकाळात देशाचे पंतप्रधानपद सांभाळले होते. कर्जबाजारी झालेल्या पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून आर्थिक मदत मिळवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. निवडणूक घेण्यासाठी पाकिस्तानची संसद ऑगस्ट २०२३मध्ये भंग करण्यात आली होती. गेल्या महिन्यात ८ तारखेस झालेल्या निवडणुकीत पीएमएल-एन ७५ जागांवर विजय मिळवत सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरला. मात्र बहुमतासाठी आवश्यक संख्याबळ गाठू न शकल्याने या पक्षाने पीपीपी, मुत्तहिदा कौमी मूव्हमेंट, पाकिस्तान मुस्लिम लीग (क्यू), बलूचिस्तान आवामी पार्टी, पाकिस्तान मुस्लिम लीग (झेड), इस्तेहकाम-ए-पाकिस्तान पार्टी व नॅशनल पार्टी या पक्षांशी आघाडी करत सरकार स्थापन केले.
‘मविआ’त तिढा कायम, नेमकं कुठं अडलं? वंचितची काय असणार भूमिका? प्रकाश आंबेडकर स्पष्टच बोलले
काश्मीरचा जुनाच राग आळवला

शाहबाज यांनीही पाकिस्तानी पंतप्रधानांच्या प्रथेप्रमाणे काश्मीरचा राग आळवला. आपण सर्वांनी एकत्र येऊन काश्मीर व पॅलेस्टाइनच्या स्वातंत्र्यासाठी एकमताने ठराव करायला हवा, असे आवाहन त्यांनी सभागृहास केले. आम्ही शेजारी देशाशी संबंध राखू इच्छितो. मात्र हे संबंध बरोबरीचे असावेत, असेही ते म्हणाले.

शाहबाज म्हणाले…

– आपण एकत्र येऊन देशाचे भवितव्य बदलण्याचा प्रयत्न केला तर देवाच्या इच्छेने आपण सर्व आव्हानांवर मात करू शकू.
– आपल्या पुढील आव्हाने कठीण आहेत, मात्र अशक्य नाहीत.
– एक दिवस आपण कर्जमुक्त व स्वयंपूर्णही होऊ.
– जगातील आघाडीच्या देशांचा गट असणाऱ्या जी-२०चे सदस्यत्व २०३०पर्यंत मिळविण्याचे उद्दिष्ट.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.