(फोटो सौजन्य : टाइम्स ऑफ इंडिया)
डिपार्टमेंट ऑफ पर्सनल एंड ट्रेनिंग विभागाने गुरुवारी या सुट्ट्यांविषयी घोषणा केली. अयोध्येतील राम मंदिरातील राम लल्लाच्या मूर्तीच्या अभिषेक आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त २२ जानेवारी २०२४ रोजी सर्व केंद्र सरकारी कार्यालये अर्धा दिवस बंद राहतील.
जारी केलेल्या मेमोमध्ये असे म्हटले आहे की “अयोध्येतील प्रभू श्री रामचंद्राच्या अभिषेकाचा कार्यक्रम आयोध्येसह देशातील विविध भागात उत्साहपूर्ण वाटवरणाता संपूर्ण भारतभर हा सोहळा साजरा केला जाईल. कर्मचार्यांना समारंभात सहभागी होता यावे याकरता, देशातील सर्व केंद्रीय सरकारी कार्यालये, संस्था आणि केंद्रीय औद्योगिक आस्थापना २२ जानेवारी रोजी दुपारी २.३० वाजेपर्यंत म्हणजे अर्ध्या दिवसासाठी बंद राहतील.
याशिवाय अनेक राज्यांनीही यानिमित्ताने दिवसभर सुट्टी जाहीर केली आहे. त्या राज्यांची यादी तुम्ही खाली पाहू शकता.
1) उत्तर प्रदेश : युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दिवशी राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय, यादिवशी संपूर्ण राज्यात दारू विक्रीवरही बंदी घालण्यात आली आहे.
2) महाराष्ट्र : अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारकडूनही सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अयोध्येत होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय घेतला आहे. यामध्ये २२ जानेवारी रोजी शाळा, कॉलेज आणि कार्यालये बंद राहणार आहेत. केंद्रीय कर्मचाऱ्यांना हाफ डे देण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर राज्य सरकारकडून ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
3) छत्तीसगड : छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई यांनी गुरुवारी जाहीर केले की, अयोध्येतील राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व सरकारी कार्यालये २२ जानेवारी रोजी दुपारी २.३० वाजेपर्यंत बंद राहतील.
4) मध्य प्रदेश : मुख्यमंत्री मोहन यादव यांनी मध्यप्रदेशातील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. लोकांना हा दिवस एखाद्या सणासारखा साजरा करण्यास प्रोत्साहित केले आहे. याशिवाय राज्यात ड्राय डे घोषित करण्यात आला आहे.
5) गोवा : गोवा सरकारने अयोध्येतील रामजन्मभूमी मंदिरातील ‘प्राणप्रतिष्ठा’ सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सरकारी कर्मचारी आणि शाळांना २२ जानेवारीला सुट्टी जाहीर केली आहे.
6) हरियाणा : हरियाणा सरकारनेही राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर २२ जानेवारीला शाळा बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. अभिषेक सोहळ्याच्या दिवशी राज्यात कुठेही मद्यपान करण्यास परवानगी दिली जाणार नाही.
7) ओडिशा : अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर अभिषेक सोहळ्यानिमित्त २२ जानेवारी रोजी ओडिशातील सर्व सरकारी कार्यालये अर्ध्या दिवसासाठी बंद राहतील. “अयोध्येतील राम लल्ला प्राण प्रतिष्ठाच्या पार्श्वभूमीवर, ओडिशा सरकारने सर्व सरकारी कार्यालये, तसेच महसूल आणि दंडाधिकारी न्यायालये (कार्यकारी), २२ जानेवारी २०२४ रोजी दुपारी २.३० वाजेपर्यंत अर्धा दिवस बंद राहतील.
8) आसाम : २२ जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आसाम सरकारने या दिवशी अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केली. त्यामुळे राज्यातील सर्व शासकीय कार्यालये आणि शैक्षणिक संस्था दुपारी २.३० वाजेपर्यंत बंद राहणार आहेत.
9) त्रिपुरा : त्रिपुरातील सर्व सरकारी कार्यालये आणि शैक्षणिक संस्था २२ जानेवारी रोजी दुपारी २.३० वाजेपर्यंत बंद राहतील जेणेकरून कर्मचारी अयोध्येतील राम लल्ला प्राण प्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होऊ शकतील. त्रिपुरा सरकारचे उपसचिव असीम सहाय यांनी हा आदेश जारी केला आहे.