Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

किल्ले रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन सोहळा उत्साहात संपन्न

16

अलिबाग, दि.06 :- छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्‍याभिषेक दिन सोहळा आज किल्‍ले रायगडावर शिवभक्‍तांच्या अभूतपूर्व उत्साहात संपन्न झाला. युवराज संभाजी राजे छत्रपती व युवराजकुमार शहाजी राजे छत्रपती यांच्‍या हस्‍ते शिवाजी महाराजांच्‍या पुतळ‌्याला मंत्रोच्‍चारांच्‍या जयघोषात जलाभिषेक तसेच दुग्‍धाभिषेक करण्‍यात आला. त्यानंतर मेघडंबरीतील शिवपुतळ्याला मुद्राभिषेक करण्‍यात आला. युवराज संभाजी राजे छत्रपती यांनी उपस्थित शिवभक्‍तांना मार्गदर्शन केले.
यावेळी युवराज्ञी संयोगिताराजे, आमदार अनिकेत तटकरे, आमदार प्रमोद (राजू) पाटील, आमदार मनोज चव्हाण, प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
अखिल भारतीय शिवराज्‍याभिषेक महोत्सव समितीने या सोहळ्याचे आयोजन केले होते. हा प्रेरणादायी सोहळा ‘याची देही याची डोळा’ अनुभवण्‍यासाठी शिवभक्‍तांनी प्रचंड गर्दी केली होती. होळीचा माळ, बाजारपेठ, राजदरबार शिवभक्‍तांनी फुलून गेला होता.
सकाळी ध्‍वजपूजनाने सोहळ्याला सुरूवात झाली. त्‍यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी राजसदरेकडे निघाली. यावेळी महाराजांच्या जयजयकार आणि ढोलताशांच्‍या निनादाने आसमंत दुमदुमून निघाला. हजारो शिवभक्त हातात भगवे झेंडे घेवून गुलाल आणि भंडाऱ्याची उधळण करीत जल्लोष करीत होते. होळीच्‍या माळावर सुरु असलेल्या मर्दानी खेळांच्या प्रात्‍यक्षिकांनी तर राजदरबारात सुरु असलेल्या शाहिरी पोवाड्यांनी सर्व परिसर वीररसाने न्हावून निघाला होता. महाराजांची पालखी राजसदरेवर येताच मुख्य सोहळ्याला सुरूवात झाली. युवराज संभाजी राजे छत्रपती व युवराजकुमार शहाजी राजे छत्रपती यांच्‍या हस्‍ते शिवाजी महाराजांच्‍या पुतळ्याला मंत्रोच्‍चारांच्‍या जयघोषात जलाभिषेक तसेच दुग्‍धाभिषेक करण्‍यात आला. त्यानंतर मेघडंबरीतील शिवपुतळ्याला मुद्राभिषेक करण्‍यात आला. युवराज संभाजी राजे छत्रपती यांनी उपस्थित शिवभक्‍तांना मार्गदर्शन केले. त्‍यानंतर मुख्य पालखी सोहळ‌्याला प्रारंभ झाला. श्रीजगदीश्‍वराचे दर्शन घेवून या चैतन्यमय सोहळ्याची सांगता झाली.
रायगड किल्ल्यावर शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याला येणाऱ्या शिवप्रेमींची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी कार्यक्रमाची रुपरेषा, गडावर जाण्याचे व उतरण्याचे प्रमुख मार्ग, राहण्याची सोय, वैद्यकीय सेवा, अन्नछत्र, स्वच्छतागृहे, महिलांसाठी करण्यात आलेली स्वतंत्र व्यवस्था, गडाच्या पायथ्याला असलेली वाहनतळे, पायथ्याचे अन्नछत्र याची सर्व माहिती व नकाशे QR कोड च्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात आली होती.
शिवप्रेमींसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आली आहे. गडावर व पायथ्याशी 35 ठिकाणी पाण्याच्या टाक्या ठेवण्यात आल्या असून गंगासागर तलावासह 04 ठिकाणी आरओ वॉटर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. गडाच्या पायथ्याला,पाचाड व कोंझर येथे वाहने पार्किंग सुविधा केली होती. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहने पाच ते सात किमी दूर उभी करण्यात आली होती. मात्र येथून शिवप्रेमींना ये-जा करण्यासाठी खास बस सुविधा मोफत ठेवण्यात आल्या होत्या. गडावर हॅलोजन व इतर वीजपुरवठा सेवा सज्ज ठेवण्यात आली. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातील विद्युत विभागाने आवश्यक ती तयारी पूर्ण केली. रायगडावर ये-जा करताना कोणताही अनुचित प्रकार घडल्यास तातडीने मदतकार्य मिळावे यासाठी विविध रेस्क्यू टिम व ट्रेकर्स तैनात आहेत. त्याचबरोबर ठिकठिकाणी चोख पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला.
आजच्या या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यात ‘धार तलवारीची, युद्धकला महाराष्ट्राची’ तसेच ‘जागर शिवशाहिरांचा..स्वराज्याच्या इतिहासाचा’ व ‘सोहळा पालखीचा, स्वराज्याच्या ऐक्याचा’ हे कार्यक्रम उपस्थित शिवभक्तांचे प्रमुख आकर्षण ठरले.
अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती आणि महसूल, पोलीस, सार्वजनिक बांधकाम, पाणीपुरवठा, आरोग्य, स्वच्छता, अग्निशमन अशा विविध शासकीय यंत्रणांसह विविध संस्था, रेस्क्यू टीम, ट्रेकर्स या सर्वांनी हा सोहळा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.