Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आईच्या मांडीतच प्राण सोडले, सहा महिन्यांच्या बाळाच्या घशात मासा गेला कसा? उत्तर मिळालं

4

ठाणे : मासा गिळल्यामुळे सहा महिन्यांच्या बाळाला प्राण गमवावे लागल्याची दुर्दैवी घटना काल समोर आली होती. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शहरात हा काळजाचा ठोका चुकवणारा प्रकार समोर आला होता. मात्र इतक्या लहान बाळाच्या तोंडात मासा गेलाच कसा, हा प्रश्न सर्वांना पडला होता. या प्रश्नाचं उत्तर अखेर समोर आलं आहे. बाळासोबत खेळणाऱ्या शेजार पाजारच्या लहान पोरांनी त्याला मासा खायला दिलं होतं. नकळत्या वयातील मुलांकडून झालेल्या या चुकीचे परिणाम आता कुटुंबाला भोगावे लागले आहेत.

शेजारी राहणाऱ्या लहान मुलांनी शाहबाज अन्सारी या सहा महिन्यांच्या चिमुकल्याला मासा दिला होता, तो गिळल्यामुळे मासा बाळाच्या घशात अडकला. अखेर श्वास घेता न आल्यामुळे तडफडून त्याला प्राण गमवावे लागले.

अंबरनाथमध्ये गुरुवारी संध्याकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास काही लहान मुलं शिजवलेले मासे खात होते. यावेळी यापैकी एका चिमुकल्याने आपल्याकडचा अख्खा मासा सहा महिन्यांच्या शाहबाज अन्सारीला दिला. शाहबाजने काही मिनिटं तो हातात धरुन ठेवला होता, त्यानंतर तो तोंडात घालून अख्खाच्या अख्खा गिळण्याचा प्रयत्न केला.

बाळाने मासा तोंडात घालताच त्याला ठसका लागला. मात्र तो घशात अडकल्यामुळे त्याला श्वास घेण्यात अडथळे येऊ लागले. गुदमरलेल्या शाहबाजने भोकाड पसरलं. अशी माहिती अंबरनाथ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक आर के कोटे यांनी दिली.

बाळाला तडफडताना पाहून त्याच्या बरोबर खेळणारी शेजारची लहान मुलं धावत त्याच्या घरी गेली. तुमच्या शाहबाजला बघा कसं होतंय, हे शब्द ऐकताच माऊली धावत बाहेर गेली. तिने कळवळणारं लेकरु पाहून त्याला मांडीवर घेतलं. त्यानंतर त्याच्या इवल्याशा जबड्यात हात घालून आईने तो मासा बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, मात्र तो निष्फळ ठरला.

बाळाला तातडीने रुग्णालयात नेण्याचा निर्णय आईने घेतला. आईसोबत इतर काही जण बाळाला घेऊन नर्सिंग होममध्ये निघाले. मात्र दुर्दैव म्हणजे हॉस्पिटलच्या वाटेवर असतानाच लेकराने आईच्या मांडीवर प्राण सोडले.

रुग्णालयात नेत असताना श्वास घेण्यास त्रास झाल्यामुळे बाळाचा मृत्यू झाला. नंतरही त्याच्या घशात अडकलेला मासा बाहेर काढण्याचा आणखी एक अयशस्वी प्रयत्न करण्यात आला.

हेही वाचा : आईचा मृत्यू होताच मुलानेही सोडले प्राण; माय-लेकावर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्याची वेळ

त्यानंतर मुलाला उल्हासनगर येथील सरकारी मध्यवर्ती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. श्वास घेण्यास त्रास झाल्यामुळे इथे आणण्यापूर्वीच बाळाचा मृत्यू झाला, अशी माहिती डॉ राजेश म्हस्के यांनी दिली. नंतर हा मासा बाळाच्या घशातून बाहेर काढून टाकण्यात आला होता.

हसरं-खेळतं चिमुकलं बाळ एकाएकी निघून गेल्याने परिसरावर शोककळा पसरली आहे. तर त्याच्यासोबत नेहमी खेळणारी मुलंही धक्क्यात आहेत. या घटनेमुळे अन्सारी कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.

हेही वाचा : ज्याच्या लग्नाचं आमंत्रण, त्याच्याच अंत्यविधीला जाण्याची वेळ, २६ वर्षीय नवरदेवाचा करुण अंत

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.