Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
मनुष्य बऱ्याच वेळा आपल्या स्थितीला परमेश्वराला दोष देत असतो, त्याला असे वाटते की परमेश्वराच्या मनात असेल तर आपले जीवन बदलू शकते. आपल्या जीवनाची दोरी आपण परमेश्वराच्या हाती देऊन स्वतःला एक बाहुली समजत असतो. पण प्रत्यक्षात परमेश्वराशी असे नाते जोडणे योग्य आहे का? आपले नशिब घडण्यात आणि बिघडण्यात फक्त परमेश्वरच जबाबदार आहे का? याचा विचार आपण करायला हवा. मनुष्य जेव्हा संकटात असतो, तेव्हा तो वारंवार परमेश्वराकडे तक्रार करू लागतो, माझी परीक्षा घेऊ नको. पण खरोखर परमेश्वर तुमची परीक्षा घेत असतो का?
खरोखर परमेश्वर तुमची परीक्षा घेतो का?
आध्यात्मिक गुरू सद्गुरू यासंदर्भात असे म्हणतात, जेव्हा भक्तावर एखादे संकट येते, तेव्हा भक्त स्वतःच असे म्हणतो, परमेश्वर त्याची परीक्षा घेत आहे. पण वस्तुस्थिती अशी आहे की परमेश्वर कोणाची परीक्षा घेत नाही, परमेश्वराला याची गरज नाही आणि मुख्य म्हणजे परमेश्वराकडे इतका वेळही नाही. परमेश्वराने तुम्हाला ओळखण्याची कोणतीच गरज नसते. कारण परमेश्वर तुम्हाला चांगल्या प्रकारे ओळखतो, त्या परमपित्या परमेश्वरापासून काहीही लपून राहिलेले नाही. परमेश्वराला आपली मनःस्थिती, बाह्यस्थिती, भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान सर्व माहिती आहे. अशात परमेश्वराला आपली परीक्षा घेण्याची आवश्यकता का भासेल? याचा कधी विचार केला आहे का तुम्ही? परीक्षा अशा व्यक्तीची घेतली जाते, ज्याला आपण ओळखत नाही. जेव्हा भक्तांवर एखादे संकट येते तेव्हा ते त्याच्या कर्माचे फळ असते आणि ज्याला आपण परीक्षा समजतो.
परमेश्वर तुमची परीक्षा कशी घेतो?
तर दुसरीकडे या संदर्भात प्रेमानंद महाराज यांचा दृष्टिकोन वेगळा आहे. प्रेमानंद महाराजांचे म्हणणे असे आहे, जीवनात चढउतार येऊ शकतात, त्यात तुम्ही कसे निर्णय घेता ही तुमची परीक्षा असते. जेव्हा तुम्ही परमेश्वराची भक्ती करता, तेव्हा तुमच्या मनात अनेक मोहमाया उत्पन्न होत असतात. मला हे मिळू दे, मला ते मिळू दे असे अशा अनेक मागण्या तुम्ही परमेश्वराकडे करता. तुमच्या मनातील सर्व सुप्त इच्छा बाहेर येतात, यामुळे तुमचे मन भक्तीपासून भटकते आणि त्या सुखांकडे आकर्षित होते. जेव्हा तुम्ही काही चांगले करत असता आणि तेव्हा जर तुमच्या आयुष्यात एखादं संकट आलं किंवा वाईट स्थिती उत्पन्न, तर अशावेळी परमेश्वरावरील आपला विश्वास डळमळू लागतो.
तुम्ही स्वतः निर्णय घ्यावेत?
देव आपल्यालाच का संकटात टाकतो असे प्रश्न मनात उभे राहतात. आपल्याला वाटते परमेश्वर आपली परीक्षा घेत आहे. पण ते आपल्या जागृतीसाठी असते, आपल्या विकासासाठी असते. कारण परमेश्वराला तुम्हाला त्याच्या हातचे बाहुले बनवायचे नसते. परमेश्वराला उलट असे वाटत असते की तुम्ही स्वतः निर्णय घ्यावेत. तुमच्या मनात आत्मविश्वास निर्माण व्हावा आणि पूर्ण विचाराने कर्मांची निवड तुम्ही करावी. स्वतःचे नशिब तुम्ही स्वतःच घडवावे. लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या कर्माने नशिबाचा निर्णय करत असता, आणि तुम्हाला असे वाटते की सर्व काही परमेश्वर करत आहे.