Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
मुंबई, दि. २५ : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या स्थापनेपासून मंडळाने ‘पुस्तक प्रकाशन’ या मुख्य उद्दिष्टानुसार आजमितीपर्यन्त ६९७ ग्रंथ प्रकाशित केले असून मंडळाकडून संपूर्ण वर्षभरात छपाई होऊन सिद्ध झालेली पुस्तके दरवर्षी २७ फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिनी प्रकाशित करण्याची मंडळाची अनेक वर्षांची परंपरा आहे. मागील वर्षीप्रमाणेच यावर्षीदेखील अत्यंत मौलिक अशा वर्षभरात सिद्ध झालेल्या नव्या ५१ पुस्तकांचे प्रकाशन मराठी भाषा गौरवदिनी २७ फेब्रुवारी २०२५ रोजी गेटवे ऑफ इंडिया मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात करण्यात येत आहे.
या ५१ ग्रंथांमध्ये रमेश वरखेडे यांनी संपादित केलेल्या ‘महाराष्ट्राच्या सामाजिक-सांस्कृतिक स्थित्यंतराचा इतिहास खंड ३ (१९५१-२०१०)’ या तिसऱ्या खंडात १९५१ ते २०१० या साठ वर्षातील आधुनिक महाराष्ट्राच्या भौतिक प्रगतीबरोबरच भाषा साहित्य कलाकल्पना मूल्यधारणा ध्येय आणि आकांक्षा परस्पर मानवी संबंधांचा पोत यांचा वस्तुनिष्ठ मागोवा घेण्यात आला आहे.
युगप्रवर्तक विष्णू नारायण भातखंडे यांचे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील स्थान महत्त्वाचे असून ‘महाराष्ट्राचे शिल्पकार’ या चरित्रमालेअंतर्गत रामदास भटकळ यांनी लिहिलेले विष्णू नारायण भातखंडे यांचे चरित्र मंडळ प्रकाशित करीत आहे.
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे पहिले अध्यक्ष तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी त्यांच्या जीवनात विपूल लेखन केले असून ते भाषण, लेख, मुलाखती, प्रस्तावना, पत्रे, परीक्षणे, सूची, भाषांतरे, चरित्रे, प्रबंध, कोशनोंदी, संपादने अशा विविध रुपात सिद्ध झाले आहे. त्यांनी त्यांच्या लेखनातून साहित्य, संस्कृती, धर्म, तत्त्वज्ञानाच्या स्वरुपास आधुनिक चेहरा व अर्थ दिला आहे. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे हे लेखन सुमारे दहा हजार पृष्ठे व १८ खंडांमध्ये डॉ.सुनीलकुमार लवटे यांनी संपादित केले असून वाचकांना उपलब्ध करुन दिले आहे. या १८ खंडांमध्ये, खंड १ : मराठी विश्वकोश नोंदसंग्रह, खंड २ : भाषणसंग्रह (व्यक्ती व विचार), खंड ३ : भाषणग्रंथसंग्रह (धर्म), खंड ४ : भाषणसंग्रह (साहित्य), खंड ५ : भाषणग्रंथ (वैदिक संस्कृतीचा विकास), खंड ६ : मुलाखतसंग्रह, खंड ७ : लेखसंग्रह (तात्त्विक व राजकीय), खंड ८ : लेखसंग्रह (सांस्कृतिक), खंड ९ : लेखसंग्रह (संकीर्ण), खंड १० : प्रस्तावनासंग्रह, खंड ११ : पुस्तक परीक्षण संग्रह, खंड १२ : संस्कृत-मराठी प्रबंध व चरित्रसंग्रह, खंड १३ : पत्रसंग्रह, खंड १४ : संस्कृत हस्तलिखित ग्रंथांची विवरणात्मक सूची (भाग-१), खंड १५ : संस्कृत हस्तलिखित ग्रंथांची विवरणात्मक सूची (भाग-२), खंड १६ : भारतस्य संविधानम (भारतीय राज्यघटना : संस्कृत भाषांतर), खंड १७ : तर्कतीर्थ : स्मृतिगौरव लेखसंग्रह व खंड १८ : तर्कतीर्थ साहित्यसमीक्षा लेखसंग्रह अशा वैविध्यपूर्ण विषयांवरील मौलिक ग्रंथांचा समावेश आहे.
