Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

रामजन्मभूमी संघर्ष आणि कालीमाता, श्री श्री रविशंकर यांचा विशेष लेख

7

मुंबई: विश्व हिंदू परिषदेचे (विहिंप) तत्कालीन अध्यक्ष अशोक सिंघल सन २००२च्या उन्हाळ्यात बेंगळुरूतील आश्रमात मला भेटण्यासाठी कांचीपुरमहून आले होते. तिथे त्यांनी अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादाच्या संदर्भात कांची कामकोटी पीठाचे तत्कालीन शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांची भेट घेतली होती. शंकराचार्य आणि प्रमुख मुस्लिम नेत्यांमधील चर्चा अयशस्वी झाल्यानंतर सिंघलजी मला भेटायला आले होते. रामजन्मभूमीचा प्रश्न सोडवण्यासाठी कायदा आणावा आणि राममंदिर उभारणीचा मार्ग तातडीने मोकळा करावा, हे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयीजींना मी पटवून द्यावे हे सांगण्यासाठी ते आश्रमात आले होते. ‘त्यासाठी वाजपेयीजी चालवत असलेले आघाडी सरकार कोसळले तरी चालेल. मला त्याची पर्वा नाही,’ असे ते मला म्हणाले होते. विशेष म्हणजे, राम मंदिरासाठी बेमुदत उपोषण करताना त्यांना जबरदस्तीने खाऊ घातल्याने त्या वेळी सिंघलजी वाजपेयींशी बोलत नव्हते.

त्या वेळी ७६ वर्षीय अशोकजींच्या डोळ्यांत एक उत्कट चैतन्य आणि एक चमक होती. ती चमक उत्कटता, धार्मिक संताप आणि निराशा दर्शवत होती. ‘राम मंदिर कधी बांधले जाईल का? माझ्या हयातीत मला ते पाहायला मिळेल का,’ असा प्रश्न त्यांनी मला विचारला. तेव्हा मला आतून असे वाटले, की आणखी किमान १४ वर्षे हे घडणार नाही. मी त्यांना म्हणालो, ‘तुम्ही प्रार्थना करा. तुमच्या वचनबद्धतेने सर्व शक्य आहे.’ माझ्या या बोलण्याने पूर्ण समाधान न झालेले अशोकजी आश्रमातून निघून गेले.

प्रभू श्रीरामांची कुलदेवता

दुसऱ्या दिवशी सकाळी ध्यान करताना, मला एका जीर्ण झालेल्या देवी मंदिराचे दर्शन झाले, ज्याचे पुनरुत्थान करणे आवश्यक होते. त्या वेळी मी त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. काही दिवसांनी तमिळनाडूतील एक वयोवृद्ध नाडी सिद्धपुरुष आश्रमात आले आणि त्यांनी मला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. प्राचीन ताडपत्रे वाचत असताना ते हळूवारपणे म्हणाले, ‘गुरुदेव, रामजन्मभूमीचा प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला दोन्ही समुदायांना एकत्र आणण्याची भूमिका बजावावी लागेल असे यात लिहिले आहे. यात हेही दिसून येते, की देवकाली या प्रभू श्रीरामांच्या कुलदेवीचे मंदिर खूपच दुर्लक्षित आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार झाल्याशिवाय अयोध्येतील राम मंदिराभोवतीचा हिंसाचार आणि संघर्ष संपणार नाही.’ हे करायलाच हवे, असे सांगताना त्यांच्या बोलण्यात निकड आणि दृढ विश्वासाची भावना होती.

अयोध्येत दोन काली मंदिरे

देवकाली देवीच्या अशा मंदिराच्या अस्तित्वाची माहिती त्या नाडी सिद्धपुरुषाला किंवा मलाही नव्हती. काही सूत्रांद्वारे आणि चौकशीअंती अयोध्येत दोन काली मंदिरे असल्याची माहिती आम्हाला मिळाली. त्यातील एक मंदिर शहराच्या मध्यभागी होते, त्याला लहान देवकाली मंदिर असे म्हणतात आणि दुसरे मंदिर थोडेसे दूर होते. ते देवकाली मंदिर म्हणून ओळखले जात असे. या देवकाली मंदिराचे बांधकाम मोडकळीस आले होते. त्यातील मध्यवर्ती तलावात कचरा टाकून लोकांनी त्याचे डम्पिंग ग्राउंडच केले होते. मंदिराच्या नूतनीकरणाचे आणि तलावाचे पुनरुज्जीवन करण्याचे काम सुरू करण्यासाठी मी नवी दिल्ली आणि लखनौ येथील आमच्या स्वयंसेवकांशी संपर्क साधला. सप्टेंबरच्या मध्यापर्यंत त्यांनी हे काम यशस्वीपणे पूर्ण केले.

