Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांची माहिती
प्रत्येक सप्ताहात दर बुधवारी तालुक्यातील एका गावात उपक्रमाचे आयोजन
छत्रपती संभाजीनगर, दि.२५, (विमाका) :- केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना, उपक्रम व सेवा ग्रामस्थांच्या दारी पोहचविण्यासाठी गाव पातळीवर काम करणाऱ्या सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांमार्फत विविध सेवा ठराविक कालावधीत पोहचविण्याच्या अनुषंगाने “एक दिवस गावक-यांसोबत (ग्राम दरबार)” हा नाविन्यापूर्ण उपक्रम छत्रपती संभाजीनगर विभागात राबविण्यात येणार आहे. विभागातील आठ जिल्ह्यातील ७६ तालुक्यातील प्रत्येकी एका गावात २८ फेब्रुवारीपासून उपक्रमाची सुरूवात होणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी दिली.
विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त श्री.गावडे यांनी आज एक दिवस गावकऱ्यांसोबत या उपक्रमासंदर्भात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी उपायुक्त सुरेश बेदमुथा, सीमा जगताप, आदी उपस्थित होते.
विभागीय आयुक्त श्री. गावडे म्हणाले, छत्रपती संभाजीनगर विभागातील प्रत्येक तालुक्यातील किमान एका गावात ‘एक दिवस गावक-यांसोबत (ग्राम दरबार उपक्रम)” या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून खासदार, आमदार, तसेच स्वातंत्र्यसैनिक व इतर प्रतिष्ठित नागरिक यांनाही आमंत्रित करण्यात येणार आहे. जिल्हा स्तरावरील विविध विभाग प्रमुखांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तालुक्याचे वाटप करुन त्यांना रोटेशन पध्दतीने एका तालुक्याच्या एका गावामध्ये उपस्थित राहण्याबाबत निर्देशित करतील. जिल्हा स्तरीय अधिकारी यांच्या समवेत पचायत समितीच्या कार्यक्षेत्रात येणा-या एका गावास प्रत्येक आठवड्यातील दर बुधवारी पंचायत समितीचे विविध विभागाचे अधिकारी व ग्राम पातळीचे अधिकारी हे संयुक्तपणे गावात जाऊन ग्रामस्थासमवेत या उपक्रमाची अंमलबजावणी करणार आहेत.
ग्रामपंचायत विभाग
ग्रामपंचायत अंतर्गत विविध अभिलेख्यांवर आधारीत सेवाहमी कायद्यातंर्गत विविध उता-यांचे निर्गमन, ग्रामपंचायतीच्या वरिष्ठ अधिका-यांकडून ग्रामपंचायतीचे अभिलेख्यांची सखोल तपासणी, ग्रामपंचायतच्या विविध कर वसुली त्यादिवशी पुर्ण करणे, ग्रामसभेचे आयोजन करणे, वैयक्तीक विविध लाभांच्या योजनांचे परिपुर्ण अर्ज करणे, ग्रामपंचायतीच्या विविध प्रलंबित 8-अ अंतर्गत नोंदी मंजुर करुन घेणे व नागरीकांना 8-अ चे उतारे देणे, ग्रामपंचायतकडे प्रलंबीत तक्रारींचा निपटारा करणे, गावांतर्गत रस्ते. नाली बांधकाम, दोन गावांना जोडणारे रस्ते व इतर बांधकामाना भेटी देणे आदी सेवांचा समावेश करण्यात आला आहे.
कृषी विभाग
शेतक-यांसाठी पिक नियोजन, किड नियंत्रण, खत नियोजन योग्य बियाणांचा वापर, रसायणमुक्त शेती, झिरो बजेट फार्मिंग अशा विविध विषयावर मार्गदर्शन व प्रशिक्षण शिबिर आयोजित करणे, shetkryana कमी पाण्याचा वापर बाबतचे विविध तंत्रज्ञानाची माहिती देणे, शेतकऱ्यांचे शेतातील माती परिक्षणासाठी माती नमुने गोळा करणे, बायोगॅस सौर चुली व विविध पारंपरिक उर्जा तंत्रज्ञानाची माहिती देण्याबाबत आदी बाबींचा समावेश करण्यात आला आहे.
