Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

अणुचाचणीच्या भूमीत धर्मसत्ता प्रबळ; धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न, मतदार भाजपच्या उमेदवारावर नाराज

11

पोखरण (राजस्थान) : भारताने केलेल्या ऐतिहासिक अणुचाचण्यांची भूमी पोखरण आजच्या काळातही धार्मिक ध्रुवीकरणाचे केंद्र बनली आहे. एकीकडे विकसित राष्ट्रासाठी संकल्प केला जात असताना आणि संरक्षण क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने आत्मनिर्भर होत असताना ज्या भूमीमध्ये ‘बुद्ध हसला…’ आणि ज्या भूमीत ’शक्ती’चं दर्शन घडलं ती भूमी राजकीय हेवेदावे आणि धर्माच्या आधारावर केली जाणारी मतविभागणी यामध्येच अडकलेली दिसते.

जोधपूर लोकसभा मतदारसंघात पोखरण येते. जोधपूरकडून पोखरणकडे जाताना मटोलचक, खारा, हनुमानपूर अशी काही छोटी गावे लागतात. सगळीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रचारफलक दिसतात, तर त्याचसोबत काँग्रेसचे फलकही लक्ष वेधून घेतात. गेल्या काही दशकांपासून पोखरणच्या राजकारणाची सारी मूळं जात आणि धर्मात असल्याचे जाणवते. या भागात तब्बल ५५ टक्के मते मुस्लिम समाजाकडे आहे. हिंदू धर्मीयांकडून भाजपचे महंत प्रताप पुरी आणि मुस्लिमांकडून गाझी फकीर यांचे पुत्र काँग्रेसचे सालेह महंमद आपापलं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी धडपडताना दिसतात.

महंतांप्रमाणे शेखावत यांना साथ?

सन २०१८ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत महंत प्रताप पुरी अवघ्या ८७२ मतांनी पराभूत झाले होते. वसुंधरा राजे यांच्या गटातील असलेले पुरी पराभूत झाल्यानंतर गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीत मात्र ते विजयी झाले आहेत. त्यातही अजून एक गोष्ट म्हणजे जोधपूर मतदारसंघातून भाजपने रिंगणात उतरविलेले गजेंद्रसिंह शेखावत यांचे आणि महंत प्रताप पुरी यांचे फारसे सख्य नाही. वसुंधराराजेंच्या गटातील असलेल्या पुरींना पराभूत करण्यासाठी सन २०१८ मध्ये खुद्द शेखावत पडद्यामागून हालचाली करीत होते, असं इथले काही लोक खासगीत सांगतात. सन २०२३ मध्ये झालेल्या निवडणुकीत मात्र पुरी जिंकून आले आणि वरचढ राहिले. महंतांच्या मागे उभे राहिलेले मतदार यंदा शेखावत यांना मत देतील का, हाच इथला खरा कळीचा मुद्दा आहे.

शेखावतांविरोधात नाराजी

पहिल्या अणुचाचणीवेळी अतिशय छोटे असलेले पोखरण आता बऱ्यापैकी सुधारले आहे, असे येथील ७१ वर्षीय स्थानिक नागरिक लक्ष्मी नारायण म्हणतात. ‘आम्ही मत देणार ते मोदींसाठीच. त्यांनी राममंदिरासाठी प्रयत्न केले, त्यामुळे आमचे मत त्यांना. मात्र, गजेंद्रसिंह शेखावत यांनी आमच्यासाठी काहीही केले नाही. त्यांच्याकडून आमच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत,’ असेही ते निक्षून सांगतात, तर दुसरीकडे शेखावत यांचे प्रतिस्पर्धी करणसिंह उचियारडा यांना मुस्लिमांची मते मिळू शकतात, असं मानणाराही एक मोठा वर्ग इथं आहे. ‘शेखावत आणि महंत प्रताप पुरी यांच्यातील विशेष ‘प्रेम आणि सख्य’ इथल्या मतदारांच्याही अगदी डोक्यात फिट्ट बसलं आहे. भाजपचा स्थानिक नेता केवळ अंतर्गत राजकारण आणि कुरघोड्यांमुळे ८७२ मतांनी पडला. आता जरी पुन्हा आम्ही भाजपला मत दिले, तर ते मोदींसाठी असेल,’ शेखावत यांच्यासाठी नाही, असं स्थानिक व्यापारी दिनेश शर्मा म्हणाले. विधानसभेत काही मुस्लिमांनीही महंत प्रताप पुरी यांना मतदान केले आहे, असं इथले स्थानिक पत्रकार म्हणतात. त्यामुळेच ते ३५ हजारांच्या मताधिक्याने विजयी झाले. राजकीय पक्ष जरी धर्माच्या आधारावर मतं मागत असले तरीही मतदारांची ‘गणितं’ काही वेगळीच असतात, हेच इथं दिसतं.

भाजपला राम म्हणण्याचा किंवा रामाचा नाव घेण्याचा अधिकार नाही, आडम मास्तर भडकले

गाझी फकीर कोण होते?

मुस्लिम धर्मगुरू आणि सालेह महंमद यांचे वडील गाझी फकीर हे एक वादग्रस्त व्यक्तिमत्त्वं होतं. सीमेवरून तस्करी, नकली नोटांची विक्री यांसह अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्यांच्यावर दाखल होते. तीन वर्षांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला. मात्र, त्यांचा इथल्या स्थानिक राजकारणावर मोठा दबदबा होता, अशी आठवण स्थानिकांनी सांगितली. काही जणांच्या मते आमीर खानच्या गाजलेल्या ‘सरफरोश’ सिनेमात सीमेवरील गावांमधील दाखवलेली तस्करी आणि शस्त्रांच्या व्यापाराचे संदर्भही गाझी फकीर यांच्या आयुष्याशी संबंधित आहेत.

गजेंद्रसिंह शेखावत यांना मतदारसंघासाठी कोट्यवधी रुपये मिळाले. मात्र, त्यांनी ते खर्च केले नाहीत. माझ्यासारख्या काही जणांची विचारधारा हिंदुत्वाची आहे. आम्ही भाजपला मतदान करू. मात्र, ते शेखावत यांच्याकडे पाहून नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पाहूनच.-हरिकिशन (पोखरण येथील पान टपरी व्यावसायिक)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.