Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
घरफोडी करणारी आंतरजिल्हा टोळी स्थानिक गुन्हे शाखेने केली गजाआड…
हिंगोली (प्रतिनिधी)- जुगार, घरफोडी, वाहन चोरी, अवैध धंदे, विनापरवाना शस्त्र, यांसारख्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्या आधीच हा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून कारवाईसाठी स्थागुशा पथक गस्तीस असताना पथकाला मिळालेल्या माहितीवरून जिल्ह्यात घरफोडी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीला स्थानिक गुन्हे शाखाने अटक करून गुन्हयातील सोन्याचे व चांदीचे दागीने एकुण किंमत ३, ४५,००० रू. व चोरीचे दोन मोटर सायकल १,४०,००० रू असा एकूण ४ लाख ८५ हजार रू. चा मुद्देमाल जप्त केला आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, हिंगोली जिल्हयात होणारे चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यांना आळा घालुन सदर गुन्हे करणारे आरोपी व त्यांच्या टोळीला पकडण्याकरीता पोलिस अधीक्षक हिंगोली जी. श्रीधर, यांनी स्थानिक गुन्हे शाखेस आदेश देऊन वेळोवेळी मार्गदर्शन केले. त्यावरून विकास पाटील, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि विकम विदुबोने यांच्या तपास पथकाने जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या गुन्हयांचा घटनास्थळ व परीसराचा व असे गुन्हे करणा-या आरोपीबाबत गोपनीय रित्या माहीती घेऊन अशा प्रकारचे गुन्हे करणारे आरोपींबाबत माहिती घेतली असता आर्णी येथील
१) शुभम उर्फ लाल देवानंद वानखेडे (वय २२ वर्षे)
२) अजीम उर्फ अज्जु अनिस माकोडी उर्फ कुरेशी, (वय २२ वर्षे), दोन्ही रा.आमराईपुरा आर्णी ता. आर्णी, जि.यवतमाळ
यांनी हिंगोली जिल्हयात व इतर ठिकाणी अशा प्रकारचे गुन्हे केल्याचे खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यांना शिताफीने घरफोडीसाठी वापरणारे हत्यार व भिती दाखविण्यासाठी एक एअर पिस्टलसह ताब्यात घेऊन विचारपुस केली असता त्यांनी घरफोडीचे गुन्हे केल्याची व हिंगोली जिल्हयात पण गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.
आरोपींकडुन तपासा दरम्यान गुन्हयातील सोन्याचे व चांदीचे दागीने एकुण किंमत ३, ४५,०००/- रू. व चोरीचे दोन मोटर सायकल १,४०,०००/- रू असा एकूण ४ लाख ८५ हजार रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नमूद आरोपींनी विचारपुस दरम्यान हिंगोली जिल्हयासह माहुर, तामसा येथे देखील अशाच प्रकारचे चोरी, घरफोडीचे गुन्हे केल्याचे सांगितले असून आणखीन गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.
अशा प्रकारे सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. विकास पाटील, पोउपनि विक्रम विठुबोने, पोलीस अंमलदार सुनिल अंभरे, लिंबाजी वाव्हळे, किशोर सावंत, महादु शिंदे, विशाल खंडागळे सर्व स्थानिक गुन्हे शाखा, हिंगोली यांनी केली आहे.