Pratap Sarnaik Net Worth : सरनाईक यांची जंगम मालमत्ता ५६ कोटी ३० लाख ९७ हजार २८३ इतकी तर स्थावर मालमत्ता २१४ कोटी ९७ लाख ४२ हजार ३६४ असल्याचे समोर आले आहे
ओवळा-माजिवडा मतदार संघातून प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रामध्ये २०२३-२४ चे उत्पन्न २ कोटी ९ लाख ५७ हजार तर पत्नीचे उत्पन्न २९ लाख ९० हजार ८०० इतके दर्शवले आहे. सरनाईक यांचे वय ६० वर्षे असून त्यांची जंगम मालमत्ता ५६ कोटी ३० लाख ९७ हजार २८३ इतकी तर स्थावर मालमत्ता २१४ कोटी ९७ लाख ४२ हजार ३६४ असल्याचे समोर आले आहे. त्यांच्या पत्नी परिषा सरनाईक यांची जंगम मालमत्ता ४४ कोटी ३८ लाख ५५ हजार ४६६ इतकी तर स्थावर मालमत्ता १७ कोटी ६६ लाख इतकी आहे.
Pratap Sarnaik Wealth : अबबबबब!!! सरनाईकांची संपत्ती दहा-बारा नव्हे तब्बल २७० कोटींवर, पाच वर्षांत कोट्यवधींची भर
सरनाईक यांच्यावर १९४ कोटी ४३ लाख २३ हजार ७०९ रुपयांची देणी असून पत्नी परिषा यांची देणी ५ कोटी ५६ लाख ८ हजार ४९६ इतकी आहेत. २०१९ च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रामध्ये सरनाईक यांनी २१ कोटी ८९ लाख ६९ हजार १६३ रुपयांची जंगम आणि १०४ कोटी ४० लाख १० हजार २०० रुपयांची स्थावर मालमत्ता दर्शवली होती. या तुलनेत त्यांची संपत्ती पाच वर्षांमध्ये दुपटीपेक्षा अधिक वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवाय त्यांची देणी २०१९ मध्ये ११० कोटी ९६ लाख ५८ हजार इतकी होती त्यामध्येही दुपटीने वाढ होऊन १९४ कोटी ४३ लाख २३ हजार इतकी झाली आहेत. हॉटेल व्यवसाय, बांधकाम व्यवसाय अशा माध्यमातून त्यांनी ही संपत्ती मिळाल्याचे म्हटले आहे. सरनाईक यांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे.
विरोधी उमेदवारही कोट्याधीश
प्रताप सरनाईक यांच्या विरोधात शिवसेना उबाठा गटाकडून नरेश मणेरा यांनी उमेदवारी अर्ज भरला असून त्यांची जंगम मालमत्ता ३ कोटी ६१ लाख तर स्थावर मालमत्ता २४ कोटी ६ लाख अशी एकुण २७ कोटींच्या आसपास आहे. नरेश मणेरा यांचे शिक्षण बारावी पास असून मालमत्तांचे भाडे आणि इन्व्हेस्टमेंटमधून उत्पन्न मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
कल्याण-भिवंडीतून कोट्याधीश रिंगणात
कल्याण पूर्वेतून कॉंग्रेसचे सचिन पोटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला असून त्यांची जंगम मालमत्ता ७६ लाख ४८ हजार असून स्थावर मालमत्ता ८४ लाख ६१ हजार इतकी आहे. त्यांच्या पत्नीची मालमत्ता ७३ लाख ८१ हजार इतकी आहे. याशिवाय भाजपचे महेश चौघुले यांनी भिवंडी पश्चिममधून उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांची जंगम मालमत्ता १ कोटी २३ लाख तर स्थावर मालमत्ता ५ कोटी ५८ लाख आहे. चौघुले विकासक आणि मोटर्स शोरूम तसेच शेतकरी आहेत. तर त्यांच्या पत्नी ट्युशन क्लासेस चालवतात. त्यांच्या पत्नीचे उत्पन्न ४१ कोटी १५ लाख जंगम तर ३ कोटी ८० लाख स्थावर इतकी आहे.