शिक्षण विभाग
ग्रामस्थ, ग्राम शिक्षण समिती व तालुक्याचे शिक्षण विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये विद्यार्थ्यांचे गुणवत्ता तपासणीसाठी उपक्रम राबविणे, शाळेची संपुर्ण सफाई, स्वच्छता, पाण्याच्या टाकीची सफाई, किचन सफाई, स्वच्छतागृहाची सफाई, परिसर स्वच्छता असे उपक्रम राबविणे, शिक्षण विभागातील अधिका-यांमार्फत शाळेची सखोल तपासणी ग्राम शिक्षण समितीच्या उपस्थितीमध्ये करणे, शाळेमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करणे, गावामध्ये प्रभातफेरीचे आयोजन करणे, नवीन शाळाखोली बांधकाम पाहणी आदी उपक्रमाचा समावेश असणार आहे.
महिला व बाल कल्याण व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा
गावातील महिलांची स्वयंसहायता गटांची स्थापना करणे, बंद पडलेल्या गटांना मार्गदर्शन करुन पुर्नजिवित करणे, स्वयंसहायता गटांना अभिलेख लिहिणे, बैठकीचे कामकाज चालविणे, बँकेचे कामकाज करणे याबाबत प्रशिक्षण, स्वयंसहायता गट कौशल्य वृध्दीसाठी प्रशिक्षण, विविध व्यवसाय उभारणी कामी आवश्यक ती सर्व विषयांचे प्रशिक्षण, महिलांना संवाद कौशल्य व अन्य कौशल्याचे प्रशिक्षण, गावातील किशोरवयीन मुलींना आरोग्यविषयक समुपदेशनचे व्याख्यान, महिलाना सॅनिटरी नॅपकीन वापराबाबत माहिती देणे, अंगणवाडी इमारत बांधकाम पाहणी करणे, अंगणवाडी केंद्र यांना भेटी देणे, कुपोषित बालके, गरोदर महिला व स्तनदा माता यांना आहार व आरोग्य सेवा बाबत पाठपुरावा आदी सेवांचा समावेश करण्यात आला आहे.
आरोग्य
गावातील नागरिकांची आरोग्य तपासणी, वयोवृध्द लोकांसाठी स्वतंत्र तपासणी, गरोदर मातांची तपासणी, विविध रक्त तपासण्या, सिकल सेल अंतर्गत तपासणी, माता व बालकांचे लसीकरण, रक्तदान, नेत्रदान, अवयवदान अशा शिबिरांचे आयोजन, नेत्र तपासणी, मौखिक आरोग्य तपासणीचे आयोजन, ग्रामस्थांना आहार विषयक मार्गदर्शन, ग्रामस्थांना विविध आजारांमध्ये घ्यावयाच्या काळजी विषयक मार्गदर्शन, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र बांधकामांना भेटी आदी सेवांचा यात समावेश करण्यात आला आहे.
पशुसंवर्धन
गावातील पशुधनाची आरोग्य शिबिरे आयोजित करणे, विविध प्रकारचे लसीकरण, देशी वाण संवर्धन व वृध्दीसाठी प्रशिक्षण, शेतक-यांना गोठा नियोजन, मलमुत्र नियोजन, जनावरांची निगा, आहार, दुग्ध वाढीसाठी आवश्यक बाबी यांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शासनाच्या विविध योजनाची माहिती देऊन अर्ज तयार करणे, पशुसंवर्धन केंद्र व उपकेंद्र बांधकामांना भेटी आदी बाबींचाही यात समावेश असणार आहे.
