ऑगस्ट महिन्यातील चौथा शुक्रवार हा भुसावळ तालुक्यासाठी काळ‘वार’ ठरला. अतिशय मंगलमय वातावरणात देवदर्शनासाठी गेलेल्या वरणगावसह पंचक्रोशीतील सुसरी, पिंपळगाव खुर्द, गोळेगाव, तळवेल, आचेगाव येथील ८२ पैकी ४१ भाविकांच्या बसला नेपाळमध्ये पशुपतिनाथ यांच्या दर्शनाला जाताना अपघात झाला. त्यात बसमधील २७ जणांचा मृत्यू, तर १६ जण जखमी झाले. यातील मृत भाविकांमध्ये अनेक घरातील कर्ते पुरुष व महिला; तसेच दोन ते तीन दाम्पत्य व एका आठवर्षीय परी नामक मुलीचादेखील समावेश आहे.
कुटुंबात उरले आजी आणि नातू
वरणगावातील गणेश नगरातील अध्यात्माची आवड असणाऱ्या सरोदे कुटुंबातील चारही जणांचा मृत्यू झाला. आता या परिवारात आजी आणि नातू एवढेच राहिले आहेत. संदीप राजाराम सरोदे (वय ५०) हे त्यांची पत्नी, मुलगी, भाऊ, वहिनी व पुतण्या यांच्यासह तीर्थयात्रेला गेले. या अपघातात संदीप सरोदे यांची पत्नी पल्लवी सरोदे (वय ४५), मुलगी गोकर्णी संदीप सरोदे (वय २२) व पुतण्या अनुप हेमराज सरोदे यांचा मृत्यू झाला. भाऊ हेमराज सरोदे (५२) व वहिनी रूपाली सरोदे गंभीर जखमी झाल्या आहेत. संदीप सरोदे यांच्या आई मंदा व मुलगा शुभम तीर्थयात्रेला गेले नव्हते. मृत गोकर्णी ही जळगाव शहरातील आयएमआर महाविद्यालयात एमबीएचे शिक्षण घेत होती; तर पुतण्या अनुप हा काही महिन्यांपूर्वीच पुण्याला खासगी कंपनीत नोकरीला लागला होता. संदीप यांचा विटभट्टीचा व्यवसाय होता.
आईसोबत बोलता न आल्याने शुभमला चटका
जावळे वाड्यातील माजी नगरसेवक सुधाकर जावळे, त्यांची पत्नी व त्यांच्या परिवारातील दोघांचा मृत्यू झाला. या वेळी त्यांच्या मुलाला शुभमला अश्रू आवरेना झाले आहेत. गुरुवारी रात्री वडील पोखराला पोहचल्यावर त्यांचा फोन आला. आई बाहेर असल्याने तिच्याशी बोलणे होऊ शकले नाही. सकाळी काठमांडूला पोहचल्यानंतर त्यांना फोन करणार होतो, मात्र त्या आधीच त्यांच्या वाहनाचा अपघाताची वार्ता धडकल्याने शुभमच्या मनाला चटका लागला आहे. शुभमने अपघातात आपल्या आई-वडिलांसह काकू व चुलत भावाला गमावले.