Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

यूजीसीकडून नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्क जाहीर

15

म. टा. प्रतिनिधी, पुणे

विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्क प्रसिद्ध केले असून, त्यानुसार शालेय शिक्षणापासून ते पीएचडीपर्यंतच्या शिक्षणासाठी ८ ते ३२० क्रेडिटची विभागणी केली आहे. त्यानुसार चार वर्षांची पदवी पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्याला २४० क्रेडिटचे शिक्षण पूर्ण करावे लागणार आहे, तर पदव्युत्तर पदवीचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी २६० क्रेडिटचा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे.

हे क्रेडिट घेण्यासाठी विद्यार्थ्यांना एका शैक्षणिक वर्षात साधारण १२०० तासांचा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार असून, त्याला ‘नोशनल लर्निंग अवर्स’ असे संबोधल्या जाणार आहे. याद्वारे विद्यार्थ्याला ४० क्रेडिट मिळतील.

या फ्रेमवर्कची अंमलबजावणी करण्याची सूचना ‘यूजीसी’ने शैक्षणिक संस्थांना दिली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी या फ्रेमवर्कची निर्मिती करण्यात आली आहे. त्यासाठी केंद्र सरकारने डॉ. निर्मलजित सिंग कलसी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीची स्थापना केली होती. त्यात ‘यूजीसी’, ‘एआयसीटीई’, ‘सीबीएसई’, ‘एनआयओएस’, शिक्षण मंत्रालय आणि ‘एनसीईआरटी’ अशा देशातील शिखर संस्थांच्या प्रतिनिधींनी एकत्र येऊन मसुदा तयार केला होता.

या मसुद्यावर हरकती आणि सूचना आल्यानंतर, आता अंतिम फ्रेमवर्क जाहीर करण्यात आले आहे. त्यामध्ये शालेय शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत विविध टप्प्यांवर ०.१ ते ८ असे ‘नॅशनल क्रेडिट लेव्हल’ जाहीर करण्यात आले आहे. या फ्रेमवर्कमधील तरतुदींनुसार शालेय आणि उच्च शिक्षणात शैक्षणिक पात्रतेनुसार ‘मल्टिपल एंट्री मल्टिपल एक्झिट’ची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

मूल्यमापन बंधनकारक

वर्गातील मूल्यमापन, प्रयोगशाळेतील प्रात्यक्षिके, प्रकल्प, गृहपाठ यांसाठी मिळवलेल्या क्रेडिटवरून एकूण अभ्यासाचे तास मोजले जातील. वर्गातील अध्ययनाच्या पलीकडे क्रीडा, योग, शारीरिक उपक्रम, सादरीकरण, हस्तकला आदींचा मूल्यमापन आराखड्यात समावेश असेल. विद्यार्थ्यांनी मिळवलेले क्रेडिट ‘क्रेडिट बँकेत’ साठवले जातील. या क्रेडिटचा वापर विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी करता येईल. ऑनलाइन, डिजिटल आणि ब्लेंडेड शिक्षणासाठीही क्रेडिट दिले जातील. क्रेडिट मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांचे मूल्यमापन बंधनकारक आहे. या आराखड्याद्वारे विज्ञान, सामाजिक शास्त्र, वाणिज्य, कला यातील भेदभाव नष्ट केला जाईल. अभ्यासक्रम, पात्रतेला समकक्षता देऊन शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयीकरण करता येईल, असे नमूद केले आहे.

प्रत्येक विषयाला आठ क्रेडिट

शालेय शिक्षणातील प्रत्येक विषयाचा अभ्यास करण्यासाठी २४० तास देण्यात आले आहेत. या पद्धतीने पाच विषयांचा अभ्यास करता येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा एकूण १२०० तासांचा अभ्यास पूर्ण होऊन, त्याला ४० क्रेडिट मिळतील. प्रत्येक विषयाला आठ क्रेडिट देण्यात आले आहेत. त्यामुळे एक क्रेडिट मिळवण्यासाठी ३० तासांचा अभ्याक्रम पूर्ण करावा लागणार आहे.

४० टक्के थिअरी; ६० टक्के प्रॅक्टिकल्स

पदवी अभ्यासक्रमांच्या शिक्षणात कौशल्य शिक्षणाचा अंतर्भाव करण्यासाठी ३० ते ४० टक्के अभ्यासक्रम थिअरी स्वरूपात असणे गरजेचे आहे. त्यात सॉफ्ट स्किल्स, डिजिटल स्किल्स, कम्युनिकेशन स्किल्स, क्रिटिकल थिंकिंग अशा घटकांचा समावेश अनिवार्य आहे. उर्वरित ६० ते ७० टक्क्यांपर्यंतचा अभ्यासक्रम कौशल्यांवर आधारित असायला हवा, असे नमूद करण्यात आले आहे. यामध्ये प्रात्यक्षिके, इंटर्नशिप, हँडस् ऑन ट्रेनिंग अशा घटकांचा समावेश हवा.

शैक्षणिक पात्रता लेव्हल क्रेडिट

नववी २.५ १००

दहावी ३ १२०

अकरावी ३.५ १४०

बारावी ४ १६०

तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम ५.५ २२०

चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम ६ २६०

पदव्युत्तर पदवी ७ २८०

पीएचडी अभ्यासक्रम ८ ३२०

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.