मराठीतील ‘अक्षरबालवाङ्मय’ या ग्रंथप्रकल्पांतर्गत डॉ.मंगला वरखेडे यांनी संपादित केलेले चार खंड यापूर्वी मंडळाने प्रकाशित केले असून आता खंड ५ ‘कथामंजुषा’ व खंड ६ ‘वाचनदीपिका’ हे दोन खंड मंडळ प्रकाशित करीत आहे. कथामंजुषा या खंडात गेल्या दोनशे वर्षातील निवडक कथा यात संपादित करण्यात आल्या आहेत. ‘वाचनदीपिका’ या सहाव्या खंडात बालसाहित्याचे स्वरुप, प्रकार, जागतिक व मराठी बालसाहित्यातली अभिजात ग्रंथसंपदा याविषयीचे मान्यवरांचे निवडक लेख समाविष्ट करण्यात आले आहेत. मराठी बालसाहित्याची वाटचाल आणि त्यातले विविध प्रयोग यांचा एक वर्णनात्मक पट या खंडाच्या माध्यमातून उलगडणार आहे.
डॉ.रंजन गर्गे संपादित केलेले शास्त्र व विज्ञान ग्रंथ मूलभूत विज्ञान खंड १ (१८६४ ते १९४७) शास्त्र व विज्ञान ग्रंथ उपयोजित विज्ञान खंड २ (१८६४ ते १९४७) व शास्त्र व विज्ञान ग्रंथ गणित विज्ञान खंड ३ (१८६४ ते १९४७) हे तीन खंड मंडळाच्यावतीने प्रकाशित होत आहेत. डॉ.दिलीप धोंडगे यांनी मराठी वाङ्मयकोश खंड दुसरा भाग दोन ‘मराठी ग्रंथकार (दिवंगत)’ (इ.स.१९६० ते इ.स. २०००) हा खंड संपादित केला असून तो मंडळाच्यावतीने प्रकाशित होत आहे. या खंडामध्ये १९६० ते २००० पर्यंतच्या कालखंडातील दिवंगत साहित्यिकांची माहिती समाविष्ट आहे. वाङ्मयाच्या अभ्यासात हा ग्रंथ अत्यंत महत्त्वाचे संदर्भसाधन ठरणार आहे.
रशिया या देशाचा इतिहास, भूगोल, समाजजीवन, धर्म, भाषा व साहित्य, नृत्य व हस्तकला अशी सांस्कृतिक ओळख करुन देणारे व डॉ.मेघा पानसरे यांनी लिहिलेले ‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ हे सचित्र पुस्तक मंडळाच्यावतीने प्रकाशित करण्यात येत आहे. महाराष्ट्राचा सांस्कृतिक पंरपरेचा महत्त्वाचा दुवा म्हणजे वास्तुकला होय. डॉ.नरेंद्र डेंगळे यांचा वास्तुकलेसंदर्भातील अत्यंत बहुमूल्य असा ‘महाराष्ट्रातील वास्तुकला परंपरा आणि वाटचाल’ या द्विखंडात्मक ग्रंथाचे प्रकाशन मंडळ करीत आहे. या ग्रंथाच्या मांडणीतून वास्तुकलेकडे बघण्याचा पारंपरिक आणि नवदृष्टीकोन यामधील साधर्म्य आणि वैविध्यता संकलित करण्यात आली आहे. वास्तुकलेतील सौंदर्य कसे पहावे, ते हा ग्रंथ विशद करतो. या ग्रंथात साधारण दोन हजार वर्षातील वास्तुकलेचा आढावा घेण्यात आला आहे.
