Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
दहा वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्वरमहाराज पालखी मार्गाचे चौपदरीकरण होणार असल्याचे केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केले होते. त्यानुसार, सासवड ते पंढरपूर मार्गावर काम सुरू करण्यात आले. मात्र हडपसर ते दिवेघाट मार्गातील भूसंपादनामुळे रस्त्याचे काम रखडले. अखेर भूसंपादनाचे कामही पूर्ण झाले आहे. गेल्या दहा वर्षात या मार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात होऊन दोनशेहून अधिक जणांचा बळी गेला आणि शेकडो जण जखमी झाले.
अतिक्रमण काढण्याचे आवाहन
रस्त्यावर जागोजागी पडलेले खड्डे आणि अतिक्रमणांमुळे दररोज प्रवाशांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत होते. या पार्श्वभूमीवर अखेर प्राधिकरणाकडून दिवेघाट ते हडपसर (१३.२५ किलोमीटर) रस्त्याच्या कामासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. वरिष्ठ कार्यालयाच्या मंजुरीनंतर या रस्त्याचे काम सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर रस्ता रुंदीकरणासाठी अडथळा ठरणारी अतिक्रमणे नागरिकांनी स्वतःहून काढावीत असे आवाहन करण्यात आले आहे.
~ आठशे कोटींचा निधी मंजूर
खासदार सुप्रिया सुळे यांनी चौपदरीकरणासाठी दीड महिन्यांपूर्वी गडकरी यांच्याकडून सुमारे ७९२.३८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला. त्यामुळे आता तरी किमान काम सुरू होईल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. आपण केलेल्या पाठपुराव्याला प्रतिसाद देऊन निधी मंजूर केल्याबद्दल सुळे यांनी गडकरी यांचे आभारही मानले आहेत. शरद पवार यांनीही याबाबत केंद्राकडे शब्द टाकला होता. त्याला अपेक्षित यश आले असून, काही दिवसांपूर्वी निविदा काढण्याचे आदेश देण्यात आले. त्या वेळी ३९९.०२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. त्यात आता वाढ करण्यात आली आहे.
असे असणार चौपदरीकरण…
– हडपसर ते दिवेघाटापर्यंतच्या चौपदरीकरणामधील मुख्य रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार आहे.
– सर्व्हिस रोडची निर्मिती काँक्रिटमध्ये करण्यात येणार आहे.
– फुरसुंगीमध्ये रेल्वे उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. या मार्गात वडकी पालखी तळाजवळ, वडकीच्या प्रवेशद्वाराजवळ; तसेच उरुळी देवाचीच्या प्रवेशद्वाराजवळ भुयारी मार्ग असणार आहे.
– तुकाईदर्शन येथील ‘एसपी इन्फोसिटी’समोर उड्डाणपूल प्रस्तावित आहे.
‘उड्डाणपूल, भुयारी मार्ग प्रस्तावित’
‘हडपसर ते दिवेघाटापर्यंतच्या चौपदरीकरणाच्या निविदेचे काम सुरू झाले आहे. रेल्वे उड्डाणपूल, भुयारी मार्ग, मुख्य रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार असून, सर्व्हिस रोड काँक्रिटचा असणार आहे. ‘एसपी इन्फोसिटी’समोर उड्डाणपूल उभारण्याचा प्रस्ताव आहे. या भागातील दोन्हीकडील अतिक्रमण नागरिकांनी स्वतःहून काढल्यास काम वेळेत पूर्ण होण्यास मदत होईल,’ अशी माहिती राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे अधिकारी संजय जोशी यांनी दिली.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गाचा भाग असणाऱ्या हडपसर-दिवेघाट-झेंडेवाडी दरम्यानच्या कामात वन खात्याच्या परवानगीची मोठी अडचण होती. याबाबत सातत्याने केंद्रात पाठपुरावा केला. केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. हा रस्ता पूर्ण झाल्यावर वारकऱ्यांची सोय होणार आहे. याखेरीज हडपसर-दिवेघाट-झेंडेवाडी दरम्यानच्या वाहतूक कोंडीचा विषयही मार्गी लागणार आहे.
– सुप्रिया सुळे, खासदार