चंद्रपूर, निलेश झाडे : लोकसभा निवडणुकीत भाजपला राज्यात फटका बसला.आगामी विधानसभा निवडणूकीत लोकसभेसारखी स्थिती टाळण्यासाठी भाजप आता सक्रिय झाला आहे. विधानसभेसाठी राज्यातील सर्वच पक्षाने आपल्या पद्धतीने तयारीला सुरुवात केली आहे. उद्या चंद्रपुरात भाजपचे महाअधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी आपलं दुखणं मांडणार हे ठरलेलं. त्यातच मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पराभवाची समीक्षा केली जाणार आहे. मुनगंटीवार यांच्या जवळच्याच माणसांनी घात केला, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. विकासपुरुष ही उपाधी असलेल्या मुनगंटीवारांची खरंतर लोकसभा निवडणूकीत टोकाची लढाई अपेक्षित होती मात्र घडलं विपरीत. हजारात नव्हे तर तब्बल दोन लाख पन्नास हजार मतांनी मुनगंटीवारांचा पराभव झाला. त्यात विरोधकांनी समाजमाध्यमात ‘ बाईने पाडलं ‘ अशी वावटळ उडवली. मुनगंटीवारांच्या हे फार जिव्हारी लागलं आहे. उद्या होणाऱ्या महाअधिवेशनात कुणाच्या पाठीवर थाप, कुणाची कानपीडी घेतली जाणार, याची खमंग चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
लोकसभा जिंकली, विधानसभा टार्गेट, अशोकरावांना काँग्रेसचं विराट रुप दिसणार, नांदेडमध्ये बडे नेते येणार
पूणे येथे झालेल्या भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेशाचे अधिवेशन झाले. याच अनुषंगाने प्रदेश अधिवेशनानंतर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हानिहाय भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अधिवेशन आयोजित करण्याचा संकल्पाचा ठराव पारीत करण्यात आला.पक्ष संघटना बळकट करणे, आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने तयारी करण्यासाठी चंद्रपूर जिल्हा भाजपातर्फे उदयाला चंद्रपुरात जिल्हा महाअधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे महाअधिवेशन ग्रामीण आणि महानगर या दोन्ही ठिकाणच्या विस्तारित कार्यकारिणीच्या सदस्यांसाठी आहे. 12 वाजता सुरु होणारे हे अधिवेशन सायंकाळी पाच वाजेपर्यंत चालणार आहे.स्वर्गवासी एड.दादाजी देशकर दालन, शकुंतला लॉन येथे अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे.
महाअधिवेशनात माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार बंटी भांगडिया एकत्र दिसणार आहेत. त्यांचे समर्थक सुद्धा यानिमित्ताने मांडीला मांडी लावून बसणार आहेत. मात्र अनेकांच्या मनातील खदखद या निमित्ताने बाहेर येण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविली जात आहे.