Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

महाराष्ट्रातील सहा मान्यवरांना ‘पद्म पुरस्कार�

10

नवी दिल्ली, 09: देशातील सर्वोच्च नागरी ‘पद्म पुरस्कार-2024’ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आले. एकूण 65 पुरस्कार प्रदान झाले असून, यात महाराष्ट्रातील सहा मान्यवरांना त्यांच्या क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी पद्म पुरस्काराने गौरविण्यात आले.

Img 20240510 Wa0256राष्ट्रपती भवनात संध्याकाळी संपन्न झालेल्या या भव्य सोहळ्यात, राष्ट्रपती यांच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमात उपराष्ट्रपती जगदीप धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर तसेच अन्य वरिष्ठ केंद्रीय मंत्रीगण उपस्थित होते. दुस-या टप्प्यात पार पडलेल्या या पद्मपुरस्कार समारंभात दोन पद्मविभुषण, आठ पद्मभुषण व 55 पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आले.

Img 20240510 Wa0257पद्मविभूषण या भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्काराचा सन्मान तामिळ सुपरस्टार चिरंजीवी आणि अभिनेत्री-नृत्यांगना वैजयंतीमाला बाली यांना प्रदान करण्यात आले. या दोन्ही कलाकारांनी भारतीय सिनेमा आणि कला क्षेत्रात अमिट योगदान दिले आहे.

Img 20240510 Wa0258महाराष्ट्र राज्यातून सहा मान्यवरांना विविध क्षेत्रात त्यांनी दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल गौरविण्यात आले. यात होर्मुसजी एन कामा यांना साहित्य, शिक्षण आणि पत्रकारिता क्षेत्रात, डॉ अश्विन मेहता यांना औषधी क्षेत्रात, कुंदन व्यास यांना साहित्य, शिक्षण, पत्रकारिता क्षेत्रातील योगदानासाठी ‘पद्मभूषण पुरस्कार’ तर शंकरबाबा पापळकर यांना समाजसेवा क्षेत्रात, उदय विश्वनाथ देशपांडे यांना क्रीडा व मल्लखांब प्रशिक्षण क्षेत्रात, चंद्रशेखर महादेवराव मेश्राम यांना औषधी क्षेत्रात उल्लेखनीय योगदानासाठी ‘पद्मश्री पुरस्कार’ प्रदान करण्यात आले.

महाराष्ट्रातील पद्मपुरस्कार प्राप्त मान्यवरांविषयी

Img 20240510 Wa0255होर्मुसजी एन कामा (साहित्य आणि अध्यापन)- श्री होर्मुसजी एन कामा यांना साहित्य, शिक्षण आणि पत्रकारिता क्षेत्रात अमूल्य कामगिरी केल्याबद्दल आज त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी संचालक, मुंबई समाचार 2018-2019 या वर्षासाठी ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशन (ABC) चे अध्यक्षपद भूषविले आहे. ते यापूर्वी इंडियन न्यूजपेपर सोसायटी (INS) चे दोन टर्म तसेच प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया (PTI) आणि मीडिया रिसर्च यूजर्स कौन्सिल (MRUC) चे अध्यक्ष होते. श्री होर्मुसजी कामा हे आजपर्यंत INS, PTI आणि MRUC च्या बोर्डावर सक्रिय सदस्य आहेत.

Img 20240510 Wa0259डॉ. अश्विन मेहता (औषधी) – डॉ. अश्विन बी मेहता हे मुंबईतील प्रख्यात आणि प्रतिष्ठित इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट असून, या क्षेत्रात अमूल्य योगदान दिल्याबद्दल आज त्यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. या क्षेत्रात त्यांना मागील 38 वर्षांचा दांडगा अनुभव आहे. ते जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, मुंबई येथे कार्डिओलॉजीचे संचालक आहेत. श्री मेहता हे सद्या लीलावती हॉस्पिटल, ब्रीच कँडी हॉस्पिटल, एस आर मेहता हॉस्पिटल, हरकिसोनदास हॉस्पिटल, वेस्टर्न रेल्वे हॉस्पिटल, कमबल्ला हिल हॉस्पिटल आणि सैफी हॉस्पिटलमध्ये मानद सल्लागार हृदयरोगतज्ज्ञ आहेत.

कुंदन व्यास – पत्रकारितेच्या क्षेत्रात अतुलनीय कार्य करणा-या कुंदन व्यास यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांनी महत्त्वपूर्ण पदांवर वैविध्यपूर्ण कामे केले आहे. कुंदन व्यास हे जन्मभूमी वृत्तपत्राचे मुख्य संपादक आहेत. ते वर्ष 2010-11 मध्ये इंडियन न्यूजपेपर सोसायटी (INS) चे अध्यक्ष होते आणि महाराष्ट्र सरकारने त्यांना 2015 मध्ये लोकमान्य टिळक राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित केले आहे.
डॉ शंकरबाबा पापळकर –अनाथ, बेवारस तसेच दिव्यांग मुलांचे आधारवड असलेले शंकरबाबा पापळकर हे अमरावती जिल्ह्यातील अचलपुर तालुक्यातील आहेत. तेथील वझ्झर येथे अंबादासपंत वैद्य दिव्यांग बेवारस बालगृहच्या माध्यमातून अशा मुलांचे संगोपन तसेच पुर्नवसनाचे त्यांचे अखंड व्रत सुरू आहे. शंकरबाबांच्या बालगृहात राज्याच्या विविध जिल्ह्यांमधून बेवारस दिव्यांग मुले-मुली आजीवन पुनर्वसनासाठी दाखल होतात. सध्या या बालगृहात, 98 मुली आणि 25 मुले असे एकूण 123 मतिमंद, अपंग, अंध, निराधार, निराश्रित मुले वास्तव्यास आहेत. अशाप्रकारचा बालगृह देशात एकमेव पुनर्वसन केंद्र आहे, जे आदर्श बालगृह म्हणून प्रचलित असून, या आश्रमातील मुलांच्या संगोपन व पुनर्वसनासाठी, शंकरबाबा पूर्णत: समर्पित असतात.

डॉ. चंद्रशेखर महादेवराव मेश्राम – न्यूरोलॉजीच्या क्षेत्रात, डॉ मेश्राम, 1987 पासून कार्यरत असून त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत आज त्यांना प्रतिष्ठित असे पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. वैद्यकीय क्षेत्रात डॉ मेश्राम गेल्या 37 वर्षांपासून अविरत काम करीत आहेत.
वर्ष 2022 मध्ये वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरोलॉजीचे विश्वस्त म्हणून त्यांची निवड झाली. या पदावर निवड झालेले ते देशातील पहिले न्यूरोलॉजिस्ट आहेत व वयाच्या 65व्या वर्षी त्यांनी हा इतिहास रचला. 123 सदस्य देश असलेल्या वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरोलॉजीचे जगात फक्त तीन विश्वस्त असून, ते यापैकी एक आहेत. एका छोट्या गावातून शालेय शिक्षण पूर्ण करून, वर्ड फेडरेशन ऑफ न्यूरोलॉजीच्या विश्वस्त पदापर्यंत त्यांच्या कार्याने मोठी झेप घेतली आहे. मुख्य समन्वयक, सार्वजनिक आरोग्य शैक्षणिक उपक्रम, इंडियन अकादमी ऑफ न्यूरोलॉजी, सार्वजनिक आरोग्य शिक्षणासाठी वर्तमानपत्रांमध्ये 400 प्रकाशने प्रसिध्दआहेत. मागील 30 वर्षांपासून सार्वजनिक आरोग्य शिक्षण कार्यक्रम आयोजित करत असून, पक्षाघात, स्मृतिभ्रंश, पार्किन्सन्स रोग, मिरगी, डोकेदुखी, ऑटिसम, मेंदूज्वर आदि रोगांवर वर्षभर जनजागरणाचे कार्यक्रम करत असतात. वैद्यकीय शिक्षण नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून तर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च, चंदीगडमधून एमडी मेडिसिन, एमडी न्यूरोलॉजीमध्ये पदव्युत्तर शिक्षण त्यांनी पूर्ण केले आहे.

उदय देशपांडे – क्रीडा क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी बजावणारे आंतरराष्ट्रीय मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडे यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. जागतिक स्तरावर या खेळाला लोकप्रिय करण्यासाठी आणि अनेक मल्लखांबपट्टू घडवण्यासाठी उदय देशपांडे यांनी अथक परिश्रम घेत, या क्षेत्रात अमूल्य योगदान दिले आहे. 50 देशांतील 5,000 हून अधिक खेडाळूंना वैयक्तिकरित्या प्रशिक्षित करून महिला, दिव्यांगजन, अनाथ, आदिवासी आणि ज्येष्ठ नागरिकांसह विविध गटांना मल्लखांबची ओळख त्यांनी करून दिली आहे. विश्व मल्लखांब फेडरेशनचे संचालक म्हणून जागतिक पातळीवर या खेळाला नेण्यासाठी त्यांचे मोलाचे योगदान आहे.

देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कार- पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या तीन श्रेणींमध्ये प्रदान केले जातात. कला, सामाजिक कार्य, विज्ञान आणि अभियांत्रिकी, व्यापार आणि उद्योग, वैद्यक, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा, नागरी सेवा आदि विविध शाखा/कार्यक्रमांमध्ये हे पुरस्कार दिले जातात. असामान्य आणि विशिष्ट सेवेसाठी ‘पद्मविभूषण’ दिला जातो; उच्च श्रेणीतील विशिष्ट सेवेसाठी ‘पद्मभूषण’ आणि कोणत्याही क्षेत्रातील विशिष्ट सेवेसाठी ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला या पुरस्कारांची घोषणा होत असते.

हे पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते दरवर्षी मार्च अथवा एप्रिल महिन्यात राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात प्रदान केले जातात. वर्ष 2024 साठी, राष्ट्रपतींनी 132 पद्म पुरस्कार प्रदान करायला मान्यता दिली होती. यामध्ये 5 पद्मविभूषण, 17 पद्मभूषण आणि 110 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश होता. 2 मे 2024 रोजी पुरस्कार वितरणाच्या पहिल्या टप्पयात तीन पद्मविभूषण, आठ पद्मभूषण आणि 55 पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आले होते. तर दुस-या व अंतिम टप्प्यात दोन पद्मविभूषण, आठ पद्मभूषण आणि 55 पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आले. एकूण संपूर्ण सोहळ्यातील विजेत्यांमध्ये 30 महिला आहेत आणि परदेशी/एनआरआय/पीआयओ/ओसीआय या श्रेणीतील 8 मान्यवर आणि 9 मरणोत्तर पुरस्कारप्राप्त मान्यवरांचाही समावेश आहे.
श्री. प्यारेलाल शर्मा यांना कला क्षेत्रासाठी पद्मभूषण पुरस्कार जाहिर करण्यात आला होता. तथापि, आज झालेल्या पुरस्कार सोहळ्यास प्यारेलाल शर्मा उपस्थित राहिले नाहीत.

Leave A Reply

Your email address will not be published.