Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

‘स्थानिकां’चा वरचष्मा की युती-आघाडीला संधी? सेनेचा बालेकिल्ला पालघर विधानसभेची स्थिती काय?

6

Palghar Vidhan Sabha: मागील निवडणुकीत शिवसेना-भाजप एकत्र होते. ‘बविआ’सोबत असलेला काँग्रेस-राष्ट्रवादी (शप)आता महाविकास आघाडीमघ्ये आहे. महायुती आणि महाविकास आघाडी रिंगणात असणार आहे.

महाराष्ट्र टाइम्स
palghar vote

वैष्णवी राऊत/नरेंद्र पाटील/मच्छिंद्र आगिवले/अनिरुद्ध पाटील, पालघर : जिल्ह्यातील वसई, नालासोपारा आणि बोईसर या तीन मतदारसंघांत बहुजन विकास आघाडीचे (बविआ) आमदार असून, पालघरमध्ये शिवसेनेचे श्रीनिवास वनगा, विक्रमगडमध्ये शरद पवार गटाचे सुनील भुसार आणि डहाणू मतदारसंघात विनोद निकोले आमदार आहेत. स्थानिक पक्ष असूनही ‘बविआ’ने या मतदारसंघावर आपला वरचष्मा ठेवला आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीत इथे हेमंत सावरा निवडून आल्याने भाजपचे या मतदारसंघातील विधानसभा क्षेत्रात स्वारस्य वाढले आहे. ‘बविआ’साठी ही अस्तित्वाची लढाई आहे, तर युती-आघाडी पालघर जिंकण्यासाठी जोर लावणार आहे. त्यामुळे मतदार इथे कुणाला संधी देणार, हे महिनाभरात स्पष्ट होणार आहे.

स्थानिक मतदार निर्णायक
वसई

वसई हा जवळपास तीन लाख ५१ हजार मतदार असलेल्या मतदारसंघ असून, तो नायगावपासून वसई ते अर्नाळा असा मुख्यतः पश्चिम पट्ट्यात पसरला आहे. या मतदारसंघात पूर्वीपासून राहणाऱ्या स्थानिक मतदारांची संख्या मोठी आहे. या भागात कोळी, आगरी, वाडवळ, भंडारी, ख्रिस्ती, मुस्लिम आणि गुजराती असे विविध जाती-धर्मांचे मतदार असून, त्यांची मते निर्णायक आहेत.

वसई मतदारसंघ हा ‘बविआ’चा बालेकिल्ला समजला जातो. पक्षाध्यक्ष तथा विद्यमान आमदार हितेंद्र ठाकूर हे या मतदारसंघातून १९९०पासून निवडणूक लढवत आहेत. सातपैकी सहा वेळा पक्षाने हा मतदारसंघ हातात ठेवला आहे. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर, ‘ही माझी शेवटची निवडणूक असेल’, असे ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले होते. मात्र २०२४च्या निवडणुकीआधी पुन्हा निवडणूक लढवणार असल्याचे सांगत ते रिंगणात उतरले आहेत. वसईतून महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे विजय पाटील पुन्हा इच्छुक आहेत. मागील निवडणुकीत ते शिवसेनेत होते. तेव्हा त्यांचा ठाकूर यांनी जवळपास २६ हजार मतांनी पराभव केला होता. आता महायुतीतर्फे भाजपचे मनोज पाटील, रामदास मेहेर अशा संभाव्य उमेदवारांचेदेखील आव्हान असणार आहे. मागील निवडणुकीत शिवसेना-भाजप एकत्र होते. ‘बविआ’सोबत असलेला काँग्रेस-राष्ट्रवादी (शप)आता महाविकास आघाडीमघ्ये आहे. महायुती आणि महाविकास आघाडी रिंगणात असणार आहे. शिंदे गटदेखील सक्रिय झाला आहे. त्यामुळे येथील स्थानिक मतदार नेमके कोणाला साथ देतात, यावर या मतदारसंघाचा निर्णय ठरणार आहे.
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपींनी सांगितलं धक्कादायक कारण, भाईसाठी केलं…
बविआ’ गड राखणार?
नालासोपारा

नालासोपारा जिल्ह्यातील सर्वाधिक म्हणजे जवळपास पाच लाख ९८ हजार मतदार असलेला मतदारसंघ आहे. वैतरणापासून ते बरफ पाडा, विरारमधील समेळपाडा, बोळींज, तुळींज, वलई पाडा, मनवेलपाडा अशी याची हद्द आहे. या मतसंघात परप्रांतीय मतदार सर्वाधिक असून, त्यांची संख्या ४६ टक्क्यांच्या घरात आहे. तेथील समस्यांवर ‘बविआ’कडून नेहमी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जातो. शिवाय महापालिकेमध्ये सत्ता असल्यामुळे या भागातील प्रत्येक प्रश्न सोडवण्याचा या पक्षाकडून केला जात असल्याने इथे ‘बविआ’ला मानणारा मोठा वर्ग आहे.

