Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मराठी माणसावर भाजपची भिस्त! गुजरातचे किंगमेकर सी.आर.पाटील यांचा चढता राजकीय प्रवास

10

महेश पठाडे, सुरत (गुजरात) : सुरतमध्ये स्थलांतरित झालेल्या राजस्थानी, उत्तर भारतातील नागरिकांनंतर मराठी माणसांचा टक्का आहे. मात्र, तरीही एका मराठी माणसाने गुजरातच्या राजकारणावर उत्तम पकड मिळवली आहे. त्यामागचे कारण म्हणजे प्रत्येक समाजातील माणसाला जोडून साधलेले उत्तम संघटनकौशल्य. हा मराठी माणूस आहे सी. आर. पाटील उर्फ चंद्रकांत रघुनाथ पाटील. गुजराती नसलेले ते पहिलेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ते अत्यंत विश्वासू सहकारी मानले जातात. गुजरातमध्ये भाजपचे सक्षम नेतृत्व करण्याची क्षमता सी. आर. पाटील यांच्या रूपाने मराठी माणसाच्या शिरावर आहे. त्यामुळे गुजरातमध्ये सर्व २६ जागा जिंकून ते तिसऱ्यांदा ‘क्लीन स्विप’ देऊ शकतील का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सी. आर. पाटील नवसारी लोकसभा मतदारसंघातून २००९, २०१४, २०१९ असे सलग तीन वेळा विजयी झाले आहेत. २०१९मध्ये त्यांनी विक्रमी सहा लाख ८९ हजार मताधिक्याने विजय मिळवला. या वेळी ते चौथ्यांदा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. मात्र, त्यांच्यावर केवळ नवसारीची नाही, तर संपूर्ण गुजरातची जबाबदारी आहे. भाजपने २०१४, २०१९ असे सलग दोनदा सर्व २६ लोकसभेच्या जागा जिंकल्या. या वेळीही क्लीन स्विप देण्याचा दावा भाजपकडून केला जात असला, तरी ते सोपे नाही. मात्र, तरीही सी. आर. पाटील यांनी दांडगा जनसंपर्क आणि उत्तम संघटन कौशल्यावर सर्व जागा जिंकण्याचा आत्मविश्वास व्यक्त केला आहे.

कोण आहेत सी. आर. पाटील?

सी. आर. पाटील मूळचे जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरचे. पन्नासच्या दशकात त्यांचे वडील गुजरातमध्ये स्थायिक झाले. वडील गुजरात पोलिससेवेत होते. सी. के. पाटील यांचे शिक्षण सुरतमध्ये झाले. ते पोलिससेवेत दाखल झाले. मात्र, इथे त्यांना ‘संघटनकौशल्य’ नडले, असेच म्हणावे लागेल. कारण सुरतमध्ये त्यांनी पोलिसांची संघटना काढण्याचा प्रयत्न केल्याने त्यांना निलंबित करण्यात आले. नंतर एका प्रकरणात त्यांच्यावर पुन्हा निलंबनाची कारवाई झाली. त्यानंतर त्यांनी पोलिस सेवेचा राजीनामा दिला आणि एक सहकारी बँक सुरू केली. मात्र, ती अडचणीत आल्याने त्यांना तुरुंगातही जावे लागले होते. त्यातून बाहेर पडत १९८९मध्ये ते भाजपमध्ये दाखल झाले आणि मग त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही.

पन्ना समितीवर आघाडी घेण्याचे गणित

सी. आर. पाटील यांचा स्वत:चा संपर्क दांडगा आहेच, पण त्यांची संपूर्ण भिस्त पन्ना समितीवर अधिक आहे. गुजरातमध्ये गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांनी जे घवघवीत यश मिळवले, ते या पन्ना समितीवरच. अर्थात, जेथे उमेदवार पराभूत झाले ते अवघ्या १५०० ते २०००च्या फरकाने. ही पन्ना समिती आता भाजपने देशपातळीवर राबवण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरे म्हणजे गुजरातमध्ये सी. आर. पाटील यांच्या रोज पाच-सहा सभा होतात, तर नवसारी मतदारसंघात ते प्रत्येक मतदाराची खबरबात घेत असतात. घर बंद असेल तर ते का बंद आहे, कुटुंबीय कुठे गेले याची संपूर्ण माहिती कार्यकर्त्याकडून घेतात, असे त्यांचे विश्वासू छोटूभाई पाटील सांगतात. बाहेरच्या राज्यातील कोणत्याही राष्ट्रीय नेत्याला त्यांनी गुजरातमध्ये पाचारण केलेले नाही. अपवाद अमित शहा यांचा आहे. अर्थात, ते गांधीनगरमध्ये त्यांच्या मतदारसंघात आले होते.

