Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Fake MHADA Website: फसवणुकीत म्हाडा अधिकारी? बनावट वेबसाइटप्रकरणी २ जणांना अटक, धक्कादायक माहिती समोर

7

मुंबई : म्हाडाची बनावट वेबसाइट सुरू करून त्याआधारे घरांसाठी अर्ज करणाऱ्यांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. कल्पेश सेवक आणि अमोल पटेल, अशी त्यांची नावे आहेत. कल्पेश याने ही बनावट वेबसाइट तयार केली, तर अमोल हा स्वतः म्हाडा अधिकारी असल्याचे भासवत होता. गुन्हेगारी पार्श्वभूमीवर असलेल्या या दोघांचा म्हाडा कार्यालयात राबता असून, त्यांच्याकडून म्हाडाशी संबंधित अनेक कागदपत्रे हस्तगत करण्यात आली आहेत. त्यामुळे या प्रकरणात म्हाडा अधिकारी आणि कर्मचारी यांचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

काय आहे प्रकरण?

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने (म्हाडा) मुंबईतील विविध गृहप्रकल्पांतील २०३० सदनिकांची सोडत नुकतीच जाहीर केली. म्हाडाच्या घरांना वाढता प्रतिसाद पाहता काही ठगांनी संधीचा गैरफायदा घेण्यास सुरुवात केली आहे. या ठगांनी म्हाडाच्या अधिकृत वेबसाइटशी नामसाधर्म्य असणारी बनावट वेबसाइट तयार केली आणि त्याद्वारे अर्ज आणि अनामत रक्कम स्वीकारून अर्जदारांची फसवणूक केली. ही बाब लक्षात येताच म्हाडाच्या वतीने वांद्रे-कुर्ला येथील सायबर पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. या तक्रारीची गंभीर दखल घेत उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर आणि गुन्हे शाखेची वेगवेगळी पथके तयार करण्यात आली. पोलिस निरीक्षक बाळासाहेब कानवडे यांच्यासह इतर पथकांनी तांत्रिक पुरावे आणि मानवी कौशल्य पणाला लावून कल्पेश सेवक आणि अमोल पटेल या दोघांना अटक केली.

माफक दरात तसेच सरकारी कोट्यामधून घर मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवून फसवणूक केल्याचे अनेक गुन्हे कल्पेश सेवक आणि अमोल पटेल या दोघांवर आहेत. हे दोघेही म्हाडा कार्यालयात एजंट म्हणून वावरतात. या दोघांकडून काही कागदपत्रे हस्तगत करण्यात आली आहेत. त्याचबरोबर म्हाडाच्या घरखरेदीबाबतची संपूर्ण प्रक्रिया दोघांना माहीत आहे. त्यानुसारच त्यांनी बनावट वेबसाइट तयार केली होती. त्यांची गुन्हेपद्धत, त्यांच्याकडे सापडलेली कागदपत्रे, त्यांचा म्हाडा कार्यालयामध्ये असलेला राबता पाहता यामध्ये म्हाडा अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या सहभागाची दाट शक्यता असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
म्हाडाचं घर घ्यायचा विचार करताय? सावधान; होऊ शकतो मोठा स्कॅम, बनावट वेबसाइटच्या जाळ्यात फसाल!
बनावट वेबसाइटवर अर्ज करणाऱ्यांच्या मोबाइल क्रमांकावर हे दोघे संपर्क करायचे. लॉटरीमध्ये सहजासहजी घरे लागत नसून, त्यासाठी वशिला लावला लागत असल्याचे ते अर्जदाराला सांगायचे. अमोल हा म्हाडा अधिकारी असल्याचे भासवून घर निश्चित करण्यासाठी पैसे घ्यायचा. आरोपींनी किती जणांकडून नेमकी किती रक्कम स्वीकारली याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

‘फसवणूक झालेल्यांची संख्या वाढणार’

आत्तापर्यंत केलेल्या तपासामध्ये सात ते आठ नागरिकांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. मात्र, आरोपींची सखोल चौकशी बाकी आहे, तसेच याबाबत आणखी तक्रारदार पुढे येऊ शकतात. तांत्रिक पुराव्यांच्या आधारेही या दोघांनी किती जणांना फसविले याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी म्हटले असून, तक्रारदार आणि फसवणूक झालेली रक्कम वाढण्याची शक्यता आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.