समाज कल्याण
गावातील मागासवर्गीय वस्तीमध्ये स्वच्छता अभियान राबविणे, विविध शासकीय योजनांबाबत तसेच कायदेविषयक बाबीबाबत वस्तीतील नागरीकांना मार्गदर्शन करणे, विविध योजना लाभार्थी निवड करुन त्यांचे अर्ज तयार करणे, अनुसुचित जाती जमाती वस्ती अंतर्गत विकास कामांना भेटी इत्यादी सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
पाणी पुरवठा
गावातील विविध हातपंप, विद्युत पंप याची आवश्यकतेनुसार दुरुस्ती करणे व सर्व्हिसिंग करणे, गावातील पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन मधील गळती काढणे, पिण्याच्या पाण्याच्या विविध उद्भव पाण्याचे नमुने काढणे, पाणी शुद्धीकरण कर्मचारी यांचे प्रशिक्षण, गावातील नागरीकांना पाणी बचती बाबत मार्गदर्शन करणे, गावातील नागरीकांच्या घरामध्ये असणा-या नळांना तोट्या बसविणे, पाण्याची टाकी सफाई करणे, जल जीवन मिशन अंतर्गत असलेल्या योजनांना भेट देऊन पाहणी करण्यात येणार आहे.
स्वच्छता विभाग
गावामध्ये संपुर्ण स्वच्छतेचा कार्यक्रम राबविणे, सर्व नागरीक शौचालयाचा वापर करत असल्याची खात्री करणे, जे नागरीक शौचालयाचा वापर करत नसतील त्यांना वापर करण्याबाबत सांगणे, गावातील नाल्या सफाई, परस बागांची निर्मिती, गावातील खुरटी झुडपे गाजर गवत निर्मुलन, गावातील नागरीकांना ओल्या व सुका कचरा कुंडी वाटप करणे. गावातील घन कचरा विलगीकरणाची व कचरा प्रक्रियेची आखणी करुन त्याची सुरुवात करणे, गावामध्ये प्लास्टीक निर्मुलन मोहीम राबविणे, गावातील सांड पाण्यासाठी शोष खड्डे आखणी करुन पुर्ण करुन घेणे व नाल्यातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी नियोजन करणे, गावातील सर्व शासकीय इमारतींना रंगरंगोटी व डागडुजी व स्वच्छता करणे, गावातील उकीरड्यांच्या ठिकाणी नरेगा अंतर्गत नाडेफ उभारणीसाठी नियोजन करण्यात येणार आहे.
सिंचन व जलसंधारण
गावातील शिवार फेरी ग्रामस्थांच्या समवेत करणे, गावातील विविध जल संधारणच्या उपचारांना भेटी देऊन त्याची देखभालीसाठी ग्रामस्थांच्या समित्या तयार करणे, विविध खराब झालेल्या कामाची डागडूजी करणे. लोकवर्गणीतून नाला खोलीकरण व सरळीकरण तसेच बांधबंदिस्त या सारखी कामे करणे. मनरेगा अंतर्गत जलसंधारणाच्या विविध उपचाराची जागा निवडून त्याबाबतचा आराखडा मंजुरीसाठी तयार करणे, मनरेगा अंतर्गत विविध प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे.
“एक दिवस गावकऱ्यांसोबत” उपक्रमाबाबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) यांच्यावर जिल्हास्तरीय नोडल अधिकारी म्हणून जबाबदारी असणार आहे. तसेच सहाय्यक गट विकास अधिकारी यांच्यावर तालुकास्तरीय नोडल अधिकारी म्हणुन जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच या उपक्रमासाठी विस्तार अधिकारी (पंचायत) हे सहाय्यक म्हणुन कामकाज पाहणार आहेत.
उपक्रमांतर्गत विविध विभागांनी केलेल्या कामकाजाचा गुणात्मक व संख्यात्मक अहवाल संबंधित तालुकास्तरीय अधिकारी यांनी गटविकास अधिकारी यांना दर आठवड्याला सादर करावा तसेच गट विकास अधिकारी यांनी अपूर्ण असणा-या कामकाजाबाबत आढावा घेऊन ती कामे पुर्ण करण्याबाबत नियोजन करावे व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल दर गुरुवारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) यांना सादर करावा. जिल्हा स्तरीय नोडल अधिकारी यांनी संकलित अहवाल प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेपर्यंत विभागीय आयुक्त कार्यालयास सादर करावा, असे निर्देश देण्यात आल्याचेही विभागीय आयुक्त श्री.गावडे यांनी सांगितले.
0000