Sharad Pawar Kolhapur Press Conference : नेतृत्व कुणी करायचं यावर चर्चा झाली नाही. निवडणूक आल्यानंतर यावर निर्णय होईल, असं शरद पवार म्हणाले.
काय म्हणाले शरद पवार?
नेतृत्व कुणी करायचं यावर चर्चा झाली नाही. निवडणूक आल्यानंतर यावर निर्णय होईल. सत्ता येईल असं चित्र महाराष्ट्रात आहे. मात्र आताच नेतृत्वाचं नाव जाहीर करण्याचं कारण नाही. आम्ही राज्याला स्थिर सरकार देणार, असं शरद पवार म्हणाले.
ठाकरेंच्या सूचनेवर गुपचिळी
महाविकास आघाडीच्या प्रचाराचा नारळ मुंबईत वाढवण्यात आला, त्यावेळी उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करण्याचं आवाहन केलं होतं. तुम्ही जो चेहरा द्याल, त्याला बिनदिक्कत पाठिंबा देऊ, मात्र चेहरा देऊन निवडणूक लढवावी, असं मत ठाकरेंनी व्यक्त केलं होतं. त्यावेळीही भाषणात कुणीच मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावर भाष्य केलं नाही. नंतरही ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत वारंवार मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी करु लागले, मात्र त्यावर मित्रपक्षांतून प्रतिक्रिया आली नाही. आताही शरद पवारांनी प्रतिक्रिया देत ठाकरेंना ही मागणी बाजूला ठेवण्याचा इशारा दिल्याचे दिसते.
जागावाटपाचा निर्णय बाकी
दरम्यान, जागावाटपाचा निर्णय झाला नाही, पहिली बैठक देखील झाली नाही. ७, ८, ९ या तारखांना महाविकास आघाडीचे नेते बसतील आणि चर्चेला सुरुवात होईल. यामध्ये आम्हाला साथ दिलेल्या लहान पक्षांना देखील सोबत घेण्याबाबत मी भूमिका घेतली आहे, ती मी सुचवली आहे. लवकरच याबाबत प्रक्रियेला सुरुवात होईल. पण मी या प्रक्रियेत मी नाही, आमचे इतर सहकारी यात चर्चा करतील, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.
Sharad Pawar : महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण? शरद पवारांचं थेट उत्तर, आमची सत्ता येईल पण…
महाराष्ट्रात लोकांना बदल हवा आहे. त्यात आता आमची जबाबदारी वाढली आहे. मागच्या वेळी देखील उमेदवारांची चणचण नव्हती. आता देखील आमच्याकडे उमेदवारांची चणचण नाही. लोकसभेला भाजपला बहुमत मिळेल असं दाखवलं जात होतं पण ते खरं नव्हतं. आता देखील तसंच चित्र पाहायला मिळेल, असा अंदाज शरद पवारांनी वर्तवला.