देवकाली मंदिरात १९ सप्टेंबर २००२ रोजी सकाळी पुन: प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. आमच्या आश्रमातील पंडितांच्या गटाने माझ्या उपस्थितीत हा समारंभ पार पाडला. पवित्र अग्नीत पूर्णाहुती अर्पण करताना मला या मंदिराच्या वृद्ध पुजाऱ्याच्या डोळ्यांत आनंदाचे आणि कृतज्ञतेचे अश्रू दिसले. देवकाली देवी तिच्या संपूर्ण वैभवात चमकत होती. देवकाली मंदिरातील पूजेनंतर, शहरात जातीय हिंसाचारामुळे कोणताही रक्तपात किंवा दंगल झाली नाही. एक भविष्यवाणी पूर्ण झाली होती…अशोकजी सिंघलही त्या दिवशी उपस्थित होते. मात्र, राम मंदिराच्या मुद्द्यावर अंतिम निर्णय होण्यासाठी आणखी १४ वर्षे लागतील या पूर्वकल्पनेवर मी ठाम होतो. त्या संध्याकाळी देवकाली मंदिर परिसरात संत समागम झाला, ज्यामध्ये आम्ही हिंदू आणि सुफी संतांना निमंत्रित केले होते. एक हजारांहून अधिक लोक सत्संगात सहभागी झाले होते. रामजन्मभूमीचा वाद शांततेत सोडवण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रार्थना केली. मी मुस्लिम नेत्यांचा सन्मान करीत असताना त्यांनी मला तुलसी रामायणसोबत कुराणाची एक प्रत दिली आणि श्रीरामांवर त्यांची नितांत श्रद्धा असल्याचे सांगितले. त्यांच्या हावभावात बंधुत्वाचा निस्सीम भाव होता. याने माझा विश्वास दृढ केला, की केवळ निहित स्वार्थ असलेल्यांनाच दोन समाजांमध्ये फूट पडावी, असे वाटत असते.

शतकानुशतके चाललेल्या या संघर्षात पुरेसे रक्त सांडले होते. त्यामुळे आता काळाच्या कसोटीवर टिकणारा तोडगा हवा होता. हे लक्षात घेऊन सन २००३मध्ये मी न्यायालयाबाहेर परस्पर सामंजस्याचा प्रस्ताव मांडला होता. त्यानुसार, मुस्लिम समाज सद्भावना म्हणून हिंदूंना रामजन्मभूमी भेट देईल आणि त्या बदल्यात हिंदू त्यांना मशिदीच्या बांधकामासाठी पाच एकर जमीन देतील. यातून दोन्ही समाजांतील येणाऱ्या पिढ्यांसाठी बंधुभावाचा स्पष्ट संदेश जाईल.

देवकालीच्या प्राणप्रतिष्ठेनंतर अशोकजींनी मला प्रयागराज (त्या वेळचे अलाहाबाद) येथील त्यांच्या वडिलोपार्जित घरी बोलावले. सामूहिक ध्यानाचे मार्गदर्शन केल्यावर मी अशोकजींना सांगितले, की रामजन्मभूमीचा वाद सोडवण्यासाठी केवळ मानवी प्रयत्न पुरेसे नसून, ईश्वरी इच्छाही आवश्यक आहे. कोणत्याही कृतीच्या फलश्रुतीमध्ये मानवी प्रयत्नांसोबतच ईश्वरी इच्छाही महत्त्वाची भूमिका बजावते. त्यासाठी संयमाची गरज असते. मी त्यांना सुचवले, की त्यांनी या प्रकरणी घाई करू नये. त्यानंतर संध्याकाळच्या सुमारास ते अधिक निश्चिंत आणि आश्वस्त दिसले. वाजपेयी सरकारच्या विरोधातील आपली भूमिकाही त्यांनी मवाळ केली.

या घटनेनंतर काही कालावधी गेला. सन २०१७मध्ये दोन्ही समाजांच्या नेत्यांच्या आग्रहानुसार आणि नंतर सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेमुळे मी रामजन्मभूमी प्रकरणात मध्यस्थी करण्याचे माझे प्रयत्न पुन्हा सुरू केले. सरतेशेवटी, सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. मंदिराच्या बांधकामासाठी रामजन्मभूमीची जमीन आणि मशीद बांधण्यासाठी पाच एकर जागा निश्चित केली. हा एक महत्त्वाचा प्रसंग होता, कारण ५०० वर्षे जुन्या संघर्षावर शांततापूर्ण तोडगा निघाला होता.

– गुरुदेव श्री श्री रविशंकर

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.