Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी. …. – महासंवाद

11

साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, श्रेष्ठ साहित्यिक कुसुमाग्रज तथा वि. वा.शिरवाडकर यांनी मराठी साहित्य क्षेत्रात आपल्या लेखणीने  विशेष स्थान प्राप्त केले. त्यांचा जन्मदिन हा संपूर्ण महाराष्ट्रभर मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. २७ फेब्रुवारी हा दिन जवळ येऊ लागतातच महाराष्ट्रात मराठीचा गर्जा जयजयकार सुरू होतो. दिल्ली येथे होत असलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्ताने डॉ. संजयकुमार सरगडे, छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा यांनी

लेखन प्रपंच.

१९८७ साली मराठी भाषेतील दुसरा ज्ञानपीठ पुरस्कार देऊन वि.वा. शिरवाडकर यांना गौरवण्यात आले. काव्य, नाटक, कादंबरी या साहित्याच्या वेगवेगळ्या प्रांतात मुशाफिरी करणारे कवी कुसुमाग्रज यांनी वाड्मयीन क्षेत्रात मोलाची भर घातली. त्यांचे साहित्य चिरंतन, शाश्वत स्वरूपाचे असून ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणिवा जपणारे महत्त्वाचे साहित्यिक आहेत.

 जगात बोलल्या जाणाऱ्या भाषांची संख्या प्रचंड आहे. भारत हा बहुभाषिक देश असून  भारतीय भाषांमध्ये लोकसंख्येच्या आधारावर बोलली जाणारी तिसऱ्या क्रमांकाची भाषा म्हणून मराठी भाषा ओळखली जाते.

 भारतीय संविधानाच्या आठव्या परिशिष्टात समाविष्ट केलेली मराठी ही भारतातील अधिकृत २२ भाषांपैकी एक भाषा असून ती महाराष्ट्र राज्याची अधिकृत तर गोवा या राज्याची सहअधिकृत भाषा आहे. भारतात नऊ कोटीपेक्षा जास्त लोक मराठी भाषा बोलतात. महाराष्ट्र हे मराठी भाषिकांचे राज्य असल्याने मातृभाषा असलेल्या मराठी भाषेला वेगळे महत्त्व आहे.

 महाराष्ट्र, गोवा या राज्यामध्ये मराठी भाषेचा वापर प्रामुख्याने होतो. या दोन राज्याव्यतिरिक्त गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू या राज्यात मराठी भाषा बोलणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जागतिक पातळीवरील विचार करीत असताना भारताप्रमाणे इस्त्रालय, मॉरिशियस या देशांमध्ये मराठी भाषा बोलली जाते. शिवाय जगातील अनेक देशात मराठी भाषिकांची वस्ती असलेली पहावयास मिळते. त्यातून मराठी भाषेचे आदान प्रदान होताना दिसते. मराठी भाषा आणि संस्कृती यांचा अभ्यास करण्यासाठी विविध देशातील संशोधक महाराष्ट्रामध्ये दाखल झालेले पहावयास मिळतात. महाराष्ट्राचे उपास्य दैवत असलेल्या विठ्ठलाच्या आषाढी एकादशी वारीच्या निमित्ताने अनेक परदेशी नागरिक आषाढी वारीत सहभागी होऊन महाराष्ट्रीय संस्कृतीबरोबर मराठी भाषेचाही अभ्यास करतात. मराठी भाषेच्या जवळजवळ ५२ बोलीभाषा महाराष्ट्रातील विविध भागात बोलल्या जातात. बोलीभाषांमुळे मराठी भाषा ही अधिकाधिक परिपूर्ण झालेली असली तरी प्रशासन, शिक्षणाचे माध्यम, समाजातील लेखी व्यवहार यासाठी सहसा बोली भाषेचा वापर केला जात नाही. कोणतीही भाषा एकाएकी जन्मास येत नाही. तिच्या जन्माची प्रक्रिया प्रदीर्घकाळ सुरूच असते. आज असलेली आपली मराठी भाषाही  त्याला अपवाद नाही.

  जगातील कोणत्याही भाषेची सुरुवात नेमकी कधी, केव्हा, कुठे झाली हे सांगणे कठीण. मात्र मराठी भाषेला प्राचीन परंपरा असून ती आठव्या शतकापासून प्रचलित असल्याचे दिसते. राज्यकारभाराची भाषा म्हणून मराठीचा वापर यादव काळापासून होत होता. यादवकाळातील मराठीतील शिलालेख आणि ताम्रपट हे याची साक्ष देतात. दुर्मिळ स्वरूपात सापडलेले शिलालेख, ग्रंथ यावरील संशोधनावरून मराठी भाषा ही प्राचीन असल्याची साक्ष पटते.

 मराठी भाषा महाराष्ट्रातील विविध संतांच्या अभंग, कीर्तन, भारुड, भजनातून सहज सुलभपणे आविष्कृत होताना ती समृद्ध होत गेली. मराठी भाषेतील आद्य चरित्र ग्रंथ म्हणून   लीळाचरित्राचा उल्लेख केला जातो. संत ज्ञानदेवांनी मराठी भाषेची अस्मिता, तिची ध्वजा फडकवली. त्यांचा  साहित्याचा लेणे असणारा ‘ज्ञानेश्वरी’ हा ग्रंथ गेली अनेक शतके सर्वोच्च असून जागतिक दर्जाचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते.

   परि अमृताचे पैजा जिंके !

   ऐसे अक्षरेचि रसिके   मेळविण !!

