Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
श्रीगुरुचरित्र या ग्रंथाचे अध्याय
श्रीगुरुचरित्र या ग्रंथाचे ५२ अध्याय असून ओवीसंख्या ७,४९१ इतकी आहे. काही ग्रंथात ५३ अध्याय आहेत. त्याची विभागणी ज्ञानकाण्ड, कर्मकाण्ड, भक्तिकाण्ड यांचा समन्वय यात साधला असून या तीनही उपासनांसाठी गुरुचे मार्गदर्शनच कसे आवश्यक आहे, याचे अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन ग्रंथकर्त्याने आपल्या ओघवत्या भाषेत केले आहे. या ग्रंथात श्रीपादश्रीवल्लभ व श्रीनृसिंहसरस्वती यांच्या लीलांचे चमत्कृतिपूर्ण वर्णन रसाळपणे केले आहे. इतकेच नव्हे तर श्रीगुरुंच्या चरित्राच्या निमित्ताने त्यांच्या असंख्य लीलांचे कथात्मक निरुपण अतिशय सुबोध व प्रासादिक भाषेत केले आहे.
अशी करावी पारायणाची तयारी
श्री गुरुचरित्र वाचन सुरू करण्यापूर्वी आदल्या दिवशी, समक्ष चार कुत्रे व गाय, यांना नैवेद्य द्यावा. चार कुत्रे म्हणजे, चार वेद होय व १ गाय म्हणजे दत्तात्रेयांची कामधेनु असल्याने हा नियम पाळावा, असे सांगितले जाते. पारायणापूर्वी फुले विशेषतः देशी गुलाबाची हार, तुळशी, सुगंधी उदबत्ती, धूप, कलश, विड्याची पाने, नैवेद्यासाठी पेढे किंवा अन्य काही, अष्टगंध, चंदन, अत्तर, रांगोळी, दोन आसने, १ चौरंग, चौरंगावर पिवळे किंवा भगवे कापड, चौरंगाभोवती व गुरु दत्तात्रेयांचे आसनाभोवती रांगोळी काढावी. चौरंगास आंब्याचे तोरण बांधावे, प्रमुख दरवाज्यात तोरण बांधावे, चौरंगाजवळ डाव्या बाजूस समई लावावी. वाचन चालू असेपर्यंत, समई लागलेली असावी व अगरबत्ती पेटती ठेवावी.पारायणास बसण्यापूर्वी गावातील दत्त मंदिरात अथवा जवळच्या श्री स्वामी समर्थ केंद्रात जाऊन विडा सुपारी व नारळ ठेवून, सदर पारायणास उपस्थित राहण्यासाठी देवास प्रार्थना करावी. घरातील वडील मंडळीस नमस्कार करून, पारायणासाठी आसन ग्रहण करावे. प्रथम अथर्वशीर्ष वाचावे. १ माळ गायत्री जप. १ माळ श्री स्वामी समर्थ जप . अथवा दत्त मंत्र म्हणावा
शास्त्रशुद्ध सप्ताह करण्यासाठी खालील नियम पाळावेत
श्री गुरु चरित्र सप्ताह करताना प्रारंभ शक्यतो शनिवारी व सांगता शक्यतो शुक्रवारी करावी. कारण शुक्रवार हा श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा निजानंदगमनाचा दिवस आहे.
श्री गुरु चरित्र वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी एक गाय व चार कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैव्यद्य खाऊ घालावा
श्री गुरु चरित्र चे वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे. वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची व पोथीची पूजा करून एक माळ गायत्री मंत्र, एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. व श्री गणपती अथर्वशीर्ष वाचून पोथी वाचण्यास सुरुवात करावी.
श्री गुरु चरित्राचे वाचन पहाटे ०३ ते सायंकाळी ०४ या दरम्यान करावे. दुपारी १२ ते १२.३० ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने त्या वेळेस पारायण वाचन बंद ठेवावे.
श्री गुरु चरित्र वाचनाच्या कालावधीत दुसऱ्यांच्या घरचे अन्न घेऊ नये. आपली आई, पत्नी व बहीण यांच्या हाताचे अन्न खाण्यास हरकत नाही. उपवास करू नये. दोन्ही वेळेस (सकाळ ..संध्याकाळ) एक धान्य फराळ करावा. काही समस्या असल्यास स्वखर्चाने बाहेर खाण्यास हरकत नाही.
श्री गुरु चरित्र वाचण्याच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नये, स्वतः च्या हाताने दाढी करावी. तसेच या काळात चामड्या ऐवजी नॉयलॉन किंवा रबरी चप्पल जोड वापरावे. श्री गुरु चरित्र वाचनाच्या कालावधीत ब्रम्हचर्य पाळावे.
श्री गुरु चरित्र वाचनाच्या कालावधीत सुतक असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीस जाऊ नये. स्वतः च्या कुटुंबात जर सुतक आले तर अशा वेळेस श्री गुरु चरित्र पारायण दुसऱ्यांकडून पूर्ण करावे, अर्धवट सोडू नये. वेळोवेळी गोमूत्र शिंपडावे.
सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरु चरीत्राच्या पोथीस नैव्यद्य दाखवून आरती करावी. रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्त्रनाम वाचावे.
श्री गुरु चरित्र वाचण्याची पूर्वापार पद्धत
पहिला दिवस – अध्याय १ ते ९
दुसरा दिवस – अध्याय १० ते २१
तिसरा दिवस – अध्याय २२ ते २९
चौथा दिवस – अध्याय ३० ते ३५
पाचवा दिवस – अध्याय ३६ ते ३८
सहावा दिवस – अध्याय ३९ ते ४३
सातवा दिवस – अध्याय ४४ ते ५३
श्री गुरु चरित्र सप्ताह हा सात दिवसाचे एक पारायण या पद्धतीने करावयाचा असतो. परंतु २१ दिवसात ३ पारायण ,४९ दिवसात ७ पारायण करावयाच्या देखील पद्धती आहेत. सात दिवसाच्या सप्ताहाची आठव्या दिवशी सांगता करावी. सांगतेच्या दिवशी सकाळी १०.३० वाजता श्री दत्त महाराज, श्री कुलदेवता, श्री स्वामी समर्थ महाराज व एक श्री गुरु चरित्र ग्रंथ करिता नैव्यद्य मांडावा. ग्रंथाचा नैव्यद्य गाईला खाऊ घालावा किंवा स्वतः घ्यावा. व मगच आपण भोजन करावे. श्री गुरु चरित्र वाचनाच्या कालावधी मध्ये सुद्धा आपल्या नित्य सेवेत खंड पडू देऊ नये. शक्य तोवर जमिनीवर झोपावे, पलंगावर झोपू नये.
हे देखील जाणकारांना माहित असावे
श्री गुरु चरित्र तीन दिवसीय वाचू नये. एक दिवसीय पारायण फक्त दत्तधाम व राष्ट्र सेवेसाठी करावे. वैयक्तिक पारायण सात दिवसाचे करावे. श्री गुरुचरीत्राच्या निष्ठापूर्वक पारायण ने अनुभूती पूर्वक साक्षात्कार होतो. हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे. दुःखिताना, वेगवेगळ्या प्रकारच्या शापिताना ,असाध्य आजार झालेल्यांना, पितृ दोष असणाऱ्यांना श्री गुरु चरित्र एकमेव असे साधन आहे जे शुभ फल प्राप्ती देते असे सांगण्यात येते.
टिप : सेवेकऱ्यांसाठी ही माहिती देण्यात आली आहे. ही माहिती आपल्या जवळच्या श्री स्वामी समर्थ केंद्रात दिली जाते.