खान्देशी माणसांचे नेटवर्क

सी. आर. पाटील यांच्या अत्यंत विश्वासू लोकांमध्ये दोन जणांचा उल्लेख आवर्जून करावा लागेल. ते म्हणजे छोटूभाई पाटील आणि लिंबायतच्या आमदार संगीता पाटील. हे दोन्ही खान्देशातील. छोटूभाई पाटील जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील. चोरवड हे त्यांचे गाव. श्री मराठा पाटील मंडळाच्या माध्यमातून त्यांची सी. आर. पाटील यांच्याशी ओळख झाली आणि आता ४० वर्षे झाली, छोटूभाई पाटील सावलीसारखे त्यांच्यासोबत आहेत. सी. आर. पाटील यांच्या गैरहजेरीत ते संपूर्ण कार्यालय सांभाळतात. भाजपचे सुरत शहराचे माजी उपाध्यक्ष असलेले छोटूभाई पाटील यांची चोरवडला शेती आहे. अधूनमधून ते गावी जातात. मात्र, सुरतशी त्यांचे नाते घट्ट झाले आहे.
गुजरात: ‘पाटीलसाब’ घेणार का दहा लाखांची आघाडी? कॉंग्रेससमोर मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान
खान्देशकन्येने जिंकली मने

सी. आर. पाटील यांच्या अत्यंत विश्वासू असलेल्या संगीता पाटील मूळच्या जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील. सारवे बुद्रुक हे त्यांचे गाव. संगीता पाटील यांना पाच भावंडे (दोन भाऊ आणि तीन बहिणी.). मोठा भाऊ पालघरमध्ये पोलिस उपनिरीक्षक आहे. त्यांचे सासर शिरपूरचे. त्यांचे सासरे सुरतमध्ये पोलिस सेवेत होते. त्यामुळे लग्नानंतर संगीता पाटील सुरतमध्येच स्थायिक झाल्या. राजकारणात येण्यापूर्वी आय विटनेस या स्थानिक चॅनेलमध्ये त्या न्यूज अँकर होत्या. दहा-बारा वर्षे त्यांनी काम केले. नंतर त्यांनी सन २००७मध्ये महिला मंडळ स्थापन केले. भाजपमध्ये सक्रिय झाल्यानंतर २०१०मध्ये त्यांनी सुरत महापालिकेची उमेदवारी मागितली होती. ती मिळाली नाही. मात्र, २०१२मध्ये त्यांना थेट लिंबायत विधानसभेची उमेदवारी मिळाली. सव्वालाख मुस्लिम वस्ती, तर इतर हिंदू मतदार आहेत. त्यातही २१ राज्यांतील लोक आहेत. अशा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडून येणे हेच माझ्यासाठी आव्हानात्मक आहे, असे संगीता पाटील यांनी सांगितले. गुजरातमधील कानाकोपऱ्यातील भाजप नेत्यांशी संगीता पाटील यांचा संवाद आहे. सी. आर. पाटील यांच्या गैरहजेरीत संगीता पाटील सर्व जबाबदाऱ्या सक्षमपणे सांभाळतात.

खासदारकीच्या उमेदवारासारखंच चॅलेंज द्या आणि घ्या, संजय काकांना प्रतिक पाटलांनी स्पष्टच सांगितलं

मुख्यमंत्रिपदापेक्षा मोठी जबाबदारी

नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर गुजरातची जबाबदारी सी. आर. पाटील सक्षमपणे सांभाळत आहेत. त्यांना मुख्यमंत्रिपदाची जबाबदारीही मिळू शकली असती. मात्र, स्थानिक अस्मितेचा प्रश्न उभा ठाकला असता. बिगर गुजराती माणूस मुख्यमंत्रिपदावर बसवणे भाजपला परवडणारे नव्हते. मात्र, मुख्यमंत्रिपदापेक्षा भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची मोठी जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली आहे. गुजरातमध्ये त्यांचा शब्द खाली पडू दिला जात नाही. यावर येथील एका स्थानिक पत्रकाराने एक आठवण सांगितली. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांची मुलाखत सुरू असताना सी. आर. पाटील समोर बसलेले होते. मुलाखत सुरू असताना ते निघून चालले असता, भूपेंद्र पटेल यांनी मुलाखत थांबवून सी. आर. पाटील यांना अदबीने विचारले, ‘पाटीलसाब तुम्ही निघाले का?..’ यातच त्यांचे महत्त्व अधोरेखित होते. आता त्यांनी प्रत्येक उमेदवाराला साडेपाच लाखांच्या मताधिक्याने निवडून येण्याचे लक्ष्य दिले आहे. त्यांना स्वत:ला दहा लाखांवर मताधिक्याने निवडून येण्याचा विश्वास आहे. एकूणच ही निवडणूक मराठी माणसाच्या संघटनकौशल्याची कसोटी पाहणारी आहे. ते इंडिया आघाडीला तिसऱ्यांदा क्लीन स्विप देणार का, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.