Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
पिंपरी चिंचवड ,दि. १० :- जगावे कसे हे छत्रपती शिवाजी महाराज यांनी शिकवले. तर, शेवटच्या श्वासापर्यंत लढावे कसे, हे छत्रपती संभाजी महाराज यांनी शिकवले. प्रतिकूल परिस्थितीतही खंबीरपणे लढण्याची प्रेरणा संभाजी महाराजांकडून घ्यावी, असे प्रतिपादन शिरूर लोकसभेचे खासदार व प्रसिध्द अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी चिंचवडला केले.
दिशा सोशल फाऊंडेशनच्या वतीने आयोजित दिलखुलास गप्पांच्या कार्यक्रमात ते बोलत होते. माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे यांच्या हस्ते डॉ. कोल्हे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल शिवप्रेमी ब. हि. चिंचवडे. श्रमिक गोजमगुंडे, संजय पाचपुते, प्रद्योत पेंढारकर, दिनेश ठोंबरे, आयुष तापकीर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. दिशा फाऊंडेशनचे अध्यक्ष जगन्नाथ (नाना) शिवले यांनी घेतलेल्या मुलाखतीत डॉ. कोल्हे यांनी मनमोकळेपणाने उत्तरे दिली.
पिंपरीतील एच. एच. कंपनीच्या मैदानावर ११ ते १६ मे दरम्यान शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे प्रयोग होणार आहेत. याचे औचित्य साधून प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहात मुलाखतीचा कार्यक्रम पार पडला.
यावेळी डॉ. कोल्हे म्हणाले की, स्वराज्यनिष्ठा, शौर्य, धैर्य अशा अनेक अंगाने संभाजी महाराजांचे चित्र रेखाटले जाते. जगाच्या इतिहासात असा एकमेव राजा आहे, ज्याच्या बलिदानानंतर रयतेने तब्बल १८ वर्षे निकराने लढा दिला. काबूल ते बंगालपर्यंत साम्राज्य असलेल्या शहेनशहा औरंगजेबची कबर खोदली. संभाजी महाराजांच्या इतिहासाचे सार शिवपुत्र संभाजी या महानाट्य द्वारे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
कोल्हे म्हणाले की, पुढची लोकसभा निवडणूक लढवायची की नाही, लढवली तर कोणत्या पक्षाकडून तथा कोणत्या मतदारसंघातून लढायची, याविषयी काहीही ठरवलेले नाही. योग्य वेळी परिस्थिती पाहून निर्णय घेईन. एखादे पद मिळालेच पाहिजे, असा अट्टाहास असता कामा नये. लोकांच्या हितासाठी, प्रश्नांसाठी काम करत राहणे केव्हाही चांगले. पद, प्रतिष्ठा, पैसा हे एकीकडे ठेवले तरी महाराजांचा जिरेटोप, कवड्यांची माळ असणारे दुसरे पारडे माझ्यासाठी कायमस्वरूपी महत्त्वाचे आहे. ३५० वर्षे मागे जाऊन शिवरायांचा इतिहास सांगण्याची संधी मिळते, हेच माझ्या दृष्टीने भाग्याचे आहे. बदल हा निसर्गाचा नियम आहे. त्यानुसार, एखादा मतदारसंघ म्हणजे आपली मक्तेदारी आहे, असे मानणे चुकीचे आहे. कधीतरी बदल होणारच आहे. महाराजांचे विचार केवळ बोलण्यापुरते असता कामा नये, त्या विचारांचे अनुकरणही करता आले पाहिजे, असे मत डॉ. कोल्हे यांनी व्यक्त केले.
यावेळी राजेंद्र करपे, संतोष बाबर, संतोष निंबाळकर, नंदकुमार कांबळे, गोरख भालेकर, सचिन साठे आदी पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन अक्षय मोरे यांनी केले. नंदकुमार कांबळे यांनी आभार मानले.