Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
राज्यसभेच्या जुलै २०२२मध्ये झालेल्या द्विवार्षिक निवडणुकीत भाजपने आघाडीची मते फोडून अतिरिक्त म्हणजे, चौथा उमेदवार विजयी केला होता. या निवडणुकीत आघाडीच्या फुटीची बीजे पेरली गेली होती. त्यानंतरच्या विधान परिषद निवडणुकीत आघाडीचा पराभव निश्चित करून एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केले. या बंडानंतर आघाडी सरकारला सत्तेतून पायउतार व्हावे लागले होते. त्यानंतर निवडणूक अयोग आणि विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना हा पक्ष एकनाथ शिंदे यांचा असल्याचा निवडा दिला. त्यामुळे या निवडणुकीत शिंदे गटाचे मुख्य प्रतोद भरत गोगवले यांचा पक्षादेश ठाकरे गटाच्या आमदारांना लागू होणार आहे. शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. या फुटीनंतर दोन्ही गटाची निवडणूक आयोग आणि विधिमंडळात लढाई सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत निवडणूक आयोगाने अद्याप निर्णय दिलेला नाही. राष्ट्रवादी आमदार अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांकडे सुनावणी सुरू असून, राज्यसभा निवडणुकीआधी निवडणूक अयोग आणि विधानसभा अध्यक्षांकडून राष्ट्रवादीच्या संदर्भात निर्णय अपेक्षित आहे.
या पार्श्वभूमीवर राज्यसभेची निवडणूक रंगतदार ठरणार आहे. भाजपचे आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निधनामुळे अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाल्याने राज्यसभा निवडणुकीसाठी विधानसभेतील २८७ आमदार मतदान करतील. या निवडणुकीत विजयासाठी ४२ मतांचा कोटा आवश्यक आहे. जुलैमध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपने मतांचे गणित जमवून मतदान केले होते. त्यामुळे विजयी उमेदवाराच्या अतिरिक्त मतांवर भाजपने चौथा उमेदवार निवडून आणला होता. मात्र, आता राजकीय परिस्थिती बदलली आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडे १५ ते १६ आमदार, तर शरद पवारांकडे ११ आमदार आहेत. त्यामुळे या दोन्ही गटांना राज्यसभा निवडणुकीत विजयाचे गणित जमविणे अवघड आहे. अशातच उद्धव ठाकरे गटाला शिंदे गटाचा व्हिप लागू होणार असल्याने ठाकरे गटाची कोंडी होणार आहे.
दरम्यान, निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या राज्यसभा निवडणुकीसाठी ८ फेब्रुवारी रोजी अधिसूचना प्रसारित होणार आहे. १५ फेब्रुवारी हा उमेदवारी अर्ज करण्याचा अंतिम दिवस असून, १६ फेब्रुवारीला उमेदवारी अर्जांची छाननी केली जाईल. या निवडणुकीत २० फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. तर २७ फेब्रुवारीला सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होणार असून, सायंकाळी पाच वाजता मतमोजणी होऊन निकाल घोषित केले जातील.
उमेदवारांविषयी उत्सुकता
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजप, काँग्रेस, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून कोणाला उमेदवारी दिली जाईल, याविषयी उत्सुकता आहे. भाजपचे धक्कातंत्र लक्षात घेता राज्यसभेसाठी नवे चेहरे दिले जाण्याची शक्यता आहे. तसेच आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून उमेदवारी दिली जाईल. त्यामुळे प्रकाश जावडेकर आणि नारायण राणे यांच्या उमेदवारीविषयी अनिश्चितता आहे. व्ही. मुरलीधरन यांच्याही फेरउमेदवारीबाबत साशंकता आहे. भाजपमध्ये महाराष्ट्रातून विनोद तावडे, विजया रहाटकर यांची नावे चर्चेत आहेत. तर, शिवसेना शिंदे गटाकडून मिलिंद देवरा यांच्या नावाची चर्चा आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार गटाकडून पार्थ पवार यांचे नाव चर्चेत आहे. काँग्रेसचे उमेदवार दिल्लीतून निश्चित केले जाणार आहेत. काँग्रेसचे संख्याबळ लक्षात घेता काँग्रेसचा एक उमेदवार निवडून येणार असून या एका जागेसाठी अनेक जण इच्छुक आहेत.
प्रमुख पक्षांचे विधानसभेतील संख्याबळ
भाजप : १०४
राष्ट्रवादी (अजित पवार गट) : ४२
शिवसेना (एकनाथ शिंदे गट) : ४०
काँग्रेस : ४५,
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) : १६
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) : ११
राज्यसभेत भाजपला
पूर्ण बहुमत मिळणार?
म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
निवडणूक आयोगाने १५ राज्यांमधील राज्यसभेच्या ५६ जागांसाठी निवडणुकीच्या तारखा सोमवारी जाहीर केल्या. लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यसभेच्या या निवडणुका महत्त्वाच्या आहेत. या ५६ जागांच्या निकालांनंतर वरिष्ठ सभागृहात सत्तारूढ भाजप पूर्ण बहुमतात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जागांच्या निकालांनंतर संसदेच्या वरिष्ठ सभागृहाचे राजकीय चित्र बदलणार आहे. निवडणुका होऊ घातलेल्या ५६पैकी उत्तर प्रदेशातील सर्वाधिक १० जागांचा समावेश आहे. भाजप सत्तेत असलेल्या महाराष्ट्र आणि बिहारमध्ये प्रत्येकी सहा, तर मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी पाच जागा आहेत. कर्नाटक आणि गुजरातच्या प्रत्येकी चार जागांवर, तेलंगण, राजस्थान आणि ओडिशामध्ये प्रत्येकी तीन तर छत्तीसगड, उत्तराखंड, हरयाणा आणि हिमाचल प्रदेशामध्ये प्रत्येकी एका जागेवर मतदान होणार आहे.