Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
या दिवशी साजरा झाला पहिला ‘जागतिक एड्स दिन’ :
एड्स दिवस, जो आज संपूर्ण जग साजरा करत आहे, त्याची संकल्पना थॉमस नेटर आणि जेम्स डब्लू. बन यांनी १९८७ मध्ये मांडली होती. थॉमस नेटर आणि जेम्स डब्ल्यू. बन हे दोघेही स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे WHO (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन) च्या एड्स ग्लोबल प्रोग्रामसाठी सार्वजनिक माहिती अधिकारी होते. त्यांनी एड्स दिनाची त्यांची कल्पना डॉ. जोनाथन मुन (एड्स ग्लोबल प्रोग्रामचे संचालक) यांच्याशी शेअर केली, ज्यांनी या कल्पनेला मान्यता दिली आणि १९८८ पासून, १ डिसेंबर हा जागतिक एड्स दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला.सुरुवातीला जागतिक एड्स दिन केवळ लहान मुले आणि तरुणांशी संबंधित होता, परंतु नंतर एचआयव्ही संसर्ग कोणत्याही वयोगटातील लोकांना होऊ शकतो असे आढळून आल्यानंतर १९९६ मध्ये, संयुक्त राष्ट्र संघाने जागतिक स्तरावर एड्सचा प्रचार आणि प्रसार करण्याचे काम हाती घेतले आणि १९९७ पासून जागतिक एड्स मोहीम सुरू केली.
हा आहे ‘जागतिक एड्स दिन’ साजरा करण्याचे उद्देश :
‘जागतिक एड्स दिन’ साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश प्रत्येक वयोगटातील लोकांना एचआयव्ही एड्समुळे पसरलेल्या संसर्गाबद्दल प्रबोधन करणे हा आहे. एड्स ही आज जगातील सर्वात मोठी आरोग्य समस्या आहे. कारण यावर अद्याप कोणतीही लस उपलब्ध नाही. २०२१ मधील युनिसेफच्या अहवालानुसार, जगभरात ३६.९ दशलक्ष लोक एचआयव्हीचे बळी ठरले आहेत. तर भारत सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात एचआयव्ही रुग्णांची संख्या सुमारे २.१ दशलक्ष आहे.
एचआयव्ही एड्स म्हणजे काय?
एचआयव्ही हा एक गंभीर आजार आहे जो एका प्रकारच्या प्राणघातक संसर्गामुळे होतो. एड्सचे पूर्ण नाव ‘अक्वायर्ड इम्यून डेफिशियन्सी सिंड्रोम (acquired immune deficiency syndrome)’ आहे. हा एक प्रकारचा विषाणू आहे, ज्याचे नाव एचआयव्ही (ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस/Human immunodeficiency virus) आहे. या आजारात संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीवर हा व्हायरस हल्ला करतो. त्यामुळे शरीर सामान्य आजारांशीही लढण्यास असमर्थ ठरते. विशेष म्हणजे हा आजार तीन टप्प्यात होतो (प्राथमिक अवस्था, वैद्यकीय विलंब आणि एड्स).
१९५९ साली काँगोमध्ये आढळला पहिला रुग्ण :
असे मानले जाते की, १९ व्या शतकात पहिल्यांदाच एड्सची लागण झाली होती. आफ्रिकेतील माकडांच्या विशिष्ट प्रजातीमध्ये एड्स चे विषाणू आढळले. हा रोग माकडांच्या माध्यमातून माणसांमध्ये पसरला. वास्तविक, आफ्रिकेतील लोक माकडे खात असत, त्यामुळे माकड खाल्ल्याने हा विषाणू मानवी शरीरात शिरला असावा असे म्हटले जाते. १९५९ मध्ये, एचआयव्ही विषाणू पहिल्यांदा एका आजारी कॉंगोली माणसाच्या रक्ताच्या नमुन्यात त्याच्या मृत्यूनंतर आढळून आला. तो पहिला एचआयव्ही बाधित व्यक्ती असल्याचे मानले जाते. किन्शास हे त्या काळात देहव्यापाराचे केंद्र होते. अशा प्रकारे हा रोग देहव्यापार आणि इतर मार्गांनी इतर देशांत पोहोचला.
१९६० मध्ये हा रोग आफ्रिकेतून हैती आणि कॅरिबियन बेटांवर पसरला. वास्तविक, हैतीयन लोक काँगोच्या वसाहती लोकशाही प्रजासत्ताकमध्ये काम करत असत. जिथे स्थानिक पातळीवर शारीरिक संबंधांमुळे हा आजार इतरांमध्ये पसरला. जेव्हा ते त्यांच्या घरी परतले, तेव्हा विषाणू त्यांच्याबरोबर हैतीला गेला. त्यानंतर १९७० च्या दशकात हा विषाणू कॅरिबियन ते न्यूयॉर्क शहरापर्यंत पसरला आणि नंतर अमेरिकेपासून उर्वरित जगामध्ये पसरला. पुढे १९८० नंतर हा रोग जगभर खूप वेगाने पसरला. तेव्हापासून जगभरातील लाखो लोकांना एड्समुळे आपला जीव गमवावा लागला आहे.
ही आहे यंदाची जागतिक एड्स दिनाची थीम :
या वर्षीच्या ‘जागतिक एड्स दिना’ची थीम, ‘लेट कम्युनिटीज लीड’, एड्सनं बाधित समुदायांना नेतृत्व भूमिका घेण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा उद्देश आहे. ही थीम एड्सनं बाधित झालेल्या लोकांना आवाज उठवण्यास आणि त्यांचं जीवन सुधारण्यासाठी कृती करण्यास सक्षम असण्याची गरज अधोरेखित करते. एड्स बाधित लोकांना आरोग्य सेवा, शिक्षण आणि समान रोजगाराच्या संधी मिळायला हव्यात. जेणेकरुन WHO नुसार या थीमचा उद्देश पूर्ण होऊ शकेल.
एड्स संबंधित महत्त्वाचे :
- आज जगभरात दररोज ९०० नवीन मुले एड्सची शिकार होत आहेत.
- भारतात १९८६ एड्सच्या पहिल्या रुग्णाची नोंद झाली.
- ६० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानात एचआयव्हीचे विषाणू मारले जातात.
- एड्सवर बनवलेल्या पहिल्या हॉलिवूड चित्रपटाचे नाव होते ‘अँड द बँड प्लेन ऑन’.