हायलाइट्स:
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाशिकमध्ये महाराष्ट्र पोलिस अकादमीतील विविध विकासकामांचे उद्घाटन केले.
- मी आता हॉकी स्टिक वापरत नाही, पण शिवसेनेचा शाखाप्रमुख होतो तेव्हा माझ्याकडे भरपूर हॉकी स्टिक होत्या- छगन भुजबळ.
- सरकारमध्ये आल्यानंतर हॉकिस्टिक सांभाळून वापरावी लागते- मुख्यमंत्र्यांचा भुजबळांना मिश्किल सल्ला.
नाशिक: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर असून त्यांनी आज महाराष्ट्र पोलिस अकादमीतील विविध विकासकामांचे उद्घाटन केले. हे कार्यक्रम व्हर्च्युअल न करता मुख्यमंत्री प्रत्यक्ष नाशकात हजर झाले. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या भाषणातील मुद्द्याचा धागा पकडून मु्ख्यमंत्र्यांनी हॉकीस्टिकवर भाष्य केले. सरकारमध्ये आल्यानंतर हॉकिस्टिक सांभाळून वापरावी लागते, असा मिश्किल सल्ला मुख्यमंत्र्यांनी भुजबळ यांना दिला. मुख्यमंत्र्यांचा हा पहिलाच नाशिक दौरा होता.
या कार्यक्रमाला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ उपस्थित होते. या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी हॉकी स्टिकवर भाष्य केले. भुजबळ म्हणाले की, तुम्ही हॉकी स्टिक वापरता का असा प्रश्न मला विचारण्यात आले. तेव्हा मी म्हणालो की मी आता हॉकी स्टिक वापरत नाही. मात्र जेव्हा मी शिवसेनेते असताना शाखा प्रमुख होतो, त्या वेळी माझ्याकडे बऱ्याच हॉकी स्टिक होत्या. त्यावर मुख्यमंत्री पालकमंत्री भुजबळ यांना उद्देशून मिश्किलपणे म्हणाले की आता तुम्ही सरकारमध्ये आहात. आता हॉकी स्टिक सांभाळून वापरावी लागेल.
क्लिक करा आणि वाचा- अविनाश भोसलेंना ईडीचा मोठा दणका; ४ कोटींची मालमत्ता केली जप्त
मुख्यमंत्र्यांचे मास्क न घालता पहिलेच भाषण
या कार्यक्रमात संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी नाशिक प्रशानाचे कौतुक केले. करोनाच्या परिस्थितीतही नाशिकमध्ये चांगले काम झाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मास्क न घालता भाषण केले. मी पहिल्यांदाचा आज जाहीर कार्यक्रमात मास्क काढला, आज मी मास्कशिवाय बोलतोय, असे मुख्यमंत्री म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा- धार्मिक स्थळे, हॉटेल, मॉल्स कधी सुरू होणार?; मुख्यमंत्री म्हणाले…
‘गोल्ड मेडल असेच मिळत नाही’
महाराष्ट्र पोलिस अकादमीतील ही विकासकामे पाहून मुख्यमंत्री प्रभावित झाले. येथील विस्तीर्ण मैदाने पाहून मुख्यमंत्री म्हणाले की मलाही येथे हॉकी खेळण्याची इच्छा होत आहे. तसेच ट्रॅकवर देखील धावावेसे वाटते. यावेळी त्यांनी खेळाडू घडवण्याच्या मुद्द्यावर विशेष भर दिला. गोल्ड मेडल काही असेच मिळत नाही. ते कमवावे लागते. त्यामागे सरकारने ताकद लावावी लागते. जर सरकारने आपली ताकद लावली नाही तर मग सरकारचे काम काय आहे असे मुख्यमंत्री म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा- पुणेकरांसाठी मोठी घोषणा; निर्बंधात मोठी शिथिलता, हॉटेल व्यवसायिकांना मोठा दिलासा
इंग्रजकालीन असलेल्या या वास्तूचा परिसर विस्तीर्ण आहे. येथे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. यापैकी काही सुविधा तयार झाल्या आहेत. त्यात कंपोझिट इनडोअर फायरिंग रेंज, सिंथेटिक ट्रॅक, अॅस्ट्रोटर्फ फुटबॉल व हॉकी मैदान, व्हॉलीबॉल व बास्केटबॉल मैदान आणि निसर्ग उद्यान (नैसर्गिक जलशुद्धीकरण प्रकल्प) या विकासकामांचा समावेश आहे.