Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
पुणे, दि. २० -परिसरात नरबळी, इतर अमानुष अनिष्ट, अघोर प्रथा आणि जादूटोणाच्या घटना घडल्यास किंवा निदर्शनास आल्यास नागरिकांनी पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समुळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३ नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येते. भूत उतरविण्याच्या बहाण्याने एखाद्या व्यक्तीला दोराने किंवा साखळीने बांधून ठेवून तिला मारहाण करणे, काठीने किंवा चाबकाने मारणे, पादत्राणे भिजवलेले पाणी प्यायला लावणे, मिरचीची धुरी देणे, छताला टांगणे, दोराने किंवा केसांनी बांधणे किंवा त्या व्यक्तीचे केस उपटणे, व्यक्तीच्या शरीरावर किंवा अवयवांवर तापलेल्या वस्तुचे चटके देऊन इजा पोहचविणे, उघड्यावर लैंगिक कृत्य करण्याची जबरदस्ती करणे, व्यक्तीवर अमानुष कृत्य करणे, व्यक्तीच्या तोंडात जबरदस्तीने मूत्र किंवा विष्ठा घालणे किंवा या स्वरुपाच्या कृती करणे या अधिनियमामधील कलम २ (१) (ख) मधील १ ते १२ मध्ये नमूद करण्यात आलेले अपराध आहेत.
गुन्हा पात्र कृत्याची जाहिरात, साहित्य, लेख किंवा पुस्तक यांचे वितरण करणे किंवा ते प्रसिद्ध करणे, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरुपातील सहाय्य, अपप्रेरणा, सहभाग किंवा सहकार्य देणे यांचाही यात समावेश होतो. अशा अपराधासाठी दोषी असलेल्या व्यक्तीस, दोष सिद्ध झाल्यानंतर ६ महिने कारावास व ५ हजार रुपये दंड ते ७ वर्षे कारावास व ५० हजार रुपये दंड असून शिक्षापात्र अपराध हे दखलपात्र व अजामीनपात्र असतील अशी तरतुद करण्यात अली आहे.
प्रत्येक तालुक्यात पोलीस स्टेशनच्या निरीक्षकांची दक्षता अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली असून त्यांना स्वतः तक्रार दाखल करून घेण्याचे अधिकार देण्यात आल्याची माहिती सहायक आयुक्त संगीता डावखर यांनी दिली आहे.