Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

कोलम्बिया विद्यापीठातील आवाज शांत; कॅलिफोर्निया विद्यापीठात आंदोलनाला हिंसक वळण

11

न्यूयॉर्क: पॅलिस्टिनींच्या समर्थनार्थ अमेरिकेतील विद्यापीठांच्या कॅम्पसमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनात आघाडीवर असलेल्या न्यूयॉर्कमधील कोलम्बिया विद्यापीठाचा आवाज बुधवारी शांत झाला होता. आदल्या रात्री आंदोलक विद्यार्थ्यांनी ताब्यात घेतलेल्या विद्यापीठाच्या इमारतीमध्ये पोलिसांनी घुसून विद्यार्थ्यांना हुसकावून लावत डझनभर आंदोलकांना अटक केली. तर, देशाच्या दुसऱ्या कोपऱ्यात लॉस एंजेल्समधील कॅलिफोर्निया विद्यापीठात दोन गटांमध्ये संघर्ष उडाला.

कोलम्बिया विद्यापीठाच्या प्रशासनाने मदत मागितल्यानंतर मंगळवारी रात्री उशिरा न्यूयॉर्क पोलिसांनी कॅम्पसमध्ये येऊन येथील आंदोलकांच्या छावण्या हटवल्या. दुसऱ्या मजल्यावरील खिडकीतून घुसून पोलिसांनी आंदोलकांच्या ताब्यातील हॅमिल्टन हॉलही मोकळा केला. आंदोलकांनी हॉलचा ताबा घेऊन त्याची नासधूस केल्याचे समजल्याने आमच्यासमोर पोलिसांना पाचारण करण्याशिवाय पर्याय नव्हता, असे स्पष्टीकरण विद्यापीठातर्फे देण्यात आले. तर, ताबा घेणाऱ्या आंदोलकांमधील अनेक जण विद्यापीठाशी संबंधित नव्हते, असा दावा न्यूयॉर्कचे महापौर आणि पोलिसांनीही केला.

काही आंदोलक कॉलेजच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर उभे होते. पोलिसांनी त्यांना ढकलून हा रस्ता मोकळा केला. पोलिसांनी कॉलेजच्या ध्वजस्तंभावर फडकणारा पॅलेस्टाइनचा झेंडा हटवून तिथे अमेरिकेचा ध्वज फडकवला. आता १७ मे रोजी होणाऱ्या पदवीप्रदान सोहळा निर्विघ्नपणे पार पडेपर्यंत पोलिसांचा कॅम्पसमध्ये मुक्काम असणार आहे.

कॅलिफोर्निया विद्यापीठाबाहेर आंदोलनाला हिंसक वळण लागले. पॅलेस्टिनी समर्थक आणि इस्रायल समर्थक एकमेकांवर खुर्च्या फेकून मारत होते. एकमेकांना धक्काबुक्की केली जात होती, लाथा मारल्या जात होत्या. तर, काहींनी एकमेकांना लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली. त्यामुळे तातडीने पोलिसांना बोलावण्यात आले. त्यानंतर मंगळवारी येथील सुरक्षाव्यवस्था कडक करण्यात आली आहे. हम्बोल्ड्ट येथील कॅलिफोर्निया स्टेट पॉलिटेक्निक विद्यापीठातील दोन इमारतींवर आंदोलकांनी एक आठवड्यापेक्षा अधिक काळ ताबा मिळवला होता. मंगळवारी पोलिसांनी येथेही घुसून २५ जणांना अटक केली.

मतदान घेण्याची तयारीब्राऊन विद्यापीठाच्या प्रशासनाने मंगळवारी आंदोलकांशी यशस्वी वाटाघाटी केल्या. इस्रायलशी आर्थिक संबंध तोडण्याबाबत मतदान घेण्याच्या आश्वासनाच्या बदल्यात आंदोलकांनी कॅम्पसमधील छावण्या हटवण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे आर्थिक संबंध तोडण्याबाबत मतदान घेण्याबाबत सकारात्मक निर्णय घेणारे हे पहिलेच अमेरिकी कॉलेज ठरले आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.