Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Latur Assembly Constituency: लातूर मतदारसंघाची राज्यात कायमच चर्चा होत असते. दोन वेळा मुख्यमंत्री दिलेला मतदारसंघ अशी या मतदारसंघाची ओळख आहे.
लातूर शहर विधानसभा मतदारसंघात २३ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. पण, लढत तिरंगी होणार आहे. या मतदारसंघात चार लाख १४५ मतदार आहेत. त्यात पुरुष मतदार दोन लाख पाच हजार ६३६ असून, एक लाख ९४ हजार ३७८ स्त्री मतदार आहेत. तृतीयपंथी ३० आणि १११ सैनिक मतदार आहेत. एकूण ३८९ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदारसंघाला लातूर महानगरासह लातूर तालुक्यातील २७ गावांचा समावेश आहे. ही रचना राजकीय समीकरणासाठी अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. १९७२ पासून लातूरला मंत्रीपद मिळत गेले आहे. शिवराज पाटील चाकूरकर पहिल्यावेळी निवडून आले होते. त्या वेळी ते उपमंत्री आणि नंतर उपसभापती झाले. सन १९८० पासून दिवंगत नेते विलासराव देशमुख यांची राजकीय कारकीर्द बहरली. मतदारसंघावर काँग्रेस पक्षाचे वर्चस्व राहिले आहे. सर्वाधिक काळ देशमुख कुटुंबाचा आहे. फक्त १९९५मध्ये शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी देशमुखांना धक्का दिला होता. शहर विकासकामात रोजगाराचा विचार कमी झाला आणि भव्य शासकीय इमारती, खासगी रुग्णालये, आणि खासगी शिकवणी वर्गाची रेलचेल वाढली. त्यामुळे लातूर शहर महाराष्ट्राचे ‘कोटा’ ठरले आहे.
विलासराव देशमुख यांनी दोन वेळा मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली आहे. त्यावेळी लातूरचा सुवर्णकाळ मानला गेला. त्यानंतर किरकोळ विकासकामांनाही गती मिळाली नाही. या निवडणुकीत काँग्रेसचे आमदार अमित देशमुख, भाजपच्या डॉ. अर्चना पाटील चाकूरकर, वंचित बहुजन आघाडीचे विनोद खटके रिंगणात आहेत. नऊ उमेदवार राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील नोंदणीकृत पक्षाचे आहेत. अकरा अपक्ष उमेदवार आहेत. त्यात काँग्रेसचे महापौर राहिलेले आणि नंतर भाजपमध्ये गेलेले अख्तरमिया जलाल शेख आणि ‘आप’चे पदाधिकारी अश्विन नलबले यांचा समावेश आहे. ‘वंचित’चे उमेदवार विनोद खटके यांनी उमेदवारी अर्ज भरताना केलेले शक्तिप्रदर्शन लक्षवेधी ठरले आहे.
नाशिक हादरलं! मामाच्या घरात भाचीने कवटाळलं मृत्यूला; नववीतील विद्यार्थिनीचं टोकाचं पाऊल, काय घडलं?
भाजपच्या उमेदवार डॉ. अर्चना पाटील चाकूरकर या काँग्रेसचे जेष्ठ नेते शिवराज पाटील यांच्या सून आहेत. त्यांच्या उमेदवारीने उच्चशिक्षित आणि उत्तम राजकीय उमेदवाराची चर्चा सुरू झाली आहे. अमित देशमुख नियोजनात वाकबगार आहेत. त्यांना मराठवाड्यात महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी प्रचार करायचा असल्यामुळे त्यांनी व्यापारी, मित्र, उद्योजक यांच्या भेटी घेऊन लातूरची मांडणी केली आहे. लातूरात मुद्यापेक्षा वावड्या भारी ठरतात. त्या कधी संदर्भासह, कधी तार्किक अंदाजावर आधारलेल्या असतात. एखादी वावडी गेमचेंजर ठरते असा या मतदारसंघाचा इतिहास आहे.
कलम ३७०चं काय सांगता, सोयाबीनच्या भावाचे आधी सांगा! उद्धव ठाकरेंची अमित शहांवर टीका
लोकसभेचा परिणाम होणार ?
लोकसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार आणि सध्या काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले सुधाकर शृंगारे यांना लातूर शहर मतदारसंघात ९४ हजार ९७४ मते मिळाली होती. काँग्रेसचे डॉ. शिवाजी काळगे यांना एक लाख २४ हजार ९०८ मते मिळाली होती. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार नरसिंगराव उदगीरकर यांना सात हजार ७४३ मते मिळाली होती. पुढील काळात कोणाच्या सभा प्रभावी ठरणार आणि कोणते मुद्दे परिणामकारक होणार याची उत्सुकता आहे.