अशा  सार्थ शब्दात संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेचा गोडवा अमृतापेक्षाही जास्त आहे असे म्हटले . नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी! असे म्हणणाऱ्या संत नामदेवांनी मराठी भाषेची पताका अभंगाच्या माध्यमातून उत्तर भारतापर्यंत पोहचवली. शीख धर्मीयांचा गुरू ग्रंथसाहेब या पवित्र ग्रंथात त्यांच्या रचनांचा समावेश आढळतो. संत तुकाराम यांनी मराठी भाषेला वैभवाच्या शिखरावर नेहून ठेवले. त्यांचे अभंग सातासमुद्रापलीकडे गेले. संत तुकारामांचा अभंग माहित नाही असा मराठी माणूस शोधूनही सापडत नाही. त्यांचे अभंग आजही लोकांच्या जिभेवर नाचताना दिसतात. गाडगेबाबांनी  संत तुकारामांच्या अभंगांचा आपल्या कीर्तनात यथोचित वापर करून समाजमन जागृत करून मानवता धर्माची शिकवण दिली. समर्थ रामदासांचे मनाचे श्लोक, दासबोध या ग्रंथातून मराठी भाषा भक्तीरसात रमली. संत एकनाथांनी भारुडाच्या माध्यमातून मराठी भाषेचे सौंदर्य रूप न्याहाळले. त्यांनी भागवत ग्रंथाची रचना करून मराठी भाषेत भर घातली. याशिवाय अनेक संतांच्या अभंग, रचनांनी मराठी भाषा समृद्ध झालेली दिसते.

संत, पंत, तंत मंडळींनी माय मराठी भाषेच्या समृद्धीचा आलेख व्यापक आणि विस्तृत स्वरूपात आकारास आणला. १९ व्या शतकात धर्म, राजकारण, समाजकारण, संस्कृती, साहित्य अशा क्षेत्रात समाजसुधारक तसेच साहित्यिक यांनी आपले योगदान दिले. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, ताराबाई शिंदे, लोकहितवादी, लोकमान्य टिळक, विष्णुशास्त्री चिपळूणकर अशा अनेकांनी ग्रंथलेखन व त्यातून मराठीची सेवा केली. विष्णुशास्त्री चिपळूणकर तर स्वतःला ‘ मराठी भाषेचा शिवाजी आहे’ असे अभिमानाने म्हणत.

      १९६० नंतर ग्रामीण साहित्य, दलित साहित्य, स्त्रीवादी साहित्य, आदिवासी साहित्य अशा अनेक साहित्य प्रवाहांचा उदय झाला. या साहित्य प्रवाहांमुळे मराठी भाषा तळागाळातील मराठी भाषिकांपर्यंत पोहोचली. मराठी साहित्याच्या क्षेत्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेने दलित साहित्याचा सशक्त प्रवाह जन्माला आला. फुले, शाहू, आंबेडकर या विचारधारेशी एकरूप असणारे अनेक लोक लिहू लागले, वाचू लागले. कथा, काव्य ,कादंबरी, नाटक , चरित्र, आत्मचरित्र अशा विविध अंगी साहित्य प्रकाराने मराठी भाषा सर्वश्रेष्ठ ठरली आहे. समाजातील  दलित, उपेक्षित, शोषित , वंचित , कष्टकरी, मजूर, कामगार, सर्वसामान्यांचे जीवन लेखणीत शब्दबद्ध करून अण्णाभाऊ साठे यांनी मराठी साहित्य क्षेत्रात क्रांती केली.

 ३ ऑक्टोबर २०२४ रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय जाहीर झाला. भाषा प्राचीन असावी त्या भाषेतील साहित्य श्रेष्ठ असावे, भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावे, भाषेचे वय दीड ते अडीच हजार वर्षाचे असावे हे निकष पूर्ण करणारी मराठी भाषा अभिजात भाषा ठरली ही गोष्ट मराठी भाषिकांसाठी अभिमानाची आहे. यावरूनच मराठी भाषेची महती लक्षात येते.

 मराठी भाषेच्या उगमापासून ते आजच्या आणि सध्याच्या मराठी भाषेच्या स्वरूपात अनेक बदल हे कालपरत्वे झाले. कोणतीही भाषा एकजिनसी असत नाही. परकीय आक्रमणे, राज्यक्रांती, दुष्काळ, भूकंप, महापूर , युद्धे , रोगराई, वैचारिक व धर्मक्रांती अशा अनेक कारणांनी समाजमन ढवळून निघत असते. त्याचा परिणाम मराठी भाषेवर होताना मराठी भाषाही हळूहळू बदलत गेली. असे असले तरी विविध ज्ञानपीठ, साहित्य अकादमी पुरस्कार, शासन स्तरावरील पुरस्कार, विविध संस्था यांचे पुरस्कार, भाषा संचालनालय,महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळ, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, राज्य मराठी विकास संस्था, साहित्य संमेलने अशा विविध  ज्ञात अज्ञात संस्था या मराठी भाषेचा वापर अधिकाधिक गुणवत्तापूर्ण व्हावा तसेच मराठी भाषेच्या अभिवृद्धीची प्रक्रिया नियोजनपूर्वक गतिमान करावी यासाठी  मराठी भाषा संवर्धनासाठी राबविलेले विविध उपक्रम मराठी भाषेच्या समृद्धीच्या दिशेने टाकलेली मोठी पाऊले आहेत.

आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या आणि माध्यमांच्या जगात मराठी भाषा आपले अस्तित्व  राखून आहे. आज मराठी भाषेवर इतर भाषांची किती आक्रमणे झाली तरीही मराठी भाषेवर त्याचा फारसा परिणाम न होता उलट तिची वाटचाल समृद्ध दिशेने सुरू आहे….

  लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी

हा कविवर्य सुरेश भट यांनी मराठी मनात जागवलेला अभिमान चिरंतन राहील.

डॉ. संजयकुमार सरगडे, छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.