२००९मध्ये वसई मतदारसंघ विभागून तयार करण्यात आलेल्या नालासोपारा मतदारसंघात आतापर्यंत ‘बविआ’चेच वर्चस्व राहिले आहे. पक्षाचे क्षितिज ठाकूर सलग तीन वेळा निवडून आले असून यंदाही ते रिंगणात आहेत. २०१९च्या निवडणुकीत सेना-भाजप युती होती. नालासोपारा हा भाजपने बांधलेला मतदारसंघ होता. पक्षाचे राजन नाईक त्यावेळी इच्छुक असताना शिवसेनेने नालासोपारा आपल्या पदरात पाडून घेत उत्तर भारतीय मतदारांच्या जोरावर चकमकफेक अधिकारी प्रदीप शर्मा यांना उमेदवारी दिली. त्यावेळी भाजपची नाराजी ‘बविआ’च्या पथ्यावर पडली क्षितीज ठाकूर ४३ हजार मतांनी निवडून आले. परंतु आता शिवसेनेकडून हा मतदारसंघ भाजपने पुन्हा मिळवला आहे. यामध्ये महायुतीतर्फे भाजपने राजन नाईक यांना उमेदवारी जाहीर केली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीतर्फे पंकज देशमुख रिंगणात असण्याची शक्यता आहे. तर माजी नगरसेवक धनंजय गावडे यांनी राजकीय पुनरामन केले असून, स्वराज्य अभियानाची स्थापना केली आहे. तेही या निवडणुकीत उतरण्याची शक्यता आहे. यातच मनेसेने विनोद मोरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे ‘बविआ’ हा गड राखणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
Chhagan Bhujbal: सगळ्या पुतण्यांचा डीएनए सारखाच; भुजबळांकडून थेट अजित पवारांचे उदाहरण
अटीतटीची तिरंगी लढत!
बोईसर

साधारण चार लाखांहून अधिक मतदार असलेला पालघर जिल्ह्यातील बोईसर हा विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. या मतदारसंघाचा निम्मे म्हणजेच ५० टक्के भाग हा वसई-विरार महापालिकेमध्ये, तर अर्धा भाग पालघर जिल्ह्यात मोडतो. वसई पूर्वेच्या गोखिवरे, वालीव नालासोपारामधील संतोष भुवन, पेल्हारपासून मांडवीपर्यंतचा भाग, तर पालघरमधील सफाळे, मनोर आणि बोईसर शहराचा समावेश या मतदारसंघात होतो. यात उत्तर भारतीय मतदारांची संख्या २५ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. बोईसर हा औद्योगिक पट्टा आहे. येथील बहुतांश कामगार वर्ग हा उत्तर भारतीय आहे. तर मनोर, तारापूर हा मुस्लिमबहुल भाग आहे.

या मतदारसंघात २००९पासून ‘बविआ’चाच आमदार निवडून येत असून यंदाही पक्षातर्फे विद्यमान आमदार राजेश पाटील हे रिंगणात आहेत. २०१९च्या निवडणुकीत राजेश पाटील यांचा निसटता विजय झाला होता. यंदा महायुतीसोबत महाविकास आघाडीचेही आव्हान त्यांच्यापुढे असणार आहे. २०१९मध्ये सेना-भाजप युतीमधील शिवसेनेच्या विलास तरे यांचे आव्हान त्यांच्यासमोर होते. मात्र तेव्हा भाजपतर्फे तिकीट न मिळाल्याने संतोष जनाठे यांनी बंडखोरी केली होती. ही बंडखोरी ‘बविआ’च्या पथ्यावर पडली होती. राजेश यांना ७८ हजार ७०३, तर तरे यांना ७५ हजार ९५१ मते मिळाली होती. बंडखोर जनाठे यांना ३० हजार ९५२ मते पडली आणि त्यामुळे पाटील यांचा अवघ्या दोन हजार ७५२ मतांनी विजय झाला होता. पण येत्या विधानसभा निवडणुकीत बंडखोरीची तशी शक्यता नाही. याशिवाय महायुती आणि महाविकास आघाडीचेही आव्हान पाटील यांच्यापुढे असणार आहे. महाविकास आघाडीतर्फे डॉ. विश्वास वळवी यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. लोकसभा निवडणुकीत आघाडीचे समीकरण इथे यशस्वी ठरले आहे. लोकसभेत चांगली मते मिळाल्याने आघाडीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यामुळे या मतदारसंघातही तिरंगी लढत बघायला मिळणार आहे.
शिकण्यासाठी जाल, शवपेटीतून याल; माजी उच्चायुक्तांचा कॅनडाबाबत विद्यार्थ्यांना गंभीर इशारासेनेपुढे बालेकिल्ला राखण्याचे आव्हान
पालघर

