लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर राष्ट्रवादीत; स्वागत करताना अजित पवार म्हणाले…

हायलाइट्स:

  • अखेर सुरेखा पुणेकर यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
  • उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षात दाखल
  • राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या कलावंतांचं स्वागत करत अजित पवारांनी केलं महत्त्वाचं आवाहन

मुंबई : राजकारणातील एण्ट्रीआधीच चर्चेत आलेल्या लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी आज अखेर राष्ट्रवादीचा झेंडा (Surekha Punekar joins NCP) हाती घेतला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सुरेखा पुणेकर आणि गायिका देवयानी बेंद्रे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

यावेळी बोलताना अजित पवार यांनी सुरेखा पुणेकर यांच्या कामाचं कौतुक केलं. ‘सुरेखा पुणेकर यांचं मंचावरील काम उभ्या महाराष्ट्राने पाहिलं आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेब मुख्यमंत्री असल्यापासून राज्य सरकारने कलाकारांना प्रोत्साहन देण्याचं काम केलं आहे. त्यानंतर‌ही महाराष्ट्राच्या अनेक मुख्यमंत्र्यांनी कलेची जपणूक करण्याची ही परंपरा‌ सुरु ठेवली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये‌ जसे सर्व जाती धर्मातील लोक आहेत त्याप्रमाणेच विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचा देखील सहभाग असला पाहिजे, ही आदरणीय शरद पवारसाहेबांची भूमिका आहे,’ असं अजित पवार म्हणाले.

ओबीसी आरक्षणः देवेंद्र फडणवीसांच्या त्या टीकेवर अजित पवारांचे प्रत्युत्तर; म्हणाले…

राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या कलावंतांना अजित पवारांनी काय आवाहन केलं?

‘आज प्रवेश केलेल्या सर्व मान्यवरांचे मी पक्षात स्वागत करतो. काही जणांना विविध संघटनांमध्ये वा इतर ठिकाणी सामावून घेतले जाईल. त्याठिकाणी त्यांनी काम करावे. तसंच पुढील काळात जिल्हा परिषद, सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत,’ असं आवाहन अजित पवार यांनी केलं आहे.

आणखी कोणत्या नेत्यांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश?

मुंबई महानगरपालिकेतील माजी विरोधी पक्षनेते बबनराव गवस, मनसेच्या महिला पदाधिकारी मनिषा खैरे, अशोकराव सवने, प्रभाकर शेट्ये, संजय त्रिपाठी, सुरेश बागवे, नितीन पाटील, ओंकार गवस यांनीदेखील राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी अजितदादा पवार यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले. तसेच जे नवीन सदस्य पक्षप्रवेश करत आहेत, त्यांच्यासोबत सुसंवाद ठेवून त्यांना पक्षाच्या विविध कार्यक्रमांमध्ये सामावून घ्यावे अशी सूचनाही केली. चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाच्यावतीने हा पक्ष प्रवेश घेण्यात आला होता.

दरम्यान, या प्रवेश सोहळ्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी पक्षात प्रवेश केलेल्या सर्व मान्यवरांना शुभेच्छा देऊन त्यांचं स्वागत केलं.

Source link

ajit pawarsurekha punekarअजित पवारराष्ट्रवादीसुरेखा पुणेकरसुरेखा पुणेकर लावणी
Comments (0)
Add Comment