मीडिया रिपोर्ट्सनुसार, भोले बाबा नेहमी पांढरे कपडे घालतात. तसेच, त्यांच्या खोलीत फक्त तरुणींना प्रवेश मिळत होता, अशीही माहिती आहे. हाथरस येथे झालेल्या घटनेत आतापर्यंत १२१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, अनेकजण जखमी झाले आहेत.
उत्तर प्रदेश पोलिस ते भोले बाबापर्यंतचा प्रवास
नारायण साकार विश्व हरि हा भोले बाबा बनण्यापूर्वी उत्तर प्रदेश पोलिसांत कॉन्स्टेबल सूरज पाल सिंह या नावाने ओळखला जात होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ५८ वर्षीय सूरज पाल सिंह हा कासगंज जिल्ह्यातील बहादुर नगर गावातील एका दलित कुटुंबातील आहे. या घटनेनंतर आता त्याची खरी ओळख समोर आली आहे. एक दशकापर्यंत पोलिस दलात नोकरी केल्यानंतर भोले बाबाने नोकरी सोडली. त्याची अखेरची पोस्टिंग ही आग्रा येथे होती.
भोले बाबा याचं लग्न झालेलं असून त्यांना मुलं नहीत. सूरज पाल सिंहने पोलिसची नोकरी सोडल्यानंतर आपलं नाव भोले बाबा ठेवलं. त्याच्या पत्नीला माताश्री म्हणून ओळखलं जातं. भोले बाबाने पाच वर्षांपूर्वी गाव सोडलं.
हाथरसच्या सत्संगमध्ये नेमकं काय झालं?
मंगळवारी हाथरस येथे भोले बाबाचं सत्संग होतं. सत्संगला भक्तांनी लाखोच्या संख्येने गर्दी केली होती. सत्संग संपल्यानंतर जेव्हा भोले बाबा त्याच्या गाडीने निघाला तेव्हा त्याच्या चरणाची धूळ म्हणजेच माती घेण्यासाठी लोकांनी धाव घेतली. अचानक इतक्या संख्येने लोकांची झुंबड उडाल्याने काही लोक खाली पडले आणि इतर लोक त्यांच्या अंगावर चढून पुढे गेले. या घटनेत १२१ जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर भोले बाबा फरार असल्याची माहिती आहे.