एकेकाळी समाजवादी पक्षाचा बालेकिल्ला असणारा हा मतदारसंघ दोन वेळा काँग्रेस आणि त्यानंतर अविभाजित शिवसेनेकडे आला. त्यामुळे आत्तापर्यंत हा सेनेचा बालेकिल्ला असून, तब्बल पाच वेळा या पक्षाचे अविनाश सुतार, मनीषा निमकर, कृष्णा घोडा, अमित घोडा आणि श्रीनिवास वनगा हे प्रत्येक वेळी भरघोस मतांनी निवडून आले आहेत. त्यामुळे या मतदारसंघातून शिवसेना (उबाठा) पक्षाकडून लोकसभेतील पराभूत उमेदवार भारती कामडी, तसेच जिल्हा परिषदेतील गटनेते जयंत दुबळा, काशिनाथ चौधरी व दिनेश तारवी इच्छुक होते. मात्र, उमेदवारीची माळ दुबळा यांच्या गळ्यात पडली आहे.

या मतदारसंघात २०१९ मध्ये श्रीनिवास वनगा निवडून आले. मात्र महाविकास आघाडीचे सरकार पडल्यानंतर ते शिवसेनेच्या शिंदे गटासोबत गेले. त्यावेळी शिंदे यांनी त्यांना विधानसभेत तिकीट देण्याची ग्वाही दिली होती. मात्र वनगा यांना तिकिटासाठी शिंदे आणि भाजपकडे धावपळ करावी लागत आहे. त्याआधी काँग्रेसचे राजेंद्र गावित हे निवडून आले होते. गावीत यांनी मंत्रिपद भूषवून आपला मतदारसंघ सांभाळून ठेवला होता. मात्र त्यांनी ऐनवेळी पक्ष बदलून शिवसेना-भाजप अशा कोलांट्या उड्या मारल्या व त्यांना पराभव पत्करावा लागला. ते यावेळीही शिंदे गट आणि भाजपकडून तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष वैदही वाढाणसुद्धा इच्छुक असून पालघर अथवा बोईसर विधानसभेत शिंदे गटाकडून तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. दुसरीकडे जवळपास २७ इच्छुकांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसही या मतदारसंघावर दावा करत आहे. भाजपतर्फे संतोष जनाठे, तसेच अमित घोडा इच्छुक आहेत. मनसेने मात्र अद्याप या मतदारसंघात कोणाला तिकीट देणार, ते जाहीर केलेले नाही. पालघर विधानसभा मतदारसंघात इच्छुक उमेदवारांमध्ये ॲड. विराज गडग अपक्ष किंवा कोणत्याही पक्षाने उमेदवारी दिल्यास निवडणूक लढवतील. गेल्या निवडणुकीत त्यांना १२ हजार मते मिळाली होती. ठाकरे गटातर्फे पिंटू गहला इच्छुक आहेत. ते डहाणू पंचायत समितीचे विद्यमान उपसभापती आहेत.
गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या भावाला पकडण्यासाठी १० लाखांचे बक्षीस जाहीर; NIAची मोठी घोषणा
उमेदवारीसाठी रस्सीखेच
विक्रमगड

विक्रमगड विधानसभा मतदारसंघ राजकीय पटलावर फारसा दिसत नसला तरी येथील राजकीय गणिते वेगाने बदलत आहेत. विधानसभेत खरी लढत दुहेरी होत असली तरी सध्या येथे सर्वच पक्षांची उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू आहे. अशात शरद पवार गटाचे विद्यमान आमदार सुनील भुसार यांचे तिकीट निश्चित मानले जात असून, ते प्रचारालादेखील लागले आहेत. महायुतीमार्फत विक्रमगडची जागा कुणाच्या पारड्यात पडते याची मात्र सर्वांना उत्सुकता आहे.

