Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

काँग्रेसकडून विशाल पाटील जवळपास निश्चित, BJP तिसऱ्यांदा काकांना तिकीट देणार? सांगलीत काय होईल?

11

स्वप्निल एरंडोलकर, सांगली : लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येतीये तसं इकडे सांगलीमध्ये राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. सांगली लोकसभा मतदारसंघ हा पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. वसंतदादा पाटील घराण्याची मतदारसंघावर पकड होती. मात्र २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेसमोर काँग्रेसचे उमेदवार माजी केंद्रीय मंत्री आणि वसंतदादा पाटलांचे नातू विशाल पाटील यांचा पराभव झाला. भाजपचे उमेदवार खा. संजयकाका पाटील हे सलग दोन टर्म निवडून आले. २०१९ च्या निवडणुकीत वंचित फॅक्टरने भाजपला मोठा फायदा झाला. काँग्रेसचे उमेदवार विशाल पाटील यांचा निसटता पराभव झाला. आता २०२४ च्या निवडणुकीत पूर्णतः वेगळे चित्र आहे. सुरुवातीला शांत असणार्‍या काँग्रेसनेही मैदानात उतरण्याची जोरदार तयारी सुरु केली आहे. काँग्रेसकडून प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांची उमेदवारी निश्चित झाली असल्याने ताकदीने लोकसभा लढण्याचा निर्धार त्यांनी बोलून दाखवला आहे. सलग दोन महाविजयानंतर भाजपने सांगली लोकसभा मतदारसंघात नियोजनबद्ध आखणी केली आहे. परंतु भाजपमध्ये उमेदवारीवरुन चुरस सुरु आहे. माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनीही लोकसभेसाठी दावेदारी सांगितली आहे. त्यामुळे विद्यमान खासदार संजयकाका पाटील गटबाजीच्या कचाट्यात सापडले आहेत. यावर भाजप कोणता मार्ग काढणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.

सांगली लोकसभा मतदारसंघ हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला. १९६२ ते २००९ पर्यंत जवळपास ५२ वर्ष या ठिकाणाहून काँग्रेसचा खासदार केंद्रात जायचा. पण २०१४ च्या मोदी लाटेत भाजपने ही जागा मारली आणि काँग्रेसचा गड हिसकावला. संजयकाका पाटील निवडून येण्यामागे मोदी लाट असल्याची चर्चा होती तर दुसरीकडे मतदारांनी विकासाच्या मुद्द्यावर मतदान केलं, अशीही चर्चा झाली.

मागील निवडणुकीत नेमकं काय झालं होतं?

त्यानंतर २०१९ च्या लोकसभेत प्रतिक पाटील निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडले. विशाल पाटलांसारखा तरुण आणि आक्रमक चेहरा समोर आला. विशाल पाटलांना माननारा वर्ग देखील मोठा आहे. त्यामुळे काँग्रेससाठी ही मोठी संधी होती. पण ऐनवेळी सांगलीची जागा काँग्रेसनं स्वाभिमानी पक्षासाठी सोडली. त्यामुळे विशाल पाटलांना स्वाभिमानीच्या नावावर निवडणूक लढवावी लागली आणि काँग्रेसने त्यांना पाठिंबा दिला. पण यावेळी वंचितने गोपीचंद पडळकर यांना संधी दिली. वंचित आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना वेगवेगळी लढल्याने त्याचा फायदा भाजपाला झाल्याचे सांगितले जाते. काँग्रेसचे असलेले परंतु स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून लढलेले विशाल पाटील यांनी ३ लाख ४४ हजार ६४३ तर गोपीचंद पडळकरांनी ३ लाख २३४ मते मिळवली होती. भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांनी ५ लाख ८ हजार ९९५ मते मिळवत दुसऱ्यांदा लोकसभा निवडणूक जिंकली.

भाजपकडून पृथ्वीराज देशमुख इच्छुक, तयारीला सुरूवात

यंदाचीही निवडणूक गेल्या वर्षीप्रमाणे तिहेरी होणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. तसं पाहिलं तर या ठिकाणी भाजपचं पारडं जड राहणार आहे. कारण गेल्या दोन्ही टर्म संजयकाका पाटलांनी मोठ्या फरकाने आपल्या विरोधी उमेदवाराचा फडशा पाडलाय. पण यंदाच्या निवडणुकीत संजय काका पाटल्यांच्या नावाला भाजपतूनच अंतर्गत विरोध आहे. आता पुन्हा विरोध होत असला तरी भाजपकडे यंदाही संजय काकांसारखा दुसरा कोणता तगडा उमेदवार नाही. तशी चर्चा पृथ्वीराज देशमुखांच्या नावाचीही आहे. पण पृथ्वीराज देशमुखांपेक्षा संजय काकांच पारडं कधीही जड राहणार असल्याची चर्चा आहे.

भाजपविरोधी वातावरण, काँग्रेसला लाभ उठविण्याची संधी

मागील काही वर्षात काँग्रेसमधील नेत्यांमध्ये मतभेद असल्याचे पहायला मिळाले. हे चित्र एप्रिल २०२३ मध्ये झालेल्या सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीनंतर काहीसे बदललेले पाहायला मिळाले. त्यानंतर काँग्रेसमधील डॉ. पतंगराव कदम, वसंतदादा आणि मदनभाऊ गट एकत्र आला आहे, त्यामुळे काँग्रेसमध्ये एकवाक्यता आहे. जिल्ह्यात भाजपविरोधी वातावरण आहे, त्याचा लाभ उठविण्याची संधी काँग्रेसला आहे. त्यादृष्टीने काँग्रेसने वाटचाल सुरु केल्याचे चित्र दिसून येते. राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गटही सोबत येईल, शिवाय उद्धव ठाकरे गटाची साथ मिळणार आहे.

भाजप संजयकाकांना संधी देणार?

सांगलीसाठी भाजपकडून तयारी केली जात असताना खासदार संजयकाका पाटील यांच्या कामकाजाबाबत चर्चाही जोरदार सुरु आहे. भाजप पक्षांतर्गत सुरु असलेली गटबाजी थांबायला तयार नाही. खासदांराची उमेदवारी थोपविणे भाजपच्या नेत्यांपुढे आव्हान आहे. तसे झाल्यास संजयकाकांची नाराजी पक्षाकडून कशी काढली जाणार? असा प्रश्नही निर्माण झाला आहे. मागील काही महिने जिल्ह्यातील भाजपची गाडी सुसाट होती, परंतु ऐन निवडणुकीच्या तोंडावर खासदार संजयकाका गटबाजीच्या कचाट्यात सापडले आहेत. त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना निवडणुकीत पक्षातील मतभेद मिटवून बंड थोपवावे लागणार असल्याचे चित्र दिसत आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.