Mahayuti : विधानसभेच्या तोंडावर महायुतीत वादाचा नवा अंक सुरु झाला आहे. शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा कलगीतुरा रंगलेला मागील एक आठवड्यापासून पाहायला मिळत आहे. अशातच महायुतीत सर्व काही आलबेल असल्याचे वरवर नेते दाखवत असले तरी मात्र अंतर्गंत कलह आता चव्हाट्यावर येऊ लागले आहेत.
याआधीच शिवसेनेचे नेते आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादीसोबत कॅबिनेटमध्ये सोबत बसत असलो तरी बाहेर आल्यावर उलटी होते. असे विधान केले होते. याच वादग्रस्त विधानावरून महायुतीत वाद चव्हाट्यावर आला होता. त्यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी सावंत यांना ‘एक्स’वर प्रत्युत्तर दिले. ‘जे खेकड्यामुळे धरण फुटले म्हणू शकतात, हाफकिन संस्थेला माणूस म्हणू शकतात, धाराशीव येथील भैरवनाथ साखर कारखान्याचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते करू शकतात आणि अजित पवार यांच्याकडून निधी घेऊ शकतात ते काहीही बोलू शकतात,’ अशी उपरोधिक टीका मिटकरींनी केली होती. एकंदरीत महायुतीत विधानसभेच्या तोंडावर रोज नवनवे वाद चव्हाट्यावर आलेले दिसत आहेत.
तर वड्डेटीवारांचे अन्न पाणी बंद होईल..
दरम्यान, अजित पवार मोदींच्या जीवावर जगत असल्याचा हल्लाबोल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. याच विधानाचा खरपूस समाचार घेत अमोल मिटकरी यांनी वक्तव्यावर पलटवार केला आहे. विजय वडेट्टीवार हेच चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध धंद्यांच्या भरोशावर जगत असल्याचा आरोप आमदार मिटकरी यांनी केला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाली तर वडेट्टीवार यांचे अन्न पाणी बंद होईल, असा टोला सुद्धा आमदार मिटकरी यांनी लगावला.
मिटकरींचा महायुतीला सल्ला
भाजपने लाडकी बहीण योजनेचा श्रेय एकट्याने न उचलता महायुतीतील सर्व पक्षांनी घेतला तर याचा चांगला परिणाम आगामी विधानसभेच्या निवडणुकीत मिळेल असा सल्लाही मिटकरी यांनी दिला आहे. जर महायुती असे करत नसेल तर तुमचे राजकीय भविष्याचे काही खरे नाही असा सल्ला मिटकरींनी महायुतीला दिला आहे.