या मतदारसंघात कुपोषण, बेरोजगारी या मुद्द्यांवर निवडणूक लढवली जात असून, यात जव्हार, मोखाडा, विक्रमगड व वाडा तालुक्यातील दोन जिल्हा परिषद गटांचा समावेश आहे. जवळपास तीन लाख १७ हजार मतदार या क्षेत्रात असून मागील निवडणुकीत राष्ट्रवादीचे सुनील भुसारा ८७ हजार ४४२ मते मिळवून विजयी झाले होते. भाजपच्या हेमंत सवरा यांचा त्यांनी २१ हजार मतांनी पराभव केला होता. विद्यमान आमदार व मंत्री दिवंगत विष्णू सावरा यांच्या नाराजीचा लाभ भुसारा यांना झाला होता. मात्र सध्या या मतदारसंघातील राजकीय परिस्थिती वेगळी आहे. राष्ट्रवादी (शप) पक्षाकडून भुसारा यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली असून, भाजपसह शिवसेना, अजित पवार गटही विक्रमगडसाठी आग्रही आहेत. भाजपला मागील निवडणुकीत पराभवाची धूळ चाखावी लागली असली तरी पराभूत उमेदवार हेमंत सावरा सध्या विद्यमान खासदार असून विक्रमगड विधानसभा क्षेत्रातून त्यांना घसघशीत मते मिळाली आहेत. भाजपला मतदारांचा वाढता पाठिंबा बघता भाजप ही जागा हातून सोडणार नाही, असे बोलले जात आहे. पक्षाकडून हरिश्चंद्र भोये व माजी जिल्हापरिषद अध्यक्षा सुरेखा थेतले यांची नावे चर्चेत आहेत.

शिंदेंच्या सेनेकडून विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम उमेदवारीसाठी आग्रही असून, त्यांनी आपल्या कार्यकाळात केलेल्या विकासकामांच्या आधारे मतदारांचा भक्कम पाठिंबा मिळवला आहे. जिजाऊ संघटना आपला उमेदवार उभा करण्याची चाचपणी करीत असून, भिवंडी लोकसभा क्षेत्रात निलेश सांबरे यांनी मिळवलेली मते भाजप उमेदवाराला मारक ठरली होती. विक्रमगड विधानसभेत ‘जिजाऊ’ने उमेदवार उभा केला तर राजकीय चित्र पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे.
राहुल नार्वेकरांपेक्षा आशिष शेलार श्रीमंत, पाच वर्षांत संपत्तीत किती वाढ? जाणून घ्या
माकप, युतीचा उमेदवार गुलदस्त्यात
डहाणू

डहाणू विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. २००९ साली मतदारसंघ पुन:रचनेत डहाणू आणि तलासरी तालुक्यांचा समावेश झाला. हा मतदारसंघ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो. या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून माकपचे विद्यमान आमदार विनोद निकोले यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. तर महायुतीकडून भाजप की शिवसेना शिंदे गट हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

२००९च्या निवडणुकीत माकपने विजय मिळवला. तर, गुजरात सीमेलगतच्या या मतदारसंघात मोदी लाटेमुळे २०१४मध्ये भाजपने बाजी मारली. २०१९ला काही पक्ष माकपच्या बाजूने आले. त्यांनी आघाडी स्थापन करून कॉम्रेड विनोद निकोले यांना निवडून आणले. ‘माकप’चे राज्यातील ते एकमेव आमदार झाले. लोकसभा निवडणुकीत पालघर मतदारसंघात भाजपने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले, तरी सहापैकी डहाणू विधानसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिला. तेव्हापासून निकोले यांची विधानसभेसाठी उमेदवारी पक्की समजली गेली. माकपच्या राज्य समितीने त्यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर महाविकास आघाडीने त्याला पाठिंबा दिला. महायुतीकडून हा मतदारसंघ अद्याप कोणत्याही पक्षासाठी जाहीर झालेला नाही. परंतु भाजपचे तलासरी तालुका अध्यक्ष विनोद मेढा यांचे नाव चर्चेत आहे. मागील दोन्ही निवडणुकांत त्यांनी पक्षाकडून डमी अर्ज दाखल केला होता. ते तिसऱ्यांदा तालुका अध्यक्ष बनले आहेत. माजी आमदार अमित घोडा हेसुद्धा इच्छुकांच्या यादीत आहेत, तर शिवसेनेकडे उमेदवारी गेल्यास श्रीनिवास वनगा हे इच्छुक असल्याची चर्चा आहे.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.