Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
ओम बिर्ला यांना यंदा कॅबिनेटमंत्री न केल्यामुळे त्यांच्याकडेच हे पद पुन्हा ठेवले जाण्याचीही शक्यता आहे. भाजपच्या पूर्वेतिहासाानुसार आपले पक्ष फोडण्याचे प्रयत्न झाले, तर लोकसभाध्यक्षपद ही आपल्यासाठी आयुर्विमा पॉलिसी ठरेल, असा जोरदार मतप्रवाह तेलुगू देसम व नितीशकुमारांचा जेडीयू या दोन्ही पक्षांत आहे. लोकसभाध्यक्षपद अन्य पक्षांकडे देण्यास भाजप नेतृत्व तयार नसल्याने चंद्राबाबूंवर सौम्य दबाव म्हणून पुरंदरेश्वरी यांचे नाव भाजपमध्ये समोर आले आहे.
पुरंदरेश्वरी या चंद्राबाबूंच्या पत्नी नारा भुवनेश्वरी यांच्या भगिनी आहेत. एकेकाळी चंद्राबाबू यांनी आपले सासरे एन. टी. रामाराव यांचे सरकार उलथवून लावले तेव्हा पुरंदरेश्वरी यांनी त्यांना उघड पाठिंबा दिला होता. अशा स्थितीत त्यांना लोकसभाध्यक्ष बनवल्यास नायडू यांच्यावर अव्यक्त दबाव येईल, अशी आशा भाजपला आहे. शिवाय पुरंदरेश्वरी या आंध्रच्या राजकारणातील प्रभावशाली कम्मा समाजाच्या आहेत व हा समाज चंद्राबाबूंचा पारंपरिक मतदार मानला जातो. डी. पुरंदरेश्वरी यांच्या निमित्ताने भाजपला नायडूंच्या पक्षाच्या पारंपरिक व्होटबँकेत चंचुप्रवेश करण्याची दारेही खुली होतील.
ओम बिर्ला यांच्यासाठी एका मोठ्या भूमिकेचे दरवाजे खुले आहेत, असे भाजप सूत्रांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ला सांगितले. पुन्हा लोकसभाध्यक्ष झाल्यास ते या पदाच्या विक्रमाची बरोबरी करतील. तसे न झाल्यास ते भाजप राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीतही असतील व दोन्ही न झाल्यास राजस्थान भाजप प्रदेशाध्यक्ष त्यांची वाटच पाहत असल्यासारखी स्थिती आहे. यावेळी भाजपला लोकसभेत पूर्ण बहुमत नाही व विरोधक अत्यंत सशक्त असल्याने लोकसभा म्हणजे फक्त गदारोळ करणे, हे समीकरण १५ वर्षांनी भाजपवरच उलटण्याची चिन्हे स्पष्ट आहेत.
आगामी काळात महाराष्ट्र, बिहार, हरयाणा, दिल्ली या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. निवडणुकीत फायदा मिळवण्यासाठी भाजप यापैकी कोणत्याही एका राज्यातून अध्यक्षपदासाठी नेत्याचे नाव निवडू शकते. मराठा समाजाप्रमाणेच राजस्थानमधील जाट आणि राजपूत समाज या लोकसभा निवडणुकीत भाजपवर प्रचंड नाराज होते व आहेत. मुरलीधर मोहोळ, भगीरथ चौधरी आदींना राज्यमंत्री केल्याने या समाजांची नाराजी दूर होणार नाही, हे भाजपचे दोन्ही सर्वोच्च नेतेही जाणतात.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
… तर बिर्ला यांच्या नावावर आणखी एक विक्रम
बिर्ला यांना दुसऱ्यांदा लोकसभा अध्यक्ष बनवल्यास आणि त्यांनी या पदावर आपला दुसरा कार्यकाळही पूर्ण केला, तर त्यांच्या नावावर आणखी एक विक्रम नोंदवला जाऊ शकतो. सलग दोनदा निवडून आलेले आणि आपला कार्यकाळ पूर्ण करणारे बलराम जाखड हे गेल्या साडेतीन दशकांतील एकमेव लोकसभा अध्यक्ष आहेत. चंद्राबाबूंच्या पक्षाचे जीएमसी बालयोगी, पी. ए. संगमा यांसारखे नेते दोनदा लोकसभेचे अध्यक्ष झाले. परंतु दोघांनाही पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आला नव्हता. बलराम जाखड यांनी १९८० ते १९८९ या दोन्ही कालावधींत आपले कार्यकाळ पूर्ण केले होते.