Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
‘ईव्हीएम’च्या विश्वासार्हतेबाबत येथील नागरिकांत ही चर्चा आहे. ‘पब्लिक किल्पी हुई हे. क्या चल रिया है, समझ में नहीं आ रिया…’ ‘किल्पी’ म्हणजे?’ ‘चिडलेली!’ लगेच उत्तर मिळते. ‘ईव्हीएमध्ये छेडछाड होणार असेल तर मग मत देऊन काय उपयोग,’ असा प्रश्न एक हमीदिया मार्गावरील भोपाळवासी करतो. शहराच्या दुसऱ्या कोपऱ्यावरील; म्हणजे ‘एम्स’ भागातील एका व्यावसायिकाला ‘ईव्हीएम’विषयी विचारले असता ते म्हणतात, ‘गडबड तो लगती है!’ सर्वोच्च न्यायालयाने याबाबतचे संभ्रम दूर केले आहेत, अशी माहिती पुरविली असता म्हणतात, ‘ते काहीही असो…’ बोर्ड ऑफिस चौकातल्या एका व्यक्तीला विचारले असता, ‘गडबडी’ची शंका आहेच म्हणतो. एम. पी. नगरातील एक-दोघांना विचारले असता हाच सूर उमटला अधिकाधिक मतदान व्हावे यासाठी मध्य प्रदेश प्रशासन जोरदार तयारी करीत आहे.
भाजपच्या हक्काच्या प्रयोगभूमीत
भोपाळ लोकसभा मतदारसंघ भाजपसाठी हक्काची प्रयोगभूमी आहे. १९८९पासून ही जागा या पक्षाकडे आहे. सुशीलचंद्र वर्मा हे येथून १९८९ ते १९९८ या काळातील चार निवडणुकांत विजयी झाले. त्यानंतर भाजपने दरवेळी उमेदवार बदलला. उमा भारती, कैलाश जोशी, अशोक संजार, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर हे येथून निवडून आले. ठाकूर यांनी दिग्विजयसिंह यांचा पराभव करून लोकसभेत पाऊल ठेवले होते. पक्षाने ठाकूर यांच्याऐवजी आलोक शर्मा यांना संधी दिली. काँग्रेसकडून अरुण श्रीवास्तव लढत आहेत.
बम ‘धमाक्या’चे हादरे
इंदूरमध्ये काँग्रेसने अक्षयकांती बम यांना उमेदवारी जाहीर केली. ते अर्ज भरणार होते. तत्पूर्वी सतरा वर्षे जुन्या एका गुन्ह्याच्या प्रकरणात त्यांच्याविरुद्ध न्यायालयाच्या आदेशावरून हत्येच्या प्रयत्नाचा ताजा गुन्हा दाखल झाला आणि चित्र बदलले. रातोरात बम भाजपवासी झाले. आता तेथे काँग्रेसचा उमेदवारच नाही. या बम ‘धमाक्या’चे हादरे राजधानीत जाणवत आहेत.
प्रचार संपला
प्रचाराच्या अखेरच्या दिवशी रविवारी राजधानीचे हे शहर दैनंदिन कामांत व्यग्र होते. रविवार असल्याने सुट्टीचा फील वातावरणात जाणवत होता. बाजारपेठांतील दुकाने बंद होती. रस्तोरस्ती उन्हाला उसाच्या रसाची जोड होती. सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास रेल्वे स्थानक परिसरातील अल्पना तिराहावर दोन पोलिस त्यांना मिळालेल्या ‘इलेक्शन ड्युटी’चे शेड्युल पाहत होते. दारूची दुकाने रविवारी सायंकाळी सहा वाजतापासून मतदान संपेपर्यंत बंद राहणार असल्याने या दुकानांसमोर एकच गर्दी होती.