याबरोबरच मंडळाच्यावतीने यापूर्वी प्रकाशित झालेली कानडी साहित्य परिचय महाराष्ट्राचे शिल्पकार शंकरराव किर्लोस्कर महाराष्ट्राचे शिल्पकार स्वामी रामानंद तीर्थ महाराष्ट्राचे शिल्पकार बॅ.नाथ पै महाराष्ट्राचे शिल्पकार दादासाहेब फाळके महाराष्ट्राचे शिल्पकार एस.एम.जोशी महाराष्ट्राचे शिल्पकार गोविंदभाई श्रॉफ महाराष्ट्राचे शिल्पकार कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाराष्ट्राचे शिल्पकार यदुनाथ थत्ते आराधना थेरीगाथा डॉ.बाबासाहेब आंबेडकर गौरवग्रंथ अशोक आणि मौर्यांचा ऱ्हास मानवी आनुवंशिकता महाराष्ट्राचा इतिहास (प्रागैतिहासिक) महाराष्ट्र खंड १ भाग १ कन्नड-मराठी शब्दकोश मराठी शब्दकोश खंड १ (अ ते औ) अस्पृश्यांचा लष्करी पेशा स्वातंत्र्याचे भय मराठी शब्दकोश खंड २ (क ते ङ) तुळशी मंजिऱ्या व मराठी शब्दकोश खंड ४ (त ते न) इत्यादी अशी मुद्रित व पुनर्मुद्रित मिळून ५१ मौलिक पुस्तके प्रकाशित करुन वाचकांना उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.
मंडळाच्या या पुस्तकाच्या माध्यमातून एकूणच मौलिक ग्रंथऐवज वाचकांना उपलब्ध होत आहे. याबरोबर मंडळाच्यावतीने ‘नवलेखक अनुदान’ योजना राबविली जाते. सदर योजनेअंतर्गत ज्यांचे यापूर्वी एकही पुस्तक प्रकाशित झाले नाही, अशा नवलेखकांचे काव्य, कथा, नाटक / एकांकिका, कादंबरी, ललितगद्य व बालवाङ्मय या वाङ्मयप्रकारात अनुदानातून पुस्तके प्रकाशित केली जातात. या योजनेमध्ये यावर्षी ‘युद्ध पेटले आहे’ लेखक बाळासाहेब नागरगोजे, ‘पेरणी’ लेखक ज्ञानेश्वर क. गायके, ‘वेशीबाहेर’ लेखक राजेश भांडे, ‘वैराण संघर्ष’ लेखक अमोल सुपेकर, ‘इच्छा’ लेखक श्रीमती भारती देव, ‘सुवास रातराणीचा’ लेखक डॉ.यशवंत सुरोशे, ‘रानफुल’ लेखक श्रीमती रुपाली रघुनाथ दळवी, ‘प्रतिशोध’ लेखक निनाद नंदकुमार चिंदरकर, ‘तिनसान आणि इतर तीन मालवणी एकांकिका’ लेखक विठ्ठल सावंत, ‘भुईकळा’ लेखक संदीप साठे, ‘अभंगसरिता’ लेखक अजय चव्हाण, ‘मृत्युंजय’ लेखक वासुदेव खोपडे, ‘डाल्याखालचं स्वातंत्र्य’ लेखक प्रा.डॉ. मनीषा सागर राऊत, ‘मित्रा…!’ लेखक प्रवीण सु. चांदोरे, ‘गावाकडच्या कथा’ लेखक आर.आर.पठाण, ‘परिवर्तन’ लेखक राजरत्न पेटकर व ‘अहिल्यानगरचे मानबिंदू’ लेखक प्रा.डॉ.नवनाथ काशिनाथ वाव्हळ ही नवलेखकांची १७ पुस्तके मंडळाकडून मराठी भाषा गौरवदिनी प्रकाशित होत आहेत.