Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
नवी दिल्ली, 13 : महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारे ‘स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारा’साठीच्या प्रवेशिका महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात मागविण्यात आलेल्या आहेत. या पुरस्कारांतर्गत नवी दिल्लीसह बृहन्महाराष्ट्रातील मराठी लेखक तसेच प्रकाशकांना ‘सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कारा’साठी महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली येथे प्रवेशिका पाठविता येणार आहे.
मराठी भाषेतील उत्कृष्ट वाड़मय निर्मितीसाठी राज्य शासनाच्या महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने ‘स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार योजने’अंतर्गत विविध साहित्य प्रकारांसाठी पुरस्कार प्रदान करण्यात येतात. प्रकाशन वर्ष 2022 करिता १ जानेवारी ते ३१ डिसेंबर 2022 या कालावधीत प्रकाशित प्रथम आवृत्ती पुस्तके आणि प्रवेशिका या स्पर्धेसाठी ३१ जानेवारी 2023 पर्यंत पाठविता येणार आहे.
एकूण ४ विभाग, ३५ साहित्य प्रकार आणि २९ लाख रूपयांचा पुरस्कार
स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार योजनेअंतर्गत एकूण चार विभागात ३५ साहित्य प्रकारांसाठी प्रवेशिका मागविण्यात आल्या आहेत. प्रौढ वाड्.मय विभागात एकूण 22 साहित्य प्रकार असून प्रत्येकी १ लाख रुपये या प्रमाणे एकूण 22 लाख रूपयांची पुरस्कारांची रक्कम आहे.
बाल वाङ्मय विभागात एकूण 6 साहित्य प्रकारात प्रत्येकी ५० हजार रुपये याप्रमाणे एकूण 3 लाख रूपयांची पुरस्कार रक्कम आहे.
प्रथम प्रकाशन प्रकारातील एकूण 6 साहित्य प्रकारांसाठी प्रत्येकी ५० हजार रुपये या प्रमाणे एकूण 3 लाख रूपयांची पुरस्कार रक्कम आहे.
‘सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कार’ हा खास बृहन्महाराष्ट्रातील उत्कृष्ट साहित्य निर्मितीसाठी प्रदान करण्यात येणार आहे. या श्रेणीत उत्कृष्ट साहित्य निर्मितीसाठी साहित्याच्या सर्व प्रकारातील साहित्यकृती या पुरस्कारासाठी पाठविता येणार असून उत्कृष्ट साहित्यकृतीस ‘सयाजी महाराज गायकवाड पुरस्कार’ (पुरस्कार रक्कम 1,00,000 रूपये) प्रदान करण्यात येणार आहे.
बृहन्महाराष्ट्र क्षेत्रातील विजेत्यांसाठी ‘सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कार’ (सर्व साहित्य प्रकार) साठी निवड केली जाईल. प्रवेशिका पूर्णत: भरुन आवश्यक साहित्यासह सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात किंवा महाराष्ट्र परिचय केंद्र नवी दिल्ली यांच्याकडे 31 जानेवारी 2023 पर्यंत पोहचतील अशा बेताने पाठवाव्यात. लेखक / प्रकाशक या स्पेर्धसाठी प्रवेशिका दाखल करु शकतात.
महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ‘नवीन संदेश’ या सदरात ‘स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड:मय पुरस्कार २०२१ नियमावली व प्रवेशिका’ या शीर्षाखाली व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या http://msblc.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रवेशिका व नियम पुस्तिका उपलब्ध आहे. यासह या स्पर्धेची नियमावली व प्रवेशिका सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्य मंदिर इमारत, दूसरा मजला, सयानी रोड, प्रभा देवी, मुंबई-400 025 यांच्या कार्यालयात उपलब्ध आहे. तसेच, बृहन्महाराष्ट्रातील लेखक व प्रकाशकांसाठी महाराष्ट्र परिचय केंद्र, ए/8, स्टेट एम्पोरिया बिल्डींग, बाबाखडक सिंह मार्ग, नवी दिल्ली या कार्यालयातही स्पर्धेची नियमावली व प्रवेशिका उपलब्ध आहे.
ज्या लेखक व प्रकाशकांना या योजनेत भाग घ्यावयाचा असेल, त्यांनी (मुंबईतील लेखक /प्रकाशकांनी) पुस्तकांच्या दोन प्रतींसह विहित नमुन्यातील प्रवेशिका सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्य मंदिर इमारत, दुसरा मजला, सयानी रोड, प्रभादेवी, मुंबई 400025 येथे पाठवाव्यात.
मुंबई वगळता राज्यातील अन्य ठिकाणच्या लेखक/प्रकाशकांनी संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाव्दारे तर बृहन्महाराष्ट्रातील लेखक व प्रकाशकांनी थेट महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या मुख्य कार्यालयात किंवा महाराष्ट्र परिचय केंद्र नवी दिल्ली या कार्यालयाकडे हे साहित्य व प्रवेशिका 1 जानेवारी ते 31 जानेवारी 2023 पर्यंत पाठवावे, असे आवाहन सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांनी केले आहे.
पुरस्कारासाठीची प्रवेशिका व नियमावली इच्छुकांना पाहण्यासाठी व सहभाग घेण्यासाठी या कार्यालयात उपलब्ध आहे.
००००
मपकेंनदि/वि.वृ.क्र.194