Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
राज्यातील फुटबॉलच्या विकासासाठी एफ.सी. बायर्न म्युनिक यांच्यासोबतचा सामंजस्य करार महत्त्वाचा – क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन
मुंबई, दि. १३ : राज्यातील फुटबॉल खेळाच्या विकासासाठी महाराष्ट्र राज्य क्रीडा विभाग व एफ.सी बायर्न म्युनिक (FC Bayern Munich) जर्मनी यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. हा सामंजस्य करार जी २० देशांतील सहकार्य वाढीच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.
मंत्रालयात क्रीडा व युवक कल्याण मंत्री श्री. महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली एफ. सी. बायर्न म्युनिच (FC Bayern Munich) यांच्यासमवेत करार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याअनुषंगाने राज्य शासन व क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने क्रीडा व युवक सेवा विभागाचे आयुक्त डॉ. सुहास दिवसे आणि बायर्न म्युनिच क्लबच्या प्रतिनिधींनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. या सामंजस्य करारावेळी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे सचिव रणजितसिंह देओल, पर्यावरण विभागाचे सचिव प्रवीण दराडे तसेच क्लबचे प्रतिनिधी क्रिस्टोफर किल, मोसुज मॅटस्, मॅक्सी मिलियन, कौशिक मौलिक तसेच क्रीडा विभागाचे उपसचिव सुनील हंजे, आदी उपस्थित होते.
जी -२० परिषदेचे वन अर्थ, वन फॅमिली, वन फ्यूचर हे घोषवाक्य प्रत्यक्षात साकार होण्यास मदत
मंत्री श्री. महाजन म्हणाले, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात जी -२० परिषदेचे सन २०२३ चे अध्यक्षपद भारतास मिळाले असून सन २०२३ मध्ये जी -२० परिषद भारतात होत आहे. या परिषदेच्या निमित्ताने राज्यात एकूण १४ बैठका होणार आहेत. यामधील जी-२० परिषदेच्या विकास कार्यगटाची बैठक १३ ते १६ डिसेंबर,२०२२ या कालावधीत मुंबई येथे होत आहे. जर्मनी हा देश जी -२० परिषदेचा सदस्य असून महाराष्ट्र शासन व एफ. सी. बायर्न म्युनिक (FC Bayern Munich) जर्मनी यांच्यातील होणारा सामंजस्य करार जी २० देशांतील सहकार्य वाढीच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल आहे. या करारामुळे सन २०२३च्या जी -२० परिषदेचे ‘वन अर्थ, वन फॅमिली, वन फ्यूचर’ हे घोषवाक्य प्रत्यक्षात साकार होण्यास मदत होणार आहे व दोन्ही देशातील क्रीडा व सांस्कृतिक आदान-प्रदानास चालना मिळणार आहे.
राज्यातील फुटबॉलची दर्जात्मक वाढ होण्यासाठी एफ.सी बायर्न म्युनिक जर्मनी सामंजस्य करार महत्त्वाचा
सध्या फिफा फुटबॉल विश्वकरंडक स्पर्धा – २०२२ कतार या देशात सुरु आहे. संपूर्ण जगात लोकप्रिय असलेल्या फुटबॉल खेळाची लोकप्रियता भारतात देखील वेगाने वाढत आहे. नुकतीच भारतात फिफा १७ वर्षाखालील मुलींची फुटबॉल विश्वचषक स्पर्धा यशस्वीपणे आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्रातील फुटबॉल खेळाला चालना व दर्जात्मक वाढ होण्यासाठी एफ.सी. बायर्न म्युनिच (FC Bayern Munich) जर्मनी या फुटबॉल जगतातील नामांकित क्लबसोबत महाराष्ट्र शासनाचा क्रीडा विभाग सामंजस्य करार करत असल्याचे मंत्री श्री. महाजन यांनी सांगितले.
क्रीडा क्षेत्राच्या प्रगतीसाठी राज्य शासन कटिबद्ध
महाराष्ट्राला क्रीडा संस्कृतीचा मोठा वारसा लाभला आहे. भारताला पहिले ऑलिम्पिक पदक खाशाबा जाधव यांच्या रुपाने मिळाले आहे. क्रीडा क्षेत्राच्या प्रगतीसाठी राज्य शासन कटिबद्ध असून राज्यात फुटबॉल खेळ मोठ्या प्रमाणात खेळला जात असल्याने या खेळाच्या दर्जात्मक वाढीसाठी जागतिक स्तरावरील नामांकित संस्थेशी दूरदृष्टीने विचार करुन विकास आराखडा तयार करण्यात येणार असल्याची माहिती क्रीडा व युवक कल्याण मंत्री श्री. महाजन यांनी दिली.
राज्यातील प्रतिभावंत खेळाडूंची निवड करुन त्यांना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण
मंत्री श्री महाजन म्हणाले की, एफ.सी बायर्न म्युनिच (FC Bayern Munich) हा जागतिक दर्जाचा नामांकित फुटबॉल क्लब आहे. हा जर्मनी येथील सर्वोत्तम फुटबॉल क्लब असून त्यांनी सर्वाधिक वेळा त्यांच्या देशातील राष्ट्रीय नामांकित स्पर्धा विजेत्याचा बहुमान मिळविलेला आहे. या क्लबने आंतरराष्ट्रीय दर्जाचे नामांकित फुटबॉल खेळाडू निर्माण केलेले आहेत
ग्रामीण व शहरी भागातील शाळा, क्लब यामधून प्रतिभावंत खेळाडूंचा शोध
या क्लबचा फुटबॉल विषयक अनुभवाचा फायदा राज्यातील फुटबॉलच्या दर्जात्मक वाढीसाठी मिळावा या हेतूने सामंजस्य करार करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण व शहरी भागातील शाळा, क्लब यामधून प्रतिभावंत खेळाडूंचा शोध घेण्यासाठीची मोहीम या करारानंतर हाती घेण्यात येणार असून १४ ते १६ वर्षाखालील मुलांच्या “एफ सी महाराष्ट्र फुटबॉल कप ” स्पर्धा घेऊन यामधून २० खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे.
राज्यामध्ये खेळाडूंसाठी फुटबॉल प्रशिक्षण शिबीरांचे आयोजन
याचबरोबर क्रीडा प्रशिक्षकांसाठी प्रशिक्षण आराखडा, चर्चासत्र व प्रशिक्षण शिबारांचे आयोजन करण्यात या क्लबचे सहकार्य मिळणार आहे. या माध्यमातून राज्यातील २० खेळाडू व ३ प्रशिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून म्युनिच, जर्मनी येथे FC Bayern Munich Cup मध्ये सामने खेळण्याची संधी उपलब्ध होणार आहे. राज्यामध्ये खेळाडूंसाठी फुटबॉल प्रशिक्षण शिबीरांचे आयोजनासाठी देखील या क्लबचे सहकार्य घेण्यात येणार आहे.
राज्य शासनाच्या क्रीडा विभागाची फुटबॉल खेळासाठीची क्रीडा प्रबोधिनी शिवछत्रपती क्रीडापीठ, बालेवाडी, पुणे येथे कार्यरत आहे. याठिकाणी फुटबॉलचे हाय परफॉरमन्स सेंटर करण्याचा शासनाचा मानस आहे. त्यामुळे या सामंजस्य कराराचा लाभ प्रशिक्षणार्थींना आगामी काळात होणार असल्याचे मंत्री श्री. महाजन यांनी यावेळी सांगितले.
0000
राजू धोत